जर्मन राजदूतांची भेट आणि अकारण वाद!

    दिनांक :22-Sep-2019
डॉ. मनमोहन वैद्य 
 
भारतातील जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे लिंडनर यांच्या, नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाच्या, मागे झालेल्या भेटीवरून विनाकारण वाद उभा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. नागपूर किंवा दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाला भेट देणारे लिंडनर हे काही पहिले राजदूत किंवा परदेशी रायनयिक नाहीत. अशा भेटी, चहा किंवा भोजनासोबत विचारांच्या आदान-प्रदानाच्या सहज परिपाठीचा भाग राहिला आहे. हे मात्र तितकेच खरे आहे की, अशाप्रकारची भेट सार्वजनिक करणारे ते पहिले राजदूत आहेत.
 
 
भारतात, ‘वाम-उदारवादी’ (लेफ्ट-लिबरल) या नावाची एक जमात, विशेषत: काँग्रेसच्या शासनकाळात, सत्तेच्या सहकार्याने व संरक्षणात फळली-फुलली आहे. ‘वाम-उदारवादी’सारख्या या विरोधाभासी शब्दाला कुणी प्रचलित केले मला माहीत नाही. कारण, प्रत्यक्ष व्यवहारात या जमातीचे आचरण अगदी याच्या विपरीत, अत्यंत ‘संकुचित’च दिसून येते. खरेतर हे लोक, जे त्यांच्या विचारांशी सहमत नाहीत, त्यांच्याप्रती अतिशय संकुचित व असहिष्णू असतात. याच लोकांनी सतत खोट्या व निराधार आरोपांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध तसेच निषेध केला आहे आणि संघकार्याची गती रोखण्याचे भरभक्कम प्रयत्नही केले आहेत. परंतु, संघ कार्यकर्त्यांचे निरंतर अथक प्रयत्न तसेच ईश्वराच्या कृपेने भारतभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भौगोलिक आणि संख्यात्मक विस्तार तसेच प्रभाव सातत्याने वाढतच आहे. दुसरीकडे, या ‘संकुचित-वाम’ गटाची चमक फिकी पडू लागली आहे, लोकांमधील चर्चा आणि जनमानसावर यांची पकड सैल होत चालली आहे. भारतातील जनतेने यांच्या दांभिक, भेदभावपूर्ण आचरणाला आणि अहंभावाला ओळखले असून आता ती त्यांचा विरोधही करीत आहे.
 

 
 
भारताच्या संविधानात पूर्णत: अभिव्यक्त झालेली भारताच्या निर्मात्यांच्या मनातील भारताची संकल्पना असा भारत आहे की, जो बहुलतेवर (प्ल्युलॅरिस्ट) विश्वास ठेवणारा, विविधतेचा उत्सव मानणारा, एकत्र येऊन मोकळ्या मनाने स्वस्थ-चर्चा, वादविवाद करणारा आहे. संकुचित वामपंथ याच्या अगदी उलट आहे. ज्या वेळी माजी राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना संबोधित करण्यासाठी आमंत्रित केले गेले होते, तेव्हा याच जमातीने संघाचे निमंत्रण स्वीकारले म्हणून डॉ. मुखर्जींची कडक निंदा केली होती. डॉ. मुखर्जी यांच्याकडे सार्वजनिक जीवनाचा प्रदीर्घ अनुभव आहे, सोबतच ते एक अनुभवी राजकीय नेते आहेत. ते आयुष्यभर काँग्रेस पक्षासोबत निष्ठेने राहिले आहेत. असे असतानाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वयंसेवकांना संबोधित करण्यासाठी त्यांना आमंत्रित करणे, हा संघाच्या मुक्त व उदार मानसिकतेचा पुरावा आहे. परंतु, ज्या मंडळींनी याचा विरोध केला, त्यातून त्यांची संकुचित, असहिष्णू मानसिकताच उघड झाली. जेव्हा जयपूर साहित्य समारोहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकार्‍यांना आमंत्रित करण्याला याच मंडळींनी तीव्र विरोध केला आणि शेवटी पूर्ण कार्यक्रमावरच बहिष्कार टाकला होता, तेव्हाही या मंडळींच्या संकुचित मानसिकतेचेच प्रदर्शन झाले होते.
 
 
इतक्यातच जर्मन राजदूतांच्या नागपूर दौर्‍यावर टीका करणार्‍या एका लेखाने माझे लक्ष वेधले. हा लेख विद्वत्तापूर्ण शैलीत लिहिलेला, परंतु असत्याचा गोळा होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात इतरही लेखांद्वारे होत असलेल्या सुनियोजित दुष्प्रचाराचा हा लेखही एक भाग होता, असे म्हणता येईल.
 
 
या दुष्प्रचारात सर्वात मोठा खोटारडेपणा हा असतो की, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिटलरला पूजतो, त्याचा सन्मान करतो.’ वस्तुस्थिती यापासून फार फार दूर आहे. मी चार दशकांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सक्रिय जुळलो आहे. मी कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुठल्याही वरिष्ठ अधिकार्‍याला हिटलर अथवा नाझीवादाचे गुणगान करताना ऐकले नाही. उलट, मी संघाच्या अधिकार्‍यांकडून अगणित वेळा इस्रायल, त्याची वीरतापूर्ण देशभक्ती, राष्ट्रीय एकता व निष्ठा याच्या संदर्भात स्तुतीच ऐकली आहे. महाविद्यालयीन जीवनात मी लियोन उरिस यांची ‘एक्झोडस’ कादंबरी वाचली होती आणि इतरांनी ती वाचावी म्हणून शिफारसही केली होती. त्यात 1800 वर्षांच्या निष्कासनानंतर प्रत्यक्षात धरतीवर साकार झालेल्या इस्रायलच्या निर्मितीची रोमांचकारी व प्रेरक कथा सांगितली आहे.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक, आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांच्या पहिल्या अधिकृत चरित्राचे लेखक ना. ह. पालकर यांनी इस्रायलच्या या विजयी कामगिरीवर ‘संघर्षाकडून बळाकडे’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. हे खरे की, मी हिटलरवरील एक पुस्तक महाविद्यालयीन जीवनात वाचले होते आणि त्याचे नाव होते- नाझी भस्मासुराचा उदयास्त.
 
 
मीडिया आणि बुद्धिजीवी मंडळींमध्ये अस्तित्वात असलेली ही असहिष्णू जमात नेहमीच मा. स. गोळवलकर यांचे ‘वुई अँड अवर नेशनहूड डिफाइण्ड’ या पुस्तकाला उद्धृत करत असतात. हे पुस्तक प्रथम 1938 साली प्रकाशित झाले. त्या वेळी श्रीगुरुजी गोळवलकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी नव्हते. हे पुस्तक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे प्रतिनिधित्व करीत नाही. मुळात हे पुस्तक, विनायक दामोदर सावरकर यांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकर यांच्या एका मराठी पुस्तकाचा अनुवाद होता. हे मा. स. गोळवलकर यांनी लिहिलेले नाही.
 
 
इकॉनॉमिक टाईम्सला (8 सप्टेंबर 2016) दिलेल्या एका मुलाखतीत नाथूराम गोडसे आणि वीर सावरकर यांची नात- सात्यकी सावरकर यांनी म्हटले होते- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक मा. स. गोळवलकर यांनी, बाबाराव सावरकरांच्या ‘राष्ट्र मीमांसा’ पुस्तकाच्या अनुवादाचे श्रेय घेतल्यावरूनच नाथूराम गोडसेसोबतच्या त्यांच्या संबंधांत कटुता आली होती. मा. स. गोळवलकर उपाख्य श्री गुरुजी यांनी 1972 साली पत्रकार सैफुद्दीन जिलानी यांना एक सविस्तर मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी अल्पसंख्यकांच्या (विशेषत: मुसलमान) संबंधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दृष्टिकोन स्पष्ट केला होता. हे वामपंथी तथाकथित शिक्षणतज्ज्ञ आणि विद्वान या मुलाखतीचा कधी उल्लेख करीत नाहीत किंवा त्याचे उद्धरणही देत नाहीत. कारण, त्यात जे सत्य आहे, ते त्यांच्यासाठी सोयीचे नाही. एवढेच नाही, तर हे सत्य त्यांच्या दुष्प्रचाराच्या अभियानाला पुरेसे उद्ध्वस्त करणारे आहे. मुख्य म्हणजे ही मुलाखत गुप्त नाही, ती प्रकाशित झालेली आहे. वाचकांच्या माहितीसाठी मी त्यातील काही अंश प्रस्तुत करत आहे-
 
डॉ. जिलानी : भारतीयीकरणावर खूप चर्चा झाली, भ्रमदेखील पुष्कळ निर्माण झाले. हे भ्रम कसे दूर करायचे हे आपण सांगू शकाल का?
 
श्री गुरुजी : भारतीयीकरणाची घोषणा जनसंघाने केली आहे. परंतु, या बाबतीत संभ्रम का निर्माण व्हावा? भारतीयीकरणाचा अर्थ सर्वांना हिंदू बनविणे तर नाही आहे! आम्हां सर्वांना हे सत्य समजून घ्यावे लागेल की, आम्ही याच भूमीचे पुत्र आहोत. म्हणून या बाबतीत आपली निष्ठा अविचल असणे अनिवार्य आहे. आम्ही सर्व एकाच मानवसमूहाचे अंग आहोत. आम्हां सर्वांचे पूर्वज एकच आहेत. म्हणून आम्हां सर्वांची आकांक्षादेखील एकसमान आहे- याला जाणणेच खर्‍या अर्थाने भारतीयीकरण आहे.
भारतीयीकरणाचा हा अर्थ नाही की, कुणी आपली पूजापद्धती त्यागावी. हे आम्ही कधीही म्हटले नाही आणि कधी म्हणणारही नाही. आमचे तर हे म्हणणे आहे की, उपासनेची एकच पद्धत संपूर्ण मानवांसाठी सोयीची नाही.
 
 
गेल्या वर्षी झालेल्या एका व्याख्यानमालेत सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी म्हटले, ‘‘राष्ट्राच्या नात्याने आम्हा सर्वांची ओळख हिंदू म्हणून आहे. काही जण हिंदू म्हणण्यात गौरव अनुभव करतात आणि काहींच्या मनात तितका गौरव नाही. काही हरकत नाही. काही परिस्थितिजन्य कारणांमुळे अथवा राजकीय अपरिहार्यतेमुळे ते सार्वजनिकपणे म्हणत नसतील, परंतु खाजगीत मात्र म्हणत असतात. आणि काही लोक असे आहेत की ते हे सर्व विसरून गेले आहेत. हे सर्व जण आमचे आपले आहेत, भारताचे आहेत. जसे, परीक्षेत प्रश्नपत्रिका हातात आल्यावर आपण सर्वात आधी सोपा प्रश्न सोडवायला घेतो, नंतर कठीण प्रश्नांना हात लावतो, तसेच आम्ही प्रथम, जे स्वत:ला हिंदू मानतात त्यांचे संघटन करत आहोत. आमचा ना जगात, ना देशात कुणी शत्रू आहे. आमच्याशी वैर ठेवणारे लोक असतील, त्यांच्यापासून आम्ही स्वत:ला वाचवत असलो, तरी त्यांना समाप्त करण्याची आमची आकांक्षा नाही. उलट, त्यांना सोबत घेण्याचा, त्यांना जोडण्याचाच आमचा प्रयत्न असतो. खरे म्हणजे हे हिंदुत्व आहे.
 
 
डॉ. मोहनजी पुढे म्हणाले- संविधान सभेत डॉ. आंबेडकर यांनी हेही म्हटले होते की, आमच्या आपसातल्या संघर्षामुळे परदेशी आक्रमक जिंकले आणि आम्हाला गुलाम बनविले. मी डॉ. आंबेडकरांचा भाव कथन करत आहे. त्यांचे नेमके शब्द तुम्ही वाचू शकता. त्यांनी म्हटले की, संसदेत परस्परविरोधी गटात परस्परांचे विरोधी होऊन आम्ही बसलो आहोत. ही व्यवस्थेची अपरिहार्यता आहे. परंतु, असे असूनही आम्ही सर्व एक आहोत. आम्ही असा बंधुभाव उत्पन्न केला नाही, तर आम्हाला कुठले दिवस बघायला मिळतील, सांगता येणार नाही.
 
 
संघ याच बंधुभावासाठी कार्य करतो आणि या बंधुभावासाठी एकच आधार आहे- विविधतेत एकता. परंपरेने चालत आलेल्या या चिंतनालाच जग हिंदुत्व म्हणते. म्हणून आम्ही म्हणतो की, आमचे राष्ट्र हिंदू राष्ट्र आहे. याचा अर्थ यात मुसलमान नको असा अजीबात होत नाही. ज्या दिवशी हे म्हटले जाईल, त्या दिवशी ते हिंदुत्व असणार नाही.
 
 
डॉ. हेडगेवार यांचे चरित्र लिहिणारे लेखक लिहितात की- डॉ. हेडगेवार एक महान देशभक्त आणि स्वत:च्या परिश्रमावर यश प्राप्त करणारे व्यक्ती होते. त्यांनी कुठल्याही व्यक्तीला आपला गुरू किंवा मार्गदर्शक बनविले नाही. खरेतर, विविध क्षेत्रांतील वेगवेगळ्या विचारांच्या लोकांशी त्यांचे अतिशय चांगले संबंध होते. त्यांचे निर्णय स्व-बोध, स्व-विवेक आणि स्वेच्छेने होत असत. लोकमान्य टिळकांप्रती त्यांच्या मनात खूप आदर होता. 1920 मध्ये टिळकांच्या निधनानंतर काँग्रेसचे नेतृत्व सांभाळावे, अशी विनंती योगी अरिंवद यांना करण्यासाठी डॉ. हेडगेवार डॉ. मुंजे यांच्यासह पॉंडेचरीला गेले होते. 1921 साली जेव्हा लोकनायक बापूजी अणे यांच्या अध्यक्षतेत बेरार प्रांताच्या काँग्रेस कार्यसमितीत, स्वातंत्र्यासाठी सुरू असलेल्या क्रांतिकारी आंदोलनाची निंदा करणारा प्रस्ताव येणार होता, तेव्हा डॉ. हेडगेवार यांनी मध्यस्थी करून, असे करण्यापासून कार्यसमितीला परावृत्त केले होते. हेडगेवार क्रांतिकारी चळवळ, काँग्रेसमधील टिळकसमर्थक व गांधीसमर्थक, हिंदू महासभेचे नेते एवढेच नाहीतर, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्त्यांशी समान रूपाने जुळलेले होते.
 
 
डॉ. मुंजे, वीर सावरकर आणि महात्मा गांधींशी त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध होते. ते कधीकधी या मंडळींना स्वयंसेवकांना संबोधित करण्यासाठी आमंत्रितही करत होते; परंतु त्यांनी नेहमीच एक पथ्य पाळले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निर्णय, या नेत्यांनी प्रभावित न होता, स्वयंसेवकांशी चर्चा आणि सर्वसहमतीनंतरच घेतले जातील. डॉ. मुंजे आणि सावरकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे घटक नव्हते. 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या आधी झालेल्या पहिल्या बैठकीत डॉ. मुंजे नव्हते. म्हणून, डॉक्टर मुंजे यांचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मत मानणे चुकीचे होईल. खरेतर, डॉ. मुंजे यांनी लंडन येथील गोलमेज परिषदेत भाग घेण्याला डॉ. हेडगेवार यांनी आपला विरोध दर्शविला होता.
 
 
पुण्यात डॉ. हेडगेवारांच्या एका बैठकीत एका व्यक्तीने ‘कोण मूर्ख म्हणतो की भारत हिंदू राष्ट्र आहे?’ असा प्रश्न विचारल्यावर डॉ. हेडगेवार यांनी, कुठल्याही पुस्तकाचा अथवा विद्वानाचा (वीर सावरकरांचे ‘हिंदूत्व’ हे पुस्तक तेव्हा प्रकाशित झाले होते) संदर्भ न देता शांत, परंतु दृढनिश्चयी स्वरात म्हटले- मी डॉक्टर हेडगेवार म्हणतो की भारत हिंदू राष्ट्र आहे.
 
 
1937 साली विदर्भात, वीर सावरकर यांच्या एक महिना दौर्‍याची योजना बनली. डॉक्टर हेडगेवार या दौर्‍यात पूर्णवेळ त्यांच्यासोबत राहिले आणि दौरा सफल व्हावा यासाठी प्रयत्न केले. सावरकर संघाच्या कामाने प्रभावित झाले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केले आणि संघाचा स्वयंसेवक बनण्याची इच्छा डॉ. हेडगेवारांजवळ व्यक्त केली. त्यावर डॉ. हेडगेवार यांनी नम्रपणे त्यांना समजावून सांगितले की, या उदयोन्मुख संघटनेचे तुम्ही जाहीर सभेत कौतुक केलेत, हेच आमच्यासाठी पुरेसे आहे.
 
 
भारताची परंपरा राहिली आहे की, इथे कुठल्याही धर्मग्रंथ अथवा सिद्धान्ताची वेगवेगळी व्याख्या केली जाते. भगवद्गीतेची अनेक विद्वानांनी तसेच चिंतकांनी वेगवेगळी व्याख्या केली आहे. हीच बाब हिंदुत्वालाही लागू आहे. लोकमान्य टिळकांनी ‘हिंदू कोण आहे’ याची एक व्याख्या केली की, जो कुणी वेदांना मानतो तो हिंदू आहे- प्रामाण्य बुद्धिरवेदेषु उपास्यानाम्‌ अनियम:। परंतु, यात जैन व बौद्ध, भारताचे महत्त्वाचे घटक असूनही सामील होत नव्हते. तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक व्यापक व्याख्या करत म्हटले की, हिमालय ते हिंद महासागरापर्यंतच्या या भूमीत राहणारे व जे या भूमीला पुण्यभूमी व आपली पितृभूमी मानतात ते सर्व लोक हिंदू आहेत- असिंधुसिंधुपर्यंता यस्य भारतभूमिका। पितृभू पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृता।। परंतु, या व्याख्येतून भारतीय ख्रिश्चन, मुसलमान व पारशी सुटत होते. त्यानंतर श्री गुरुजी यांनी हिंदूची याहूनही अधिक व्यापक व्याख्या केली- एक मातृभूमी, समान पूर्वज आणि समान परंपरांनी भारतात राहणार्‍या सर्व लोकांना शतकानुशतकांपासून एक विशिष्ट ओळख दिली आहे. ही ओळख हिंदू आहे. भारतीय संदर्भात, लोकच राष्ट्र निर्माण करतात; राज्य नाही. आम्ही वेगवेगळे शासक अथवा राज्यांशिवाय एक राष्ट्र होतो.
 
 
‘इंडियन आयडिऑलॉजी’ या पुस्तकात लेखक पेरी अँडरसन यांनी महात्मा गांधींना उद्धृत केले आहे- भारतावर कुठलेही आक्रमण होण्यापूर्वीपासूनच निसर्गत: भारत अखंड राहिला आहे. हा भूप्रदेश एका राष्ट्राच्या रूपात सुखाने राहात होता आणि आमच्या पूर्वजांची राष्ट्रीयत्वाची संकल्पना इतकी प्रखर होती की, ती त्यावेळच्या जगातील कुठल्याही भागातील लोकांना समजणे शक्य नव्हती.
 
 
लेखक पुढे लिहितात- या उपखंडाच्या प्राचीनत्वाचे वैशिष्ट्य हे आहे की, येथे कमालीची एकता दिसून येते. येथील सर्व रहिवासी या संपूर्ण दीर्घकाळात जाणीवपूर्वक भारतीय होते. त्यांच्या मानसिकतेत कमालीची एकता होती. ते एकाच परंपरेची अनुभूती घेत. कुठल्याही संस्कृतीचा उदय होण्यापूर्वी सर्व भारतीयांमध्ये एकात्मतेची समान अनुभूती होती.
 
 
ही एकता, हे वैशिष्ट्य ज्याला जग हिंदुत्वाच्या नावाने ओळखते, ते समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये अभिव्यक्त, अनुभूत आणि प्रकट व्हायला हवे. हे हिंदू राष्ट्राचे (समाजाचे) प्रकटीकरण आहे. याचे कुठल्याही रिलिजनशासित राज्यव्यवस्थेशी (theocratic state) कसलेही देणेघेणे नाही. उलट, theocratic state ही संकल्पनाच हिंदुत्व आणि भारतासाठी परकी (alien) आहे.
 
 
आता ‘बंच ऑफ थॉट्‌स’बाबत विचार करू. हे पुस्तक मा. स. गोळवलकर (श्री गुरुजी) यांच्या, 1940 ते 1964 पर्यंत विविध प्रसंगी आणि तत्कालीन विशिष्ट परिस्थितीत व्यक्त केलेल्या विचारांचे संकलन आहे. यात 1964 नंतर 1973 पर्यंत दिलेली व्याख्याने समाविष्ट नाहीत.
 
 
विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी गेल्या वर्षी दिल्लीत आपल्या भाषणात ‘बंच ऑफ थॉट्‌स’चा उल्लेख करीत म्हटले होते की, काही गोष्टी विशिष्ट परिस्थितीत, विशेष प्रसंगाच्या संबंधात बोलल्या जातात. त्या शाश्वत नसतात. गुरुजींचे जे शाश्वत विचार आहेत, त्यांचे एक संकलन प्रकाशित झाले आहे- श्री गुरुजी : व्हिजन अँड मिशन’ या नावाने. यात तात्कालिक संदर्भात आलेल्या सर्व गोष्टी हटवून त्यांचे केवळ सार्वकालिक उपयुक्त विचार ठेवले आहेत.
 
 
‘बंच ऑफ थॉट्‌स’च्या ‘अंतर्गत आव्हाने : ख्रिश्चन, मुस्लिम आणि कम्युनिस्ट’ नावाच्या प्रकरणाचा वारंवार उल्लेख केला जातो. आजच्या संदर्भात याची व्याख्या ‘सुनियोजित ख्रिश्चन कन्व्हर्जन’, ‘जिहादी इस्लामी कट्‌टरवाद’ आणि ‘नक्षलवाद किंवा माओवाद’ या रूपात व्हायला हवी. या सर्व चळवळी संविधान निर्मात्यांच्या परिकल्पित भारताच्या अस्तित्वाला धोका आहेत. सर्व ख्रिश्चन नाहीत; परंतु काही चर्च आणि मिशनरी सुनियोजित कन्व्हर्जन करीत आहेत आणि ते यालाच ‘ख्रिश्चन धर्म’ म्हणून सांगून ख्रिश्चन समाजातील काही लोकांचा छुपा पािंठबा प्राप्त करण्यात सफलही झाले आहे. यामुळेच तर 1967 साली काँग्रेसचे सरकार असताना मध्यप्रदेश आणि ओडिशात पहिला कन्व्हर्जनविरोधी कायदा लागू करण्यात आला. त्या अंतर्गत बळजोरी, धोका-फसवणूक अथवा पैशाची लालूच याच्या आधारे करण्यात येणार्‍या कन्व्हर्जनला बेकायदेशीर ठरविण्यात आले. चर्च आणि मिशनरींनी याचा तीव्र विरोध केला होता.
 
 
याचप्रकारे, भारतातील सर्व मुसलमान नाही, तर काही मुस्लिम संघटना इस्लामच्या नावावर जिहादी कट्‌टरपंथाचा प्रचार व प्रसार करण्यात सामील आहेत आणि ते मजहबच्या नावावर मुस्लिम समाजातील काही लोकांचे समर्थन प्राप्त करण्यात यशस्वी होतात. माओवादी आणि शहरी नक्षल्यांच्या विध्वंसक तसेच विघटनकारी कारवायांवरचा पडदा आता दूर झाला आहे आणि जनता सर्व काही समजून चुकली आहे. तुम्ही कधी कुठल्याही कम्युनिस्ट संघटनेला, नागरिक आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी आपले कर्तव्य बजावताना, नक्षल्यांशी तसेच माओवाद्यांशी लढणार्‍या भारतीय सुरक्षा दलांवर झालेल्या क्रूर हल्ल्यांवर आणि त्यांच्या हत्येवर अस्वस्थ होताना किंवा त्याची निंदा करताना बघितले आहे? हे तेच लोक आहेत जे सुरक्षा जवानांच्या मृत्यूवर मौन राहतात आणि नक्षली व माओवाद्यांच्या विध्वंसक कारवाया थोपविताना, काही उपद्रवी मारले गेले तर आकाश-पाताळ एक करू लागतात. या तीन राष्ट्रविरोधी कारवायांबाबत भारतीय नागरिकांना सावधगिरीचा इशारा देणे अतिशय महत्त्वाचे आणि आवश्यक आहे.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काही बंदी घातलेली संघटना नाही. परंतु, सरकारांनी बर्‍याच वेळा कुठल्याही वैध कारणाशिवाय संघावर बंदी घातली आहे आणि नंतर त्याच सरकारला ही बंदी विनाअट उठवावीही लागली आहे. हे एखादे गुप्त संघटनही नाही. याचे दैनिक कार्यक्रम (शाखा) मोकळ्या मैदानात होत असतात. त्यात कुणीही भाग घेऊ शकतो. संपूर्ण भारतभरात याच्या शाखा आहेत आणि दिवसेंदिवस याचा विस्तार, शक्ती आणि प्रभाव वाढतच चालला आहे. लोकांमध्ये संघाचे लक्ष्य, कार्यप्रणाली आणि स्वरूपाबाबत जाणून घेण्याची जिज्ञासा व उत्सुकता स्वाभाविकपणे वाढत आहे.
 
 
काही वर्षांपूर्वी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे एक प्रतिनिधिमंडळ भारताच्या दौर्‍यावर आले होते आणि त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांशी भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही बैठक झाली तेव्हा मी दिल्लीत होतो. आम्ही चहापानावर विविध मुद्यांवर विचारांचे आदान-प्रदान केले. परंतु, त्यांनी या बैठकीची प्रसिद्धी न करण्याची विनंती केली. त्यांना ही बैठक चीनमधील त्यांच्या शीर्षस्थ नेत्यांपासून लपवायची असावी, असे मला नाही वाटत; उलट, त्यांना भारतातील वामपंथी-संकुचित मीडिया आणि बुद्धिजीवी या बैठकीवर कुठली प्रतिक्रिया देतील याचीच चिंता असावी.
 
 
आम्ही उदार मनाच्या लोकांचे स्वागत करतो. विडंबना ही आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सतत विरोध करणार्‍या संकुचित-वामपंथी बुद्धिजीवी वर्ग आणि मीडियाला संघाच्या कार्यकर्त्यांशी भेटणे आणि संघाला जाणून घेणे यात कधीही रुची नव्हती. जर्मन राजदूतांनी हे जाहीरपणे केले आहे. जर्मन राजदूत वॉल्टर जे लिंडनर यांचा हा उदार आणि निर्मळ दृष्टिकोन स्वागतार्हच आहे.