मोबाईल वापरात भारत अग्रेसर

    दिनांक :23-Sep-2019
भारतीय मोबाईलधारक मोबाईल डेटा वापरण्यातही आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे. ‘टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया’(ट्राय)ने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. भारतीय नागरिक दर महिन्याला सरासरी 8 जीबी (गिगाबाईट्‌स) एवढा डेटा वापरतात असं या सर्वेक्षणात आढळून आलं आहे. गेल्या वर्षीच्या मानाने या वर्षी हे प्रमाण तब्बल 75 टक्क्यांनी वाढलं आहे.
 
मोबाईल सेवांच्या दरांमधील या युद्धामुळे ग्राहकांचा फायदा झाला असून त्यांना अगदी स्वस्तात 4 जी तंत्रज्ञान वापरायला मिळत आहे. यामुळेच मोबाईल डेटा वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे. मोबाईलचा मोठ्या प्रमाणावर वापर करणार्‍या अमेरिका, युके, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि जपान या देशांच्या पंक्तीत भारताचं स्थान अव्वल आहे. अमेरिकेतील मोबाईलधारक महिन्याला सरासरी 4 जीबी एवढा डेटा वापरतो. हेच प्रमाण दक्षिण कोरियात 6 जीबी, जपानमध्ये 4.5 जीबी आणि सिंगापूरमध्ये 3 जीबी एवढं आहे. 
 
 
2017 ते 2018 या एकाच वर्षात मोबाईल डेटा वापरण्याची सरासरी किंमत 40 टक्क्यांनी खाली आली. 2014 चा विचार केल्यास ही किंमत तब्बल 96 टक्क्यांनी खाली आली आहे. डेटा वापरण्याची सरासरी किंमत खूपच कमी झाली असली तरी अधिकाधिक ग्राहकांनी डेटा वापरण्यास सुरूवात केल्याने कंपन्यांना डेटावापरातून मिळणार्‍या उत्पन्नात 41 टक्क्यांची वाढ झाली आहे. एअरटेलचं प्रति मोबाईलधारक प्रतिमहिना उत्पन्न 127 रुपये होतं तर जिओ आणि व्होडाफोन-आयडियाचं उत्पन्न अनुक्रमे 122 आणि 108 रुपये एवढं होतं. पुढच्या दोन वर्षांमध्ये मोबाईल डेटाचा वापर 200 टक्क्यांनी वाढून 2020 पर्यंत डेटाचा वापर वर्षाला 100 दशलक्ष जीबी एवढा असेल असं भाकीत ट्रायने वर्तवलं आहे.