वेदांग शास्त्री
भाद्रपदाच्या दुसर्या पंधरवड्यांत म्हणजे कृष्ण पक्षांत ज्याला पितृपक्ष, पक्ष पंधरवडा, श्राद्ध पक्ष असे म्हटले जाते त्यात मरण पावलेल्या म्हणजेच अपार्थिव झालेल्या आपल्या पितरांची कृतज्ञतेने आठवण करायची आणि त्यांची पूजा करायची... पितृपक्ष म्हणजे अशुभकाळ, स्मशानकाळ असा समज आहे. थोडे गुढाचे आणि म्हणूनच भीतीचेही वलय या संस्काराला आहे.
पितृपक्षामध्ये आपण पितरांना उद्देशून श्राद्ध करतो. त्यातून आपण त्यांच्याबद्दलची आपल्या मनात असणारी श्रद्धा व्यक्त करत असतो. श्रद्धा असते म्हणून ते ‘श्राद्ध’ असते. ही श्रद्धा एखादी व्यक्ती हयात असल्यापासूनच विश्वासाच्या नात्याच्या रूपांत जपली जायला हवी. तरच मग ती व्यक्ती गेल्यावर श्राद्धाच्या रूपांत व्यक्त केलेल्या भावनेचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकते. आता वर्तणानकाळांत बुद्धीनिष्ठ, विज्ञाननिष्ठतेने विचार केला तरीही आपले संपूर्ण शरीर, ज्याच्या साह्याने आपण इहलोकीचे सगळे आनंद उपभोगतो ते आपल्या पूर्वजांची त्यांच्या ‘जनुकांची’ देण आहे, याची जाणीव ठेवून त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीत श्राद्धलोप होऊ नये असा शास्त्रसंकेत आहे.
श्राद्ध हे भाद्रपदातील कृष्ण पक्षात करण्याचे प्रयोजन काय? तर, मनुष्य देव आणि पितर यांची कालगणना वेगवेगळी असते. मनुष्याच्या एका वर्षात दोन आयन असतात. उत्तरायण आणि दक्षिणायन. त्यापैकी उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस आणि दक्षिणायण म्हणजे पितरांचा दिवस. मग असे असेल तर दक्षिणायणाची सुरुवात आणि शेवट विचारात घेता भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष हा त्याचा अपराणह काळ म्हणजेच भोजनकाल येतो. म्हणून या पंधरवड्यामध्ये पितरांना उद्देशून श्राद्ध केले जाते. विज्ञान आणि अध्यात्म या एकाच तत्वाच्या दोन भाषा आहेत, म्हणून आपल्या संस्कृतीत आणि संस्कारांत धार्मिक म्हणून जे काय विधी येतात ते निव्वळ बुद्धीहीन कर्मकांड नाहीत, तर त्यामागे ‘आत्मविज्ञान’ (आध्यात्मविज्ञान) असते.
हिंदू संस्कृतीत श्राद्धाला महत्त्वाचे स्थान आहे. सर्व वेदग्रंथात, स्मृतिग्रंथात आणि सुत्र ग्रंथात श्राद्ध हा विषय विस्ताराने आलेला आहे. कोणतीही व्यक्ती निधनानंतर प्रेतयोनीतून पितृलोकत जाते पूर्व कर्मानुसार पुनर्जन्म किंवा आध्यात्मिक दृष्टीने उन्नत असणार्या आत्म्यास देवलोकाची प्राप्ती होते, परंतु असे असले तरी काही काळ त्यांचे वास्तव्य पितृलोकांत असते आणि मानवीय कालगणनेच्या सापेक्ष हा कालावधी तीन पिढ्यांपर्यंत असू शकतो. पुनर्जन्म किंवा देवलोक प्राप्त झाला असला तरी श्राद्धाचा हविर्भाग वेगवेगळ्या स्वरूपात आत्म्यास प्राप्त होतो.
पितृलोकाची आधिष्ठात्री असणारी ‘आर्यमा’ ही देवता श्राद्धकर्मात उपस्थित असते. श्राद्धात प्राप्त झालेल्या हविर्भागाची वाटणी वसु-रुद्र-आदित्य स्वरूपी सर्व पितरांना पोहोचविणे ही आर्यमाची जबाबदारी असते. श्राद्धा मुळे पितृलोकातील आत्म्याची तृप्ती होऊन तो एकतर देवलोकात जातो किंवा पुन्हा मृत्यूलोकात जन्म घेतो. श्राद्धीय हविर्भाग हा देवलोकांतील आत्म्यासाठी अमृत रूपाने तर पुन्हा जन्म घेतलेल्या आत्म्यासाठी अन्नादी भोगांच्या स्वरूपात प्राप्त होतो.
सांप्रत काळात श्राद्ध विधी सांगणारे किंवा श्राद्धान्न ग्रहण करणारे ब्राह्मण उपलब्ध नसणे, आर्थिक दुर्बलता, जागेचा अभाव अशा कारणांमुळे यथासांग श्राद्ध विधी करता येत नाही. यासाठी शास्त्रात विविध विकल्प दिलेले आहेत. हस्तश्राद्ध, आमश्राद्ध, हिरण्यश्राद्ध, चटश्राद्ध इत्यादी... अभावांच्या परिस्थितीत अशा अनेक प्रकारांनी पितरांच्या तृप्तीसाठी श्राद्ध करता येते. यासाठी श्राद्धकर्त्यांने मनात प्रामाणिक श्रद्धाभाव ठेवून पितरांच्या उन्नतीची कामना करत त्याच्याबद्दल आदर व्यक्त करणे आणि श्राद्ध कर्म करण्यात असणारी स्वत:ची असमर्थता व्यक्त करून क्षमा याचना करणे अपेक्षित असते. श्रद्धेने केले जाणारे श्राद्ध हे पितरांना गती देतेच, परंतु श्राद्ध कर्त्याच्या प्रगतीसही सहाय्यक ठरते.