निवृत्तीपश्चात उत्पन्नासाठी...

    दिनांक :23-Sep-2019
महेश जोशी
वैद्यकीय क्षेत्रातल्या नवनवीन शोधांमुळे दीर्घायुषी असणं ही कल्पनेतली बाब राहिलेली नाही. परंतु त्यामुळे निवृत्तीनंतर सुमारे 25-30 वर्षांपर्यंतची आर्थिक तरतूद करणं अपरिहार्य बनलं आहे. त्यासाठी साठीपर्यंत आपला मासिक खर्च किती असू शकेल याचा अंदाज घेऊन नोकरी किंवा व्यवसायाच्या सुरुवातीपासूनच गुंतवणुकीला सुरुवात केली पाहिजे. यातून सामान्यजनांना अनेक ध्येयं साधता येतील. 
 
 
अनेक लोकांना वाटतं की, निवृत्तीसाठी करायचं नियोजन ही गुंतागुंतीची प्रक्रिया असते. परंतु प्रत्यक्षात तसं नसतं. प्रत्येकाने जास्तीत जास्त बचत करावी आणि शक्य असेल तितकी गुंतवणूकही करावी. जितक्या लवकर गुंतवणुकीला सुरुवात केली जाईल, तितक्या लवकर अधिक पैसे मिळतील. हिशेबातल्या गुंतागुंतींची भीती वाटत असेल तर काही सोपे उपाय योजा आणि गुंतवणुकीला सुरुवात करा. त्यामुळे आपल्याला निवृत्तीनंतरचं आयुष्य सुखानं जगायचं असेल तर किती रक्कम बाजूला ठेवली पाहिजे याचा नेमका अंदाज येईल.
 
 
पहिल्यांदा सर्व स्रोतांपासून तुम्हाला मिळणारं एकूण मासिक उत्पन्न किती आहे त्याचा विचार करा. त्यानंतर तुम्हाला निवृत्तीनंतर मासिक किती खर्च करावा लागणार आहे याचा अंदाज घ्या. तुमच्या सगळ्या खर्चांची यादी तयार करा. किराणा माल आणि वीज, मोबाईल यांची भरावी लागणारी नियमित बिलं यासारखा निवृत्तीनंतरही करावा लागणारा आवश्यक खर्च बाजूला काढा आणि तो एकूण किती आहे याचा हिशेब करा. मात्र त्याच वेळी कामावर जाण्यासाठीच्या प्रवासावर करावा लागणारा खर्च, व्यावसायिक कपड्यांवरचा खर्च आणि तोपर्यंत फेडून पूर्ण झालेले गृहकर्जाचे हत्ते यांचा विचारही जरूर करा. हा खर्च तुमच्या आवश्यक खर्चाच्या यादीतून आता वगळला जाणार आहे. म्हणूनच मासिक खर्च काढताना नियमित खर्चाच्या गोष्टींचाच विचार करा. आधीच्या खर्चाचा आकडा गृहीत धरू नका.
 
 
असं असलं तरी तुमचा वैद्यकीय खर्च कदाचित वाढलेला असेल. त्यामुळे वर उल्लेख केलेल्या आता खर्च कराव्या न लागणार्‍या गोष्टींवरचा पैसा तुम्हाला त्याकडे वळवावा लागू शकेल. म्हणून निवृत्तीनंतरचा खर्च हा शक्यतो नोकरीत असताना कराव्या लागणार्‍या खर्चाएवढाच असू शकला तरी त्याहून तो अधिकच असेल असं गृहीत धरून तजवीज केली पाहिजे. निवृत्तीनंतर तुमच्या एकूण उत्पन्नाचा आकडा मोजा. कंपनीकडून मिळणारी पेन्शन, ईपीएसअंतर्गत मिळणारी पेन्शन, एखाद्या विमा योजनेंतर्गत िंकवा पेन्शन पॉलिसीअंतर्गत मिळणारी रक्कम, मुदत ठेवीवर मिळणारं व्याज या सगळ्याचा यात समावेश करा. त्याचबरोबर मालमत्तेपासून मिळणारं उत्पन्नही विचारात घ्या. सध्याच्या वेतनाच्या आधारावर निवृत्तिवेतनाची रक्कम ठरवा.
 
 
आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे निवृत्तीनंतर किती खर्च करावा लागणार आहे यावरून त्यावेळी किती उत्पन्न असलं पाहिजे ते ठरवावं. समजा, मासिक खर्च चाळिस हजार रुपये असेल आणि अपेक्षित उत्पन्न पंचवीस हजार असेल तर भविष्यात अतिरिक्त पंधरा हजार रुपयांची गरज आहे असा त्याचा अर्थ असतो.
 
 
सध्या अतिरिक्त उत्पन्नाचा आकडा लहान आहे असं वाटू शकतं. परंतु महागाईवाढीमुळे ते कालौघात वाढतच जाणार असतं. हिशेबासाठी महागाईवाढीचा दर सरासरी सहा टक्के गृहीत धरा. अगदी या दरानंही आगामी 30 वर्षांमध्ये मासिक एक लाख रुपयांचा आकडा 5.74 लाख रुपयांपर्यंत फुगू शकतो. इथे तुमचं सध्याचं वय 30 धरलं आहे. आता तुमचं वय याहून कमी म्हणजे 20 वर्षं असलं तर ऐंशी वर्षांपर्यंत म्हणजे तुम्हाला साठ वर्षांनंतरचा खर्च काढायचा असेल तर या महागाईवाढीच्या दरानं 32.99 लाखांवर पोहोचला असेल. म्हणून हा वाढीव खर्च समोर ठेवून बचतीची तरतूद करावी लागेल. आपल्या आजच्या वयानुसार उद्या आवश्यक असलेल्या उत्पन्नाच्या आकड्याचा हिशेब करा.
 
 
साठीनंतर निवृत्त होताना लागणारी एकूण रक्कम किती असली पाहिजे याचा हिशेब करणं ही गुंतागुंतीची प्रक्रिया असते. कारण त्यानंतर व्यक्ती किती वर्षं जगू शकेल हे अनिश्चित असतं. शिवाय त्याच्या मालमत्तांची िंकमत आणि अपेक्षित परतावे यांच्या रकमाही अनिश्चित असू शकतात. म्हणूनच सध्याच्या दीर्घायुष्याच्या काळात आपण 90 व्या वर्षापर्यंत जगू असं गृहीत धरावं, असं जाणकार सांगतात. आतापर्यंत शक्यतो निवृत्तीनंतर इक्विटीतील रक्कम काढून घेऊन मुदत ठेवींमध्ये िंकवा गुंतवणुकीच्या सुरक्षित पर्यायांमध्ये गुंतवली जात असे. परंतु यापुढे असं करून चालणार नाही. कारण यापुढे निवृत्तीच्या वेळी मिळालेली रक्कम किमान 25 ते 30 वर्षं टिकवावी लागेल. म्हणून इक्विटीसारख्या पैशांचं मूल्य मोठ्या प्रमाणात वाढवणार्‍या पर्यायांमध्ये निवृत्तीनंतरही गुंतवणूक केली पाहिजे.
 
 
अगदी निवृत्तीनंतरही 100 उणे तुमचं वय हा नियम पाळला पाहिजे, असं तज्ज्ञ सांगतात. याचा अर्थ वय साठ वर्षं असताना 40 टक्के आणि 70 वर्षं असताना 30 टक्के रक्कम इक्विटीमध्ये गुंतवली पाहिजे. गुंतवणूक पर्यायातून किती परतावे मिळतील याचा अंदाज ही यातली आणखी महत्त्वाची बाब असते. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सेन्सेक्सचा परतावा सहसा 14 टक्के असू शकतो. परंतु तो केवळ 12 टक्के गृहीत धरावा. डेब्ट फंडांसाठी दीर्घकालीन सरासरी परतावा आठ टक्के असतो. महागाईवाढीचा सहा टक्के दर लक्षात घेता डेब्टमधून मिळणारा खरा परतावा हा दोन टक्के असेल.
 
 
वय साठ वर्षं असताना एखाद्याला एक लाख रुपये अतिरिक्त मासिक उत्पन्नाची गरज असेल तर 90 वर्षांपर्यंत 2.57 कोटींची रक्कम टिकवून ठेवावी लागेल. म्हणूनच प्रत्यक्ष गरजेचा हिशेब करा आणि इक्विटीतल्या गुंतवणुकीच्या रकमेचा आकडा ठरवा. लोकांनी विविध पर्यायांद्वारे निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी काही रक्कम गोळा केलेली असते. ती एकत्र करून किती होते याचा हिशेब करावा. ही निवृत्तीच्या वेळी हातात असलेली रक्कम असेल. आता सध्याची रक्कम किती प्रमाणात वाढू शकेल याचा अंदाज बांधू. या ठिकाणी सोयीसाठी आपण मासिक एक लाख रुपये उत्पन्नाची गरज आहे असं समजून हिशेब करत आहोत. तुमच्या प्रत्यक्ष गरजेनुसार यात बदल करा.
 
 
साधारणपणे 100 वजा तुमचं वय या सूत्रानुसार गुंतवणूक करत रहा. असेट अॅलोकेशन खूपच कमी असेल तर तुम्हाला त्याची स्वतंत्रपणे भरपाई करावी लागेल. किती अतिरिक्त रक्कम लागेल त्याचा हिशेब करा. साठीच्या दरम्यान निवृत्तीनंतर किती रक्कम लागणार याचा एकदा हिशेब केला की आपली सध्याची मालमत्ता साठीपर्यंत कितपत वाढेल याचा हिशेब करा. यामुळे आपल्याला किती अतिरिक्त रक्कम लागणार ते लगेच लक्षात येऊ शकतं. तुम्हाला मिळणारी रक्कम तुम्हाला हव्या असलेल्या रकमेतून फक्त वजा केल्यास अतिरिक्त रकमेचा आकडा मिळेल.
 
 
साठीपर्यंत एक कोटीची रक्कम जमा करणं हे 30-35 वर्षांच्या व्यक्तीसाठी अवघड नसतं. या ठिकाणी चक्रवाढव्याजानं मिळणारं उत्पन्न त्यांच्या मदतीला धावून येतं. अशा प्रकारे तुम्हाला किती मासिक रक्कम लागणार आहे ते शोधून काढा. सरतेशेवटी आताच निवृत्तीवेतनासाठी केलेल्या सर्व नियमित गुंतवणुकीची मोजदाद करा आणि अतिरिक्त रक्कम मिळवण्यासाठी आवश्यक असलेला गुंतवणुकीचा आकडा काढा. फक्त डेब्ट फंडांमध्ये गुंतवणूक केलेल्यांसाठी जास्त तर ग्रोथ फंडांमध्ये गुंतवणूक करणार्‍यांना त्या तुलनेत कमी रक्कम गुंतवावी लागेल.