शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी माजी सैनिकावर गुन्हा दाखल

    दिनांक :21-Sep-2019
शेतकरी सन्मान योजनेच्या आढावा बैठकीत आणला अडथळा
 
मानोरा,
शासन राबवित असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही फसवी असून, शेतकर्‍यांची दिशाभूल करणारी आहे, असे विधान आवेशाने जिल्हाधिकारी वाशीम यांना बोलल्या प्रकरणी मानोरा येथील माजी सैनिक रशीद खान यांचे विरुद्ध मानोरा पोलिसांना महसुल प्रशासनाच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला.
 
 
 
पोलिस सुत्राकडून प्राप्त माहितीच्या आधारे 24 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक हे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना प्रसार व आढावा घेण्यासाठी मानोरा तालुक्यातील विविध गावांना भेटी देण्यास आले होते. त्यानिमीत्त मानोरा तहसील कार्यालयाजवळ असलेल्या प्रविण गावंडे यांच्या ई सेवा केंद्रावर आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक आले असता ते उपस्थितांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेबद्दल माहीती देत होते. तेथे उपस्थित असलेले माजी सैनिक रशीद खान हमीद खान यांनी जिल्हाधिकारी यांना बोलण्याचे थांबवून योजनेबद्दल खोटी प्रसिद्धी करुन नका. सदर ही योजना शेतकर्‍यांची फसवणुक करणारी आहे. असे बोलून शासनाच्या धोरणावर टिका केली व जिल्हाधिकारी यांना योजना बंद करा असे सांगुन त्यांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे शासनाच्या कामात अडथळा आणला अशा प्रकारची फिर्याद तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण यांचेतर्फे शिपाई अनिल केशवराव गावंडे यांनी मानोरा पोलिसात दिल्यावर आरोपी रशीद खान हमीद खान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक नाईक करीत आहेत.