शिवसेना : व्हर्जन 2.0

    दिनांक :22-Sep-2019
डॉ. परीक्षित स. शेवडे
 
 
2019 च्या लोकसभेपूर्वी आमच्या काही पत्रकार बांधवांनी भाजप सत्तेबाहेर राहणार असून शिवसेनेला जेमतेम एक आकडी जागाच मिळतील, म्हणून अंदाज वर्तवला होता. प्रत्यक्षात मात्र सेनेने मुसंडी मारत 2014 पेक्षाही अधिक म्हणजे 18 जागा जिंकल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या पाच वर्षांत खेळलेली राजकीय खेळी ही जबरदस्त असून शिवसेनेला लोकसभेत फायदा मिळवून देणारी आहे, हे मत मी वारंवार मांडत होतो, तेव्हा काही राजकीय तज्ज्ञांना ते पटत नव्हतं. आमच्या काही पत्रकार बांधवांनीही ग्रामीण मतदार हा सेनेपासून दुरावला आहे, वगैरे मतं मांडून आमचे आडाखे कसे चूक आहेत, याबाबत अनेकदा चर्चा केली होती. मा. शिवसेनाप्रमुखांनंतर आता सेना संपली, ही आरोळी ठोकणार्‍या लोकांना उद्धवजींनी त्यांच्या कामातून दिलेले उत्तर बहुधा अजूनही पचनी पडले नसावे. त्यामुळे पुन्हा तीच चूक करणे सुरू राहिले. दुसरीकडे काही भाजप समर्थक वा काही तटस्थ यांना सेनेचे धोरण आडमुठेपणाचे वाटत असल्याने सेनेने जनतेचा विश्वास गमावला असल्याचा साक्षात्कार होत होता. दुर्दैवाने या लोकांनी अमित शहा वा देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या आपल्याच पक्षाच्या राजकीय धुरंधरांच्या मताकडे दुर्लक्ष केले होते. युती पुढेही टिकेल, हे शाह आणि फडणवीस कायम सांगत होते, याकडे दुर्लक्ष करून चालेल का? 

 
 
‘रालोआ’मधला दुसर्‍या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून जो मान सेनेला अपेक्षित होता, तो मिळत नसल्याने मागील विधानसभेपूर्वी धुसफूस होतीच, शिवाय भाजपने ‘शत-प्रतिशत’चा नारा दिल्यावर आपणही पूर्ण स्वबळावर पक्ष पुढे नेण्याची संधी उद्धवजींना आयतीच मिळाली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या संधीचा लाभ घेत सामान्य जनतेशी संवाद साधत आणि निवडणुका नसतानाही सातत्याने विविध कामांचा ग्रामीण पातळीवर पुरवठा करत सेनेने या संधीचे सोने केले. एका बाजूने शेतकर्‍यांना पीकविमा मिळावा म्हणून भूमिका आग्रही घेतली, तर दुसरीकडे थेट अयोध्येत जाऊन राम मंदिराबाबत आपण आग्रही असल्याचे ठणकावून सांगितले. दरम्यानच्या काळात उद्धव यांच्या या सार्‍या राजनैतिक डावपेचांची खिल्ली उडवली गेली. अगदी शेलक्या पद्धतीने त्यांचा उद्धार करण्यात आला. मात्र ते आपल्या आखीव रणनीतीनुसार पुढे सरकत राहिले. एकीकडे सत्तेत असताना योग्य धोरणांना पािंठबा देत दुसरीकडे भाजपच्या विरुद्ध बरेच प्रादेशिक पक्ष कॉंग्रेसह एकवटत असल्याचे दृश्य उभे राहताच त्याचाही लाभ सेनेने करून घेतला आणि त्याचीच परिणती म्हणजे मित्रपक्ष म्हणून आपल्या हक्काचा सन्मानदेखील त्यांनी मिळवला.
 
 
शिवसेनेचे यंदाच्या लोकसभेतील यश हे वाखाणण्याजोगेच आहे. त्या यशानंतरही सेना नेतृत्वाने दिलेली नम्र प्रतिक्रिया ही अधिक महत्त्वाची आहे. निकालानंतरच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांच्या पराजयाबाबत प्रश्न विचारल्यावर उद्धव यांची प्रतिक्रिया होती- ‘‘कोणाच्या पराभवाची चर्चा आज कशाला? कोणत्याही पक्षाच्या विजेत्यांना मी शुभेच्छा देतो आणि इतरांच्या पराजयाच्या चर्चेपेक्षा आमचा विजय साजरा करण्याकडे लक्ष देऊया!’’ चार तगडे उमेदवार पडूनही सेनेने 18 जागा आणल्या. विशेष म्हणजे- या चार जणांच्या पराजयाबाबतही कित्येक शिवसैनिकांनी मोकळेपणाने आपल्या कमतरतांवर बोट ठेवले. राजकारणात जय-पराजय सुरूच असतो, त्याचे विश्लेषण आवश्यक असते.
 
 
‘आताची सेना पूर्वीसारखी नाही राहिली!’ हा शेरा अगदी हमखास ऐकू येतो. खरेच आहे ते! सेना पूर्वीसारखी राहिली नाही; पूर्वीपेक्षा बळकट झाली आहे! नेते-उपनेत्यांची फळी, अन्य पक्षांतून झालेले ‘इन्किंमग’ आणि कित्येकांची घरवापसी यांच्या जोडीलाच राज्य पातळीवर डॉ. नीलम गोर्‍हे, अॅड. अनिल परब तर राष्ट्रीय पातळीवर प्रियांका चतुर्वेदीसारख्या प्रवक्त्या सेनेकडे आहेत. त्या व शीतल म्हात्रे, कामिनी शेवाळे या महिला नेत्यांमार्फत होत असलेला ‘प्रथम ती!’ हा उपक्रम, शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांच्या ‘भावजी!’ छवीचा उपयोग करून घेणारा ‘माऊली संवाद’ तर स्वतः युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे ‘आदित्य संवाद!’सारखे उपक्रम हाती घेत तरुणांशी थेट साधत असलेला संवाद आणि जोडीला ‘जन आशीर्वाद यात्रा’च्या निमित्ताने केलेला राज्यभराचा प्रवास हे अधोरेखित होणारे बदल आहेत. यातील बरीच आखणी प्रशांत किशोर यांच्या मार्गदर्शनाने झाली असण्याची पूर्ण शक्यता आहे. पण त्याची अंमलबजावणी उत्तम होताना दिसत आहे. पन्नाशी गाठलेल्या राजकीय पक्षातील हे तारुण्य कौतुकास्पद आहे. सोशल मीडियावर शिवसेनेचा वावर अत्यंत प्रभावीपणे होत आहे. या सार्‍यांमध्ये विशेष कौतुक करावेसे वाटते ते, आदित्य ठाकरे यांचे! नव्या पिढीतील एक समजूतदार राजकारणी म्हणून त्यांच्याकडे निश्चिणतपणे बघता येऊ शकेल. बडेजाव न करता सहजसुलभतेने वावरत असल्याने ते तरुणांशी सहज जोडले जातात. कदाचित येणार्‍या निवडणुकीला उभे राहणारे पहिले ठाकरे म्हणून आदित्य ठाकरे दिसू शकतील. 80% समाजकारण 20% राजकारण हे सूत्र स्व. शिवसेनाप्रमुखांनी सांगितले होते. शिवसेनेचे आताचे राजकारण हे अकारण भावनिक न होता मुरब्बीपणे खेळलेले राजकारण आहे.
 
 
शिवसेनेकडे दोन विशेष बलस्थाने आहेत. एक म्हणजे- ‘शिवसैनिक!’ तर दुसरे म्हणजे- ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे!’ अत्यंत शांत डोक्याने आणि संयत पद्धतीने राजकारण हाताळणारे उद्धव हे सेनेचा आलेख सतत उंचावत आहेत. आपल्या याच खेळीने त्यांनी टीकाकारांचे तोंड बंद केले आहे तर विरोधकांच्या तोंडचे पाणी पळवलेदेखील आहे. ‘आवश्यकता भासलीच तर शिवसैनिक रस्त्यावर जरूर उतरेल पण तोवर विनाकारण माझ्या शिवसैनिकांना पोलिस केसेस कशाला घ्यायला लावू?’ या परिपक्वतेने वाटचाल केल्यानेच उद्धव यांनी बाळासाहेबांच्या पश्चात शिवसेना टिकवलीच नव्हे, तर जोमाने वाढवली आहे. मागील विधानसभेच्या वेळी घटस्थापनेच्या मुहूर्तावरच युतीचा घटस्फोट झाला होता. यंदाच्या विधानसभेत ‘आरे’चे कारण पुढे करत तोच कित्ता गिरवला जाणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. राजकारणात ही बेरीज वजाबाकीची समीकरणे सुरूच असतात. काही खेळी मात्र काळानुसार बदलाव्या लागतात. शिवसेनादेखील तेच करत आहे. ‘पूर्वीची सेना नाही!’ हा शेरा मारणार्‍यांनी ही नव्या दमाची नवी शिवसेना आहे, हे आतातरी लक्षात घ्यायला हवे. आताच्या वेगाने आणि दिशेने वाटचाल सुरूच राहिली तर आपले अस्तित्व अबाधित ठेवण्याची पुरेपूर संधी सेनेकडे आहे. निवडणुकीपूर्वी भांडून सत्तास्थापना करताना मात्र भाजप-सेना एकत्र येतात; असा आरोप अनेकदा केला जातो. जणू काही कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे संपूर्ण कार्यकाळ गळ्यात गळे घालून सुखानेच नांदत होते!
 
0251-2863835
(लेखक हे ‘आयुर्वेद वाचस्पति’, व्याख्याते, इतिहास अभ्यासक, राजकीय समीक्षक आहेत.)
••