पोहता न येताही पाण्यावर तरंगणारा योगाचार्य

    दिनांक :23-Sep-2019
कारखेडा येथील योगीक चमत्कार
जगदीश जाधव
मानोरा,
भारत ही साधुसंतांची, वेद पुराणांची आणि जगाला सहिष्णुता शिकणार्‍या हिंदुधर्माची तथा शांततेची शिकवण देणार्‍या महात्मा बुद्धाची धरती असून हजारो वर्षापूर्वी महर्षी पतंजली यांनी अनेक वर्षे तपसाधना करुन मानवी शरीरात कुठलीही व्याधी उत्पन्न होऊ नये यासाठी योग हा व्यायामाची ,चिकित्सेची अनमोल देणगी या मानवी जगाला दिलेली आहे.
 
 
 
महर्षी पतंजलीच्या योग्य बळाचा अविष्कार मानोरा तालुक्यातील ग्राम कारखेडा येथील शेतकरी देविदास राठोड यांच्या चमत्कारिक योग साधनेच्या माध्यमाने जनतेला अनुभवाला येत असल्याने सध्या राठोड हे तालुक्यांमध्ये कुतूहलाचे विषय बनलेले आहेत. देविदास थावरा राठोड या जवळपास पन्नास वर्षे वयाच्या आणि वडिलोपार्जित परंपरागत शेती व्यवसाय करणारे कारखेडा येथील शेतकरी आपल्या शेतामधील 40 फूट खोल 22 फूट पाण्याने गच्च भरलेल्या विहिरीत योग साधनेच्या बळावर पूर्णपणे पाण्यावर अर्धा ते पाऊण तास ओम नमः शिवाय चा गजर करून न बुडता खोल विहिरीतील पाण्यात तरंगत राहण्याची किमया करीत असतात. ज्याचे साक्षीदार कारखेडा येथील शेकडो ग्रामस्थ याची देह याची डोळा अनेक वेळा झालेले आहेत. देविदास राठोड यांना पोहायला येत नाही हे विशेष.
देविदास राठोड हे बालवयापासूनच अध्यात्माकडे ओढा असलेले व्यक्तिमत्व असून, सोहमनाथ महाराजांचे परमभक्त आहेत. विविध मांगलिक कार्ये पंचक्रोशीत त्यांच्या हस्ते पार पाडल्या जातात. पंतप्रधान मोदी याांनी ध्यान साधनेला, महर्षी पतंजलीनी दिलेल्या चिकित्सापद्धतीला आणि व्यायाम प्रकाराला भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी समजून योगसाधनेचा प्रचार-प्रसार जागतिक पातळीवर करण्यासाठी प्रयत्नशील असताना कारखेडा सारख्या आडवळणाच्या गावातील शेतकर्‍याला योग साधनेचे महत्त्व कळलेले आहे हे विशेष.
समस्त नागरिकांनी या प्राचीन योग साधनेला अंगीकारावे ज्यामुळे मनस्वास्थ, ताण तणाव आणि वेगवेगळ्या व्याधी पासून आपण दूर राहू शकतो, योग साधना ही अतिशय सोपी आणि विना खर्चिक असून, कुणीही नियमित योगाचा सराव करून निरोगी राहू शकतो, असे तरुण भारत प्रतिनिधीशी बोलताना योगाचार्य तथा शेतकरी देविदास राठोड यांनी सांगितले.