चालत्या बैलगाडीत संचारला विद्युत प्रवाह एका बैलाचा मृत्यू

    दिनांक :24-Sep-2019
  2 शेतमजूर सुदैवाने बचावले
तिवसा,
शेतातून कामकाज आटोपून घराच्या रस्त्याने परत येणार्‍या बैलगाडीत अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या डीपीतील विद्युत प्रवाह संचारल्याने एका बैलाचा जागीच मृत्यू झाला तर गाडीतील 2 शेतमजूर व एक बैल प्रसंगावधान राखून सुदैवाने बचावले. सोमवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना वरखेड नजीकच्या शेतशिवारात घडली.
 
 
 
अनिल पुरुषोत्तम बोके यांचे वरखेड नजीकच्या शेतशिवारात शेत आहे. नेहमीप्रमाणे त्यांचे शेतमजूर हे बैलबंडीने शेतात कामाला गेले होते. दिवसभराचे काम आटोपून ते बैलबंडीने परत येत असताना उंबरखेड कॅनॉलजवळील पठाळ नामक शेतजवळ एका डीपीचा विद्युत प्रवाह पावसामुळे गटारमय झालेल्या रस्त्यात सर्वत्र संचारला होता. त्या दरम्यान शेतमजूर श्यामलाल ताटे व देवदास धुर्वे हे बैलबंडी घेऊन जात असताना अचानक डीपीतील विद्युत प्रवाह बंडीत संचारला व यात बोके यांचा 50 हजार रुपये किमतीचा धिप्पाड असा बैल जागीच गतप्राण झाला. यातून प्रसंगावधान राखून दोनही शेतमजुरांनी बंडीतून उड्या टाकल्याने त्यांचे व एका बैलाचे प्राण वाचले. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळेच ही घटना घडली असल्याचा आरोप शेतकरी अनिल बोके यांनी केला व सदर डीपीबाबत वीज कंपनीला पूर्वसूचना सुद्धा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यात बळी गेलेल्या बैलाची नुकसान भरपाई वीज कंपनीने देण्याची मागणी तसेच आतातरी नादुरुस्त डीपीला दुरुस्त करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिस व वीज वितरणचे अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.