पावसाळ्यात कोंबड्यांची काळजी

    दिनांक :25-Sep-2019
 
हवामान बदलाच्या काळात विविध आजार उद्भवत असल्याने खास काळजी घेण्यावर सार्‍यांचा भर असतो. विशेषत: पावसाळ्यात काही विकारांचा प्रसार हमखास होत असल्याचं आढळतं. हीच बाब पशूपालन व्यवसायातही लक्षात घ्यावी लागते. आपल्याकडे शेतीला पूर्वापार कुक्कुटपालनाची जोड मिळाली आहे. आजही अनेक शेतकरी हा व्यवसाय करताना पहायला मिळतात. मात्र, उन्हाळा आणि पावसाळा या ऋतूत कोंबड्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यादृष्टीने पावसाळ्यात कोंबड्यांचं उत्तम व्यवस्थापन कसं करावं हे जाणून घेऊ... 
 
 
मुख्यत्वे पावसाळ्यात दमट वातावरणामुळे कोंबड्यांना विविध विकार होण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने पोल्ट्री शेडची पुरेशी स्वच्छता राखावी. पावसाळ्यापूर्वी शेडची योग्य प्रकारे दुरस्ती करून घ्यावी. शतसंच या शेडमध्ये ओलावा राहणार नाही, पाणी साचून राहणार नाही, हेही पाहणं गरजेचं आहे. शेडच्या बाजुने पावसाचं पाणी सहज वाहून जावं यासाठी योग्य आकाराचे आणि खोलीचे चर खोदून घ्यावेत. शेडमध्ये पुरेसा आणि स्वच्छ सूर्यप्रकाश येणं तसंच हवा खेळती राहणंही गरजेचं आहे.
 
 
या दिवसात कोंबड्यांना वेळेवर आणि पुरेसा खुराक मिळेल याकडे लक्ष द्यावं. खुराकाची जागा स्वच्छ आणि कोरडी असावी. त्याच बरोबर पोल्ट्री शेडमध्ये माशांचा प्रादुर्भाव होणार नाही, याचीही काळजी घ्यावी. या दिवसात ओलीमुळे वा भिजल्याने खाद्याच्या गोण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाठी होण्याची शक्यता असते. असं खाद्य कोंबड्यांना देऊ नये. तसंच गाठी होऊ नये यासाठी खाद्य कोरड्या जागी ठेवावं. कोंबड्यांना पिण्यासाठी शुध्द पाणी द्यावं. त्याच बरोबर त्या पिण्याच्या पाण्यात शिफारशीनुसार योग्य प्रमाणात जंतूनाशकं मिसळणंही महत्त्वाचं ठरतं.
 
 
या दिवसात कोंबड्यांना होणारे विविध आजार, त्यांची लक्षणं यांची माहिती पशूवैद्यकांकडून घ्यावी. तसंच कांेंबड्याची वेळच्या वेळी तपासणी करावी. कोबड्यांच्या लसीकरणाचं वेळापत्रक तयार करून त्याचं योग्य प्रकारे पालन करावं. आजारी कोंबड्यांची स्वतंत्र व्यवस्था करावी.