महिलेची भर चौकात प्रसूती; वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने मृत्यू

    दिनांक :20-Sep-2019
मोर्शी,
येथे एका गर्भवती महिलेची भर चौकात उघड्यावर प्रसूती करण्यात आली. एवढेच नाही तर तिला प्रसूतीनंतर मालवाहू रिक्षातून उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. वेळेवर उपचार आणि रुग्णवाहिका न मिळाल्याने त्या महिलेचा मृत्यू झाला. ही हृदय हेलावणारी घटना शुक्रवारी दुपारी घडली.
 
 
 
आशा परशुराम बारस्कर वय 35, रा .बैतुल मध्यप्रदेश असे मृत महिलेचे नाव आहे. ती वरुड तालुक्यातील जरुड येथे रखवालदारीचे काम करीत होती . तिला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्यामुळे वरुड येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी अमरावतीला नेण्यास सांगितले. मात्र, तिला रुग्णावाहिका मिळाली नाही. शेवटी ती आणि तिचा पती राज्य परिवहनच्या बसने मोर्शीला गेले. प्रसूतीच्या वेदना वाढल्याने एसटी वाहकाने तिला मोर्शीच्या जयस्तंभ चौकात उतरवले.
तिला प्रचंड त्रास होत होता. तेवढ्यात चौकात असलेले उपजिल्हा रुग्णालयाच्या सल्लागार समितीचे सद्स्य कमर अली लियाकत अली यांनी तत्काळ रुग्णालयातील आया कमलाबाईला जयस्तंभ चौकात आणले. त्यानंतर भररस्त्यात त्या महिलेची प्रसूती करण्यात आली. तिच्या अवहेलना एवढ्यावरच थांबल्या नाही, तर तिला रुग्णालयात नेण्यासाठी साधी रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. शेवटी एका मालवाहू रिक्षात घालून तिला मोर्शीच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला अमरावतीला पाठवण्यात आले. मात्र, रस्त्यातच तिचा मृत्यू झाला.