आधुनिक तंत्रज्ञानाचे लाभ

    दिनांक :25-Sep-2019
 
राज्यातील काही भाग अजुनही पुरेशा पावसाची वाट पाहत आहे. पुरेशा पावसाअभावी एक तर पेरण्या खोळंबल्या आहेत किंवा पेरलेलं उगवण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे ऐन जुलै महिन्यात यातील काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. आता उर्वरित काळात तरी चांगला पाऊस होणार का, याची चिंता सतावत आहे. एकंदर पुन्हा एकदा दुष्काळाचं सावट निर्माण झालं आहे. खरं तर दुष्काळाचं संकट आपल्याला नवीन नाही आणि आता जगाच्या पाठीवरील विविध देशही दुष्काळी स्थितीला तोंड देत असल्याचं दिसून येतं. परंतु प्रगत देशात आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाच्या मदतीने दुष्काळी स्थितीवर मात करण्याचे यशस्वी प्रयत्न केले जातात, हेही लक्षात घ्यायला हवं. विशेषत: दुष्काळी स्थितीत जगभरातील कृषी विद्यापीठं आणि शेती खातं सरकारच्या सहाय्यानं शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पुढे येतात. 

 
 
आपल्याकडील कृषी विद्यापीठं आणि शेती खातं मात्र बर्‍याचदा दुष्काळाचं आपल्याला काही देणं-घेणं नसल्याच्या पध्दतीनं वागत असल्याचं निदर्शनास येतं. परदेशातील कृषी विद्यापीठे मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने, त्यांच्या कार्यकक्षेत असणार्‍या जमीन, पाणी आणि हरितगृहांचा वापर करून शेतीतील जनावरांसाठी मुबलक चारा उपलब्ध करून देतात. वास्तविक मका किंवा इतर चार्‍यांची पिकं एक ते सव्वा महिन्यात तयार होऊ शकतात. त्याचा विचार आवश्यक ठरतो. या पार्श्वभूमीवर जर्मनीनं सुरू केलेला ‘स्काय फार्मिंग’ या नवीन तंत्रज्ञानाचा वापर चांगलाच फायदेशीर ठरत आहे. या तंत्रज्ञानामुळे पिकं झटपट तयार होतात तसंच त्यांना पाणीही कमी लागतं.
 
 
उदाहरण द्यायचं तर एक किलो तांदळाच्या उत्पादनासाठी पारंपरिक पध्दतीने 900 लिटर पाणी लागते. पण स्काय फार्मिंगच्या तंत्रज्ञानाने केवळ एक लिटर पाण्यावर एक किलो तांदळाचे पीक घेणं शक्य होतं. आपल्याकडे मोबाईल यंत्रणेचे वा अन्य प्रकारचे टॉवर उभे केले जातात तशाच पध्दतीचे टॉवर उभारून ही शेती केली जाते. टॉवर्सप्रमाणेच उंच जिने, किंवा बहुमजली इमारतींची बांधणी करून त्यातील प्रत्येक मजल्यावर वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतली जातात. त्यामुळे कमी जागेत एकाच वेळी अधिक प्रमाणात तसंच वेगवेगळी पिकं घेता येतात. यात सर्वात वरच्या मजल्यावरील पिकांनी आवश्यक तेवढं पाणी शोषून घेऊन राहिलेलं पाणी खालील मजल्यावरील पिकांसाठी वापरात आणता येतं. अशा पध्दतीने पाण्याची बचत होते. एक हेक्टर क्षेत्रावरील अशा पध्दतीचं फार्म टॉवर सात हेक्टर जमिनीइतके काम करू शकतं. याविषयी अधिक माहिती घेऊ इच्छिणार्‍यांसाठी या तंत्रज्ञानाचं प्रात्यक्षिक जर्मनीतील हॅमेनेम कृषी विद्यापीठात उपलब्ध आहे. अशा पध्दतीचे वेगवेगळे, नाविन्यपूर्ण प्रयोग करून त्या देशातील शास्त्रज्ञांनी दुष्काळावर कशी मात करता येते हे दाखवून दिलं.
 
 
एवढंच नव्हे तर, ग्रीन हाऊस वायुमुळे आणि वाढलेल्या प्रेरक परिणामांमुळे पृथ्वीवर येऊ पाहणार्‍या महाविनाशकारी संकटांचाही विचार केला. या शास्त्रज्ञांच्या मते या वातावरणाचा गोड्या पाण्याच्या उपलब्धतेवर मोठा परिणाम होणार असल्याने पावसाचं एका वर्षात पडणारं पाणी किमान तीन वर्षापर्यंत पुरवून वापरावं लागणार आहे. गेल्या काही वर्षात वातावरणातील बदलामुळे एकाच वेळी काही भागात दुष्काळ आणि काही भागात महापूर अशा दुहेरी संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यात सृष्टीतील अनेक प्रजाती नष्ट होऊ लागल्या आहेत. समुद्राची पातळी वाढू लागली आहे. उष्ण कटिबंधात वादळे तयार होणार्‍या भूभागाचे क्षेत्रफळ वाढत चालले आहे. याचा मोठा फटका कृषी क्षेत्राला बसत आहे.
 
 
गेल्या काही वर्षात वाढते औद्योगिकीकरण, सेझ प्रकल्प, मोठ्या प्रमाणावर होत असलेली घरबांधणी तसेच अन्य विकास प्रकल्प, पायाभूत सुविधांवर दिला जात असलेला भर यासाठी शेतजमिनींचा वापर अधिक प्रमाणात होऊ लागला आहे. साहजिक शेतीक्षेत्रात मोठी घट होत आहे. त्याचा या क्षेत्रातील एकूण उत्पादनावरही विपरित परिणाम होऊ लागला आहे. त्यात कधी दुष्काळ तर कधी महापूर तसंच विविध कीडीं, रोगांचा प्रादुर्भाव यामुळेही पिकांच्या उत्पादनात घट होत आहे. दुसरीकडे वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्याच्या दृष्टीने अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ करणं भाग पडत आहे. पण नैसर्गिक वा अन्य संकटांमुळे हा उद्देशही सफल होत नाही. म्हणून सातत्याने येणार्‍या नैसर्गिक संकटांवर मात करत शेती कशी करता येईल आणि अधिक उत्पादन कसे घेता येईल याचा विचार आवश्यक ठरतो. त्याद्वारे या संकटातून दिलासा मिळू शकेल.