झारखंडमधील चमत्कारी कुंड

    दिनांक :24-Sep-2019
पल्लवी जठार-खताळ
 
तुम्ही भ्रमंतीसाठी बाहेर पडल्यावर, सहलीसाठी गेलेले असताना मोठे जलाशय किंवा लहान जलकुंड अनेकदा पाहिली असतील. काही ठिकाणी औषधी गुणांनी युक्त गरम पाण्याची जलकुंड देखील आपल्या देशामध्ये आहेत. पण आपल्या देशातील झारखंड राज्यामध्ये एक चमत्कारी कुंड आहे. इतके चमत्कारी कुंड अस्तित्वात असेल, अशी कल्पना देखील कधी कुणी केली नसेल. ह्या कुंडाशी निगडीत रहस्याची उकल आजवर वैज्ञानिकांना देखील करता आलेली नाही. 

 
 
 
हे चमत्कारी कुंड आहे झारखंड राज्यातील बोकारो जिल्ह्यामध्ये. एका अहवालानुसार नुसार हे कुंड असे चमत्कारी आहे, की- याच्या काठाशी उभे राहून जर तुम्ही टाळ्या वाजविल्यात, तर या कुंडातील पाण्याची पातळी वाढताना पाहायला मिळते. या कुंडातील पाण्याची पातळी इतकी झपाट्याने वाढते, की- भांड्यामध्ये पाणी उकळून जसे वरवर येऊ लागते, त्याचप्रमाणे कुंडातील पाणी वर येताना दिसू लागते.
 
 
या कुंडाची अजून एक खासियत अशी, की- इथे थंडीच्या दिवसांमध्ये गरम पाणी असते, तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड पाणी या कुंडामध्ये असते. या पाण्यामध्ये स्नान केल्याने त्वचारोग बरे होतात, असे म्हटले जाते. तसेच या पाण्यामध्ये उभे राहून कुठला नवस केल्यास तो नवस फळाला येतो, असे येथील स्थानिक रहिवाश्यांचे म्हणणे आहे. बोकारो शहरापासून सुमारे 27 किलोमीटर अंतरावर असलेले हे कुंड पाहण्यासाठी देश विदेशातून अनेक पर्यटक येथे आवर्जून येत असतात. या कुंडामध्ये टाळी वाजविता बरोबर पाण्याची पातळी कशी वाढते, किंवा ऋतुमानाप्रमाणे पाण्याचे तापमान कसे बदलते हे शोधून काढण्यासाठी अनेक वैज्ञानिकांनी अनेक प्रयोग करून पाहिले आहेत. पण आजतागायत या रहस्याची उकल होऊ शकलेली नाही.
  
 
या कुंडाला ‘दालाही कुंड’ या नावाने ओळखले जाते. या कुंडातील पाणी जमुई नामक नदीमधून येऊन गर्गा नदीला जाऊन मिळते. हे पाणी अतिशय स्वच्छ असून या पाण्यामध्ये औषधी गुण असल्याचे म्हटले जाते. या कुंडाच्या काठावर दलाई गोसाही हे देवस्थान आहे. येथे दर रविवारी होणार्‍या पूजेकरिता भाविकांची गर्दी होत असते.