भाजपा राज्यात पुन्हा सत्तेत येणार ; राष्ट्रीय उपाध्यक्ष सहस्त्रबुद्धे यांचा विश्वास

    दिनांक :20-Sep-2019
अमरावती,
केंद्रातल्या नरेंद्र मोदी व राज्यातल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातल्या सरकारने लोकहित व राष्ट्रीय अस्मितांना प्राधान्य देवून कार्य केले आहे. त्यामुळे राज्यात येत्या काही दिवसात होणार्‍या विधानसभा निवडणूकांमध्ये भाजपाला पुन्हा घवघवीत यश निश्चित मिळेल, असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केला.
 
 
 
अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी खासदार विनय सहस्त्रबुद्धे शुक्रवारी अमरावतीला आले होते. त्यावेळी त्यांनी श्रमिक पत्रकार भवनात पत्रकारांशी संवाद साधला. येणारी विधानसभा निवडणूक भाजपा आत्मविश्वासाने लढणार आहे. कामगिरीच्या आधारावर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा जनाधार मागणार आहे. जनता भरघोस मतांनी भाजपाला विजयी करेल, असा आम्हाला विश्वास आहे. भाजपाशिवाय अन्य कोणताही पक्ष कामगिरीच्या आधारावर मते मागतांना दिसत नाही.
 
 
 
ते पक्ष जातीपातीचे राजकारण करुन धृवीकरण करण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुसर्‍यांदा जनाधार मिळाल्यानंतर स्थापित झालेल्या त्यांच्या सरकारला नुकतेच 100 दिवस पुर्ण झाले आहे. या 100 दिवसाच्या कार्यकाळात अनेक ठोस निर्णय घेण्यात आले असून जटील प्रश्नांवरही भाजपाच सक्षमपणे देशहिताचा निर्णय घेऊ शकते, हा विश्वास जनतेत निर्माण झाला आहे. तिहेरी तलाक, कलम 370 हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी अवघड प्रश्नांवरही योग्य मार्ग काढण्यासाठी पुढे सरसावले आहे. लोकसंख्या नियंत्रण, सिंगल युज प्लास्टीक या सारख्या विषयांवरही त्यांनी ठोस भूमिका घेतली आहे.
 
 
देशातील जनता या विषयांवरही सकारात्मक प्रतिसाद देईल, असा विश्वास भाजपाला आहे. अर्थव्यवस्थेमध्ये आलेल्या मंदीवरही सातत्याने उपाययोजना सुरु आहे. अर्थमंत्र्यांनी केलेल्या उपाययोजनांचे निश्चितच चांगले परिणाम यथावकाश समोर येईल. बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्याचा विषय निवडणूक आयोगासह न्यायालयानेही निकाली काढला आहे. त्यामुळे आता मतदान यंत्राच्या माध्यमातूनच निवडणूका होईल, हे स्पष्ट झाले आहे. वेगळा विदर्भाच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांला त्यांनी आवश्यक प्रक्रियेचा अवलंब करुन हा प्रश्न निश्चित मार्गी लावला जाईल, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आ. सुनील देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. दिनेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष जयंत डेहनकर, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, किरण पातुरकर उपस्थित होते.