कुलदैवत किंवा कुलदेवी म्हणजे काय?

    दिनांक :21-Sep-2019
प्रत्येक घराण्याचे एक कुलदैवत असते. बहुतेक घरामधून लग्न, मुंज, वास्तू, मंगलकार्य अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदैवताला जाणे हा महत्त्वाचा भाग असतो. कुलदैवत किंवा कुलदेवी म्हणजे काय? आपले कुलदैवत कुठे आहे? त्याचे महत्त्व काय? कुलदैवतासंबंधी आपलं काय कर्तव्य आहे? 

 
 
हे सर्व प्रश्न दिवसेंदिवस अनुत्तरित राहतात. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे याची उत्तरे सांगणारी ज्येष्ठ मंडळी जवळ नसतात आणि घरात एखादी समस्या उद्भवली की धावपळ सुरू होते. आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते, अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी, त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मात जलद प्रगती होते.
 
 
कुलदेवता या शब्दाचा अर्थ-
कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधारचक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता. कुलदेवतेची उपासना करून आध्यात्मिक आणि व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात आहे.
 
कुलदेवतेच्या उपासनेचे महत्त्व-
ब्रह्मांडात असलेली सर्व तत्त्वे पिंडात आली की साधना पूर्ण होते. श्रीविष्णू, शिव आणि श्री गणपती यांसारख्या देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्त्व वाढते; परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्त्वांना आकर्षित करण्याचे सामर्थ्य केवळ कुलदेवतेच्या जपात आहे. त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वीतत्त्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही. ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील, त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा.
 
कुलदेवता ठाऊक नसल्यास काय करावे?
मूळ स्वरूपातील दैवते : ब्रह्मा, विष्णू, महेश, आदिमाया विष्णूची अवतार रूपातील दैवते : नृसिंह, राम, कृष्ण.
परशुराम शंकराची अवतार रूपातील दैवते :
कालभैरव, खंडोबा, मारुती.
 
आदिमायेची अवताररूपातील दैवते :
सरस्वती, लक्ष्मी, पार्वती, दुर्गा, चंडी, काली.
शंकराच्या गणांचा मुख्य अधिपती, तसेच आरंभ पूजनाची देवता गणेश.
 
देवांचा सेनापती
कार्तिकेय (दक्षिण भारतात याला महत्त्व आहे. अय्यप्पा म्हणतात).
 
वैदिक देवता
इंद्र, अग्नी, वरुण, सूर्य, उषा यातील सूर्य व अग्नीवगळता इतर दैवतांची उपासना आज प्रचलित नाही.
 
कुलदेवी/देवता माहिती नसल्यास वरीलपैकी ज्या देवावर भक्ती आहे त्यांची उपासना करावी. यात अजून ग्रामदैवत, कुलदैवत, इष्टदैवत वगैरे दैवतांचे प्रकार आहेत.
 
ग्रामदैवत हे संपूर्ण गावाचे दैवत, कुलदैवत हे कुळाचे आणि इष्टदैवत हे कोणतेही आवडणारे, आपल्यावर कृपादृष्टी ठेवणारे दैवत असते. बहुधा कुळाचे एखादे दैवत असावे. कदाचित काही नातलग कुटुंबांचा एखाद्या गावाशी संबंध असावा. जिथे वस्ती केली, तिथे एक देऊळ बांधणे. कुळ म्हणजे कुटुंबकबिला वाढला की म्हणत असावेत. अशा कुटुंबाचे एखादे आराध्य दैवत असणे शक्य असू शकेल. मग जरी लोक स्थलांतरित झाले, तरी मूळ कुळाची स्मृती राहात असावी.
 
कुळ म्हणजे कुणा एका मूळ पुरुषापासून पुढे निर्माण झालेले आणि एकमेकांशी रक्ताने बांधले गेलेले विस्तृत कुटुंब.
 
बहुधा गोत्र, जाती वगैरेंसारखा लहान गट किंवा टोळी म्हणजे कुळ. एकाच कुळातले लोक एकच आडनाव लावतातच असे नाही, परंतु कुलदैवत, गाव, जात वगैरेवरून ते स्वतःला एकाच कुळातले मानतात.
 
एकंदरीत काय, कुळ म्हणजे एक टोळी. यावरून महाभारत युद्ध हे एक टोळीयुद्ध होते, या वचनाची आठवण होते. आप्तसंबंधांमुळे जे एकत्र आले आहेत किंवा एकत्र वास करतात, असे एका रक्ताचे व संबंधांचे जे काही लोक असतील त्या सर्वांच्या समूहास कुळ असे म्हणतात. कुळ शब्दाला मराठीत घराणे असा शब्द रूढ आहे. कुळ म्हणजे घराणे ठीक आहे, परंतु कुळ म्हणजे कुटुंब किंवा जात नव्हे. एका जातीत अनेक कुळे असू शकतात.
 
कुलदेवी/कुलदैवत हे आपल्या वंशाचे संरक्षण करणारे दैवत असतात. त्यासाठी त्यांची सेवा, उपासना करून, वर्षातून एकदातरी आपल्या कुलदेवी/कुलदैवत यांचे स्थानी जाऊन मानसन्मान करून दर्शन व आशीर्वाद घ्यावा.