संप मिटुनही ग्रामविकास अधिकार्‍यांचे दर्शन नाही

    दिनांक :21-Sep-2019
उंबर्डा बाजार,
ग्रामसेवक संघटनेचा विविध मागण्यासाठी सुरू असलेला लक्षवेधी संप संपून जवळपास 9 दिवसांचा कालावधी संपला असतांना उंबर्डा बाजार गावासाठी नियुक्त ग्रामविकास अधिकार्‍यांने ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली नसल्याने ग्रामस्थांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असतांना गटविकास अधिकार्‍यांचे या प्रकाराकडे होत हेतुपुरस्सर दुर्लक्ष ग्रामस्थांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे.
 

 
 
सविस्तर असे की, गेल्या काही दिवसांपासून ग्रामविकास अधिकार्‍यांने ग्राम पंचायत कार्यलयाला भेट दिली नसल्याने ग्रामस्थांना वेळेवर विविध प्रकारचे दाखले मिळत नसल्याने विविध कल्याणचारी योजनापासुन वंचित रहाण्याची पाळी आली आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने गेल्या महिन्यापासून ग्रामविकास अधिकार्‍यांचे लक्ष नसल्याने गावात घाणीचे साम्राज्य निर्माण होवून गावात साथ रोगा ची लागण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. विशेष महत्त्वाचे म्हणजे ग्रामविकास अधिकार्‍यांच्या अनुपस्थितीमुळे ग्रामपंचायत च्या महसुल वसूली ठप्प झाल्याने ग्राम विकासाला खिळ बसली आहे. ग्रामविकास अधिकार्‍यांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामवासियांना विविध दाखल्या पासुन वंचित रहावे लागत असल्याच्या अनेक तक्रारी आजतागायत गटविकास अधिकार्‍यांकडे करण्यात आल्या. मात्र, एखाद्या तरी तक्रारीची दखल गटविकास अधिकार्‍यांनी घेतल्याचे आज तरी ऐकिवात नाही.संबंधित विभागाच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी या उंबर्डा बाजार ग्रामपंचायत कार्यालयाला आकस्मिक भेट देवून दोषींवर कडक कारवाई ची मागणी ग्रामस्थानी केली.
 
कारंजा पंचायत समिती चे उपसभापती श्रीकांत खंडागळे यांचे सह पंचायत समिती सदस्य रवि भुते, राजु भोजने, ग्रामविस्तार अधिकारी घुगे तथा मेटे यांनी 4 फेब्रुवारी रोजी उंबर्डा बाजार ग्रामपंचायत कार्यालयाला आकस्मिक भेट दिली असता कार्यालय कुलपबंद आढळून आले होते हे विशेष. ग्रामविकास अधिकार्‍यांच्या अनुपस्थिती बाबत गटविकास अधिकारी तापी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.