महात्मा गांधी जयंती निमित्त वाशीममध्ये सायक्लोथॉन स्पर्धा

    दिनांक :25-Sep-2019
वाशीम, 
वाशीम शहर प्रदुषणमुक्त होण्यासोबतच पर्यावरणपूरक सायकलच्या उपयोगितेचे महत्व जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचावे हे उद्दीष्ट समोर ठेवून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त आगामी 2 ऑक्टोंबर रोजी स्थानिक सायकल स्टुडिओच्या वतीने वाशीम रिठद वाशीम असे 31 किलोमिटर अशा खुल्या गटातील महिला, पुरुष व शालेय मुलामुलींकरीता सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 
 
 
वाशीम जिल्हा सायकलिंग ग्रुपच्या वतीने सायकलपटू अलका गिर्‍हे व नारायण व्यास यांच्या पुढकारातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुलांमध्ये सायकल चालविण्याचा छंद वाढवा, सायकलच्या माध्यमातून आपली पावलं निरोगी आयुष्याकडे जावी या उद्देशातून अलका गिर्‍हे, नारायण व्यास, आर्यन डाखोरे, प्रशांत बक्षी, राहुल अवचार, धनंजय वानखेडे, शंकर इंगोले, सागर रावले, महेश धोंगडे, अक्षय हजारे, छाया मडके, श्रीनिवास व्यास, सुरेंद्र अहिर आदी प्रयत्न करीत आहेत.
 
 
या सायक्लोथॉन स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना टीशर्ट व मेडल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धा पूर्ण करण्यासाठी 3 तास इतका वेळ दिला आहे. कोणीही स्पर्धक पहिला व दुसरा असे येणारा नसून जे स्पर्धक वेळेत स्पर्धा पूर्ण करतील ते सर्व विजयी होतील अशी माहिती आयोजकांनी दिली. तसेच पर्यावरण व प्रदुषणमुक्तीचा संदेश देणार्‍या या स्पर्धेत जास्तीत जास्त वाशीमकर युवक युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.