निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाशिममध्ये जिल्हाधिकाऱ्यांची बैठक

    दिनांक :22-Sep-2019
 वाशीम, 
भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व शासकीय विभागांनी जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी ऋषीकेश मोडक यांनी दिल्या. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीविषयी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित सर्व शासकीय विभाग प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी उपवन संरक्षक सुमंत सोलंकी, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख व निवडणूक विषयक नोडल अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मोडक म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार 21 ऑक्टोंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. आदर्श आचारसंहिता कालावधीत शासकीय वाहन, शासकीय कार्यालये अथवा कोणत्याही शासकीय इमारतीचा राजकीय कारणासाठी वापर केला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले विविध राजकीय जाहिरात फलक, मजकूर व झेंडे काढून घेण्याची कार्यवाही सर्व नगरपरिषदा व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पूर्ण करून त्याचा अहवाल जिल्हा निवडणूक कार्यालयाला सादर करावा.
 
 
 
आदर्श आचारसंहितेचा भंग होईल, अशी कृती कोणत्याही शासकीय विभागाकडून होता कामा नये. निवडणूक कामकाजात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नका. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीविषयी कोणत्याही स्वरूपाच्या शंका असल्यास संबंधित शासकीय विभागांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आदर्श आचारसंहिता कक्षाशी संपर्क साधून शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी केले.
उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक खर्च सनियंत्रण समिती तसेच माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीसह इतर समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच नोडल अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली असून, सर्व समित्या आणि नोडल अधिकारी यांनी आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडून निवडणूक शांततामय व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी मोडक यांनी यावेळी दिल्या.