डराँव डराँव करणारे बेडूक...

    दिनांक :22-Sep-2019
यादव तरटे पाटील
शालेय मुलांची फेरी काढायचं ठरलं. वन्यजीव सप्ताह सुरू होता. म्हणून मुलांना वेगवेगळ्या वन्यप्राण्यांचे मुखवटे घालायला दिलेत. त्यातल्या काही मुलांनी मुखवटे घालताच डराँव डराँव आवाज करायला सुरवातही केली. मात्र, एक मुलगा माझ्या जवळ येऊन म्हणाला की, मला बेडूक आवडत नाही. मला वाघ आवडतो, मी वाघाचाच मुखवटा घालणार आहे. आमचं संभाषण संपत नाही तोच तिसरा येऊन म्हणाला की, सर, वाघाचं महत्त्व आम्हाला कळलं, पण बेडकाचं काय? मी जरा थबकलो, कारण त्याचा प्रश्न बरोबर होता. कारण सहसा कार्टूनमधेच बेडकाचा आपल्याला परिचय होतो. त्यांच्याबद्दल प्रत्यक्षात फारशी कुणाला माहिती नसते. पूर्वोत्तर देशांमधे काही वर्षापूर्वी अचानक बेडकांची मागणी वाढली होती. भारतात तेव्हा बेडकांच्या शिकारीवर निर्बंध नसल्यामुळे शिकार करणे सहज शक्य होते. यातूनच आता बेडकांची संख्या कमी झाली. शिकार, अधिवास अवनती, मृदा आणि पाण्याचे प्रदूषण यातून बेडकांच्या संख्येवर प्रचंड परिणाम झाल्याचे चित्र आपल्या डोळ्यांसमोर आहे. 

 
 
विशेष म्हणजे शेतात वापरलेल्या कीटकनाशकांमुळे व रासायनिक खतांमुळे प्रदूषित झालेले पाणी यामुळेही बेडूक मृत्युमुखी पडत आहेत. आता मात्र बेडकांना संरक्षण मिळावे, यासाठी त्यांनाही वन्यप्राणी म्हणून अधिक संरक्षण मिळणे गरजेचे आहे. सन 1985 मध्ये भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार बेडकांना पकडणे, त्यांना मारून खाणे आणि शिकार यांवर पूर्णपणे बंदी घातलेली आहे. कायद्याद्वारे दोषी ठरलेल्या आरोपीला पंचवीस हजार रुपये दंड व तीन वर्षे कैद, अशी कडक शिक्षेची तरतूद आहे. जनजागृती म्हणून यासाठी 29 एप्रिल हा दिवस जगभर बेडूक संरक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो. जमिनीवर असलेल्या प्राण्यांपैकी सर्वप्रथम पाण्यात उडी मारण्याचे धाडस जर कुणी केलं असेल तर तो बेडूकच होय. बेडूक हा एक उभयचर प्राणी आहे. बेडकाची अजून एक खासियत म्हणजे तो आपली श्वसनक्रिया फुफ्फुस व त्वचेमार्फतसुद्धा करू शकतो. पाण्यात असताना त्वचेने, तर जमिनीवर असताना फुफुसाचा उपयोग ते करतात. बेडूक हा अन्नसाखळीतला अतिशय महत्त्वाचा घटक आहे. सरडे, पक्षी आणि सापांचं मुख्य खाद्य बेडूक होय; तर कीटकांना खाण्याचं काम बेडूक करतात. या अर्थाने बेडूक शेतकर्‍यांचा मित्रसुद्धा आहे. ही माहिती देताच, त्या मुलाने आनंदाने बेडकाचा मुखवटा घातला.
 
 
बेडूक शीतरक्ताचे प्राणी असून त्यांच्या शरीराचे तापमान बदलत असते. अतिथंड किंवा अतिउष्ण तापमान त्यांना सहन होत नाही. म्हणून हिवाळ्यात ते शीतकालीन समाधी, तर उन्हाळ्यात ते उष्णकालीन समाधीत जातात. यावेळी ते त्यांच्या मेदिंपडातील अन्नाचा उपयोग करतात. बेडकांचे विश्व खूप चमत्कारी असून आपल्या भागात सह्य्राद्री पर्वतात अनेक बहुरंगी बेडूक आपल्याला पाहायला मिळतात. खरं म्हणजे सह्याद्री परिसर हा बेडकांचासुद्धा परिसर आहे. समाधिवस्था संपल्यानंतर बेडूक प्रजननासाठी बाहेर येतात. बेडूक उभयचर प्रकारात मोडतो. मात्र, उभयचरांच्या एकूण प्रजातींमध्ये एकट्या बेडकांची मक्तेदारी दिसून येते. कारण, एकूण उभयचरांपैकी नव्वद टक्के प्रजाती या एकट्या बेडकांच्याच आहेत. भारतातील 235 एकूण उभयचर प्रजातीपैकी किमान 200 हून अधिक प्रजाती केवळ बेडकांच्याच आहेत. बेडकांची गाणी आपल्या कानात घुमत असतात. खरं म्हणजे बेडकांच्या विश्वातले सारे वातावरणही उल्हादायक आहे. विविधरंगी, बहुआकाराचे आणि हर तर्‍हेचे बेडूक आपल्याला पाहायला मिळतात. कधी जमिनीत, कधी पाण्यात, तर कधी झाडावर विश्रांती घेत बसलेले बेडूक आपल्याला मोहून टाकतात. बेडकांचा आवाजही ऐकायला मजेशीर वाटतो. दर पाच सेकंदाने सातत्यपूर्ण येणार्‍या त्याच्या आवाजातही वेगवेगळ्या तर्‍हा असतात. आपल्या भागात साधारणतः कास्य बेडूक, आखूडतोंड्या, जमीन खोदणारा बेडूक, इंदिराना बेडूक यांच्यासह अनेक महत्त्वाच्या प्रजातींचा वावर आहे. आवाज काढताना बेडकांचे फुगलेले स्वरकोश पाहताना एक वेगळीच मजा येते. आपल्या भागातील कॉमन टोड बेडकांचं रुद्र रूप पाहण्यासारखं असंच आहे.
 
 
बर बेडकांना माणसांची भाषा कळत असावी का? याचं उत्तर हो असंच आहे. कारण बेडूक बोलतात आणि त्यांनाही भावना आहेत. माणसाचा आवाज कानी पडताच बेडूक शांत होतात. कधीकधी तर आपल्या सावलीलाही ते घाबरतात. विणीचा हंगाम सुरू होताच बेडूक रात्रीच आपल्या प्रेयसीला साद घालतात. पावसाळा सुरू झाला की, ग्रामीण भागात बेडकाची पिले घरात घुसण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी बेडकांना हळदकुंकू लावले जाते आणि त्यांना सुखरूप घराबाहेर सोडण्याची परंपरादेखील आहे. बेडकालाही जगण्याचा हक्क आहे आणि त्यांच्या भावनेची कदर आपल्या संस्कृतीत केली जाते. मात्र, बेडकांचा सामूहिक डरॉंव डरॉंव असा आवाज हल्ली कमी ऐकू येतोय. सिमेंटच्या जंगलात बेडकांची वसतिस्थाने कधीचीच धोक्यात आली आहेत; तर काहींची प्रदूषणामुळे परिस्थिती अतिशय बिकट आहे. कारण शहरातून बेडूक जवळपास हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत. बेडकाला खाणारे साप, बेडकांना खाणारे पक्षी, बेडकांना खाणारे सरडे, तर कीटकांना खाणारे बेडूक, असं हे संपूर्ण चक्र प्रभावित झालंय. बेडकांच्या दुनियेची अशी गत होईल, हे कल्पनेतही वाटलं नव्हतं!