अंजनगाव सुर्जीत लाखोंचे सागवान जप्त

    दिनांक :25-Sep-2019
अंजनगांव सूर्जी,
मेळघाट प्रादेशिक वन विभाग परतवाडा अंतर्गत अंजनगाव परिक्षेत्रात येणार्‍या सतीनियत क्षेत्रात अवैध वृक्षतोड करताना आढळून आलेल्या व्यक्तीस अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या माहीत्याच्या आधारावर आज बुधवारी अंजनगाव सुर्जी शहरातून दोन ट्रक सागवान व फर्नीचर वनविभागाच्या अधिकार्‍यांनी जप्त केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
 
 
 
अंजनगांव परीक्षेत्रात येणार्‍या सतीनियत क्षेत्रात अवैध वृक्षतोड करणार्‍या आरोपी राजाराम लक्ष्मण यावलकर रा. काकदरी यास गस्ती दरम्यान अटक केल्यांनतर वनविभागाच्या कोठडीत आरोपीने ज्या ठिकाणी माल पोस्त केला आहे ते ठीकाण दाखवण्याचा होकार दिल्याने वनविभाग व पोलिसांनी संयुक्त कारवाई बुधवारी केली. येथील अजीज फर्निचर येथे तपासणी केली असता. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सागवान फर्निचर आढळून आले. यावर वनविभागाच्या अधिकार्‍यांनी अजीज यांच्याशी संपर्क करून व दस्ता ऐवजाची संपूर्ण पहाणी करुन दस्तऐवज व मालात तफावत आढळल्याने वनविभागाने सपूर्ण सागवान माल जप्त केला. त्याचे वनमूल्य नोंदवून कारवाई केली. संपूर्ण माल दोन ट्रकमध्ये भरून परतवाडा येथे आणण्यात आला.
 
 
अंजनगाव सुर्जी तालुक्याचा बराचा भाग हा मेळघाटला लागून असल्याने येथे मोठ्या प्रमाणात सागवान लाकडाची तस्करी होते. याही अगोदर वनविभागाने अशा प्रकारच्या कारवाया शहरात व तालुक्यात केल्या आहे. परंतु, अवैध सागवान तोडीचा व्यवसाय अजूनही जोरात सूरू असल्याचे आज झालेल्या कारवाई वरुन दिसून आल्याने वनविभागाने यावर बारिक लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. ही संपूर्ण कारवाई विभागीय वन अधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे यांचे मार्गदर्शनात झाली.