पंतचा ‘चाफा’ फुलेना

    दिनांक :22-Sep-2019
मिलिंद महाजन
 
 
सध्या भारतीय क्रिकेट वर्तुळ दोन व्यक्तिंच्या सभोवताल फिरताय्‌ असेच काहीसे चित्र आहे. ती व्यक्ती म्हणजे एक एम.एस. धोनी आणि दुसरा ऋषभ पंत. एक मावळता, तर दुसरा उगवता. एक मावळता असला तरी त्याचा लख्ख प्रकाश, तर दुसरा आशेचा किरण. क्रिकेट तसा बेभरवशाचा खेळ. एखादा खेळाडू आज चमकला, तर उद्या धपकन शून्यावर बाद होतो. परंतु हा खेळाचा एक भाग म्हणून शून्यावर बाद झालेल्या खेळाडूला एकदम संघाबाहेर काढत नाही. आज धावा काढल्या नाही तर उद्या काढेल, या आशेने त्याला पुढल्या काही सामन्यात खेळण्याची संधी मिळते. अशाच काही संधीवर संधी दिल्लीच्या पंतांना मिळत आहे. खरे तर हा उगवता तारा इंग्लंडच्या भूमीवरच चमकायला हवा होता. शिखर धवन दुखापतग्रस्त झाला, तेव्हा त्याच्या जागी पंतला संधी मिळाली होती. मोठे व्यासपीठही होते. परंतु राहिले. विश्वचषकात भारतीय संघाच्या अपयशानंतर ज्येष्ठ खेळाडू महेंद्रिंसह धोनीने जणू भारतीय क्रिकेटमधून अंगच काढून घेतले. 

 
 
देशाच्या सेवेसाठी सीमेवर गेला, ही अभिमानाची बाब आहे, परंतु तिकडे भारतीय क्रिकेट त्याचा उत्तराधिकारी म्हणून ऋषभ पंतकडे मोठ्या आशेने बघू लागला, परंतु यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून तो अद्यापही धोनीचा उत्तराधिकारी म्हणून आपली पात्रता सिद्ध करू शकला नाही िंकना संघाला हातभार लावणारी उपयुक्त खेळीसुद्धा करू शकला नाही. तिकडे धोनीने अजूनही मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली नाही. त्याच्या एक महिन्यांच्या विश्रांतीनंतर राष्ट्रीय निवड समितीनेही त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड केली नाही. धोनी थोडा वेगळा विषय झाला आहे, परंतु पंतांचे काय पंतांनी चांगली उद्याचा धोनी होण्याची िंकवा त्यापेक्षा सरस यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून लौकीक मिळविण्याची उत्तम संधी आहे, परंतु पंतची बॅट सध्या कवी वसंत प्रभूंच्या गाण्यातील चाफ्याप्रमाणेच वागत आहे. चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी, काही केल्या फुलेना... त्याची बॅट तळपतच नाही. अनेक क्रिकेटतज्ज्ञ तसेच राष्ट्रीय निवड समितीच्या सदस्यांनीही म्हटले आहे की, ऋषभ पंत अतिशय हुशार खेळाडू आहे, त्याच्या भरपूर प्रतिभा आहे. थोडा संयम बाळगायला हवा. लवकरच त्याला सूर गवसेल. सुनील गावस्कर तर म्हणाले की, आम्ही तर पंतला धोनीचा उत्तराधिकारी म्हणूनच बघत आहो. तोच धोनीची जागा घेऊ शकतो.
 
 
पंत बघा, दिग्गजांचा एवढा तुझ्यावर विश्वास आहे. आता तू हे सर्व बाजूला ठेवून आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करून बिनधास्तपणे फलंदाजी कर, आपल्या नैसर्गिक खेळाचे प्रदर्शन करत स्वतःची फलंदाजी फुलव. आगामी टी-20 विश्वचषकाचा हिरो होण्याची तुला चांगली संधी आहे. तेव्हाच तुझ्या कारकीर्दीला अधिक बहार येईल. अन्यथा किशन, सॅमसन आहे की दारात...
7276377318