कारच्या धडकेत चिमुकलीचा करूण अंत

    दिनांक :24-Sep-2019
 
धामणगाव रेल्वे,
आपल्या घरासमोर मुलगी खेळत असताना तिला बोलावण्यासाठी आई गेली असता भरधाव वेगाने येणार्‍या अज्ञात डस्टर गाडीने मायलेकीस उडविल्याने यात पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी झाली. ही घटना सोमवारी सायंकाळी सात वाजता शहरातील दत्तापुर भागात यवतमाळ रस्त्यावर घडली.
 
 
 
सिद्धी पंकज पतालिया (6) असे मृतक चिमुकलीचे नाव असून जखमी आईचे नाव राणी पतालिया (32) आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धी ही आपल्या घरासमोर सायंकाळी सातच्या सुमारास खेळत असताना तीला बोलविण्यासाठी तीची आई गेली. दरम्यान याच वेळी शहरातून यवतमाळकडे भरधाव वेगाने जाणार्‍या अज्ञात डस्टर वाहनाने माय लेकिस उडविले. यात सिद्धीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिचा एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.सिद्धी ही येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होती. तीच्या आईला सुद्धा या अपघातात गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.