उद्यापासून धामणगावात थांबणार नागपूर-पुणे गरीबरथ

    दिनांक :20-Sep-2019
खा. रामदास तडस यांच्या प्रयत्नांना यश
अमरावती,
नागपूर वरुन पुण्याला जाणारी गरीबरथ एक्सप्रेस धामणगांव येथे थांबावी याकरिता अनेक वर्षापासून नागरिकांची मागणी होती. यासाठी खा. रामदास तडस यांनी सतत पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून उद्या शनिवार, 21 सप्टेंबरपासून पुण्यावरून येणार्‍या व नागपूरवरून येणार्‍या दोन्ही गाड्यांना धामणगांव रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर झाल्याचा आदेश व परिपत्रक प्राप्त झाल्याची माहिती वर्धा लोकसभेचे खासदार रामदास तडस यांनी दिली.
 
 
 
धामणगांव हे वर्धा लोकसभा क्षेत्रातील एक प्रमुख बाजारपेठेचे शहर असून यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांना रेल्वे सेवेने जोडणारे महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. धामणगांव येथे गरीबरथ एक्सप्रेसला थांबा मिळाल्यास पुण्यामध्ये शिक्षण, नोकरी व वास्तव्यास असलेल्या धामणगांव शहर व यवतमाळ येथील नागरिकांना मोठी सोय उपलब्ध होईल, असा युक्तीवाद खासदार रामदास तडस यांनी वेळोवेळी रेल्वे समितीच्या बैठकीमध्ये तसेच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे सातत्याने केला. आज आपल्या सातत्यपूर्ण मागणीला भारत सरकारने न्याय देवून दहा बारा वर्षापासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण केल्याबद्दल मला अत्यंत समाधान व आनंद आहे, असे खासदार रामदास तडस यांनी यावेळी सांगितले.
यापूर्वी वर्धा लोकसभा क्षेत्रातील अनेक महत्वपूर्ण रेल्वे थांबे मंजूर झाले असून अनेक रेल्वे थांब्याचे प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. येणार्‍या काळात सर्व प्रलंबित प्रस्ताव प्राधान्याने मार्गी लागावे, म्हणून माझा सतत पाठपुरावा असणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.