जंगली जनावरांच्या उपद्रवाने शेतकरी हतबल

    दिनांक :25-Sep-2019
मानोरा, 
मानोरा तालुक्यातील बहुतांश जनतेचे जीवन हे शेतीवर अवलंबून असून, औद्योगिक दृष्ट्या मागासलेला असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कोरडवाहू शेती या तालुक्यांमध्ये केली जाते. तालुक्यांमध्ये वनविभागाची मोठ्या प्रमाणात वनजमीन असून, चहूबाजूने डोंगराने वेढलेल्या या तालुक्यामध्ये वन्य प्राण्यांमुळे तालुक्यातील बहुतांश भागांमध्ये शेतकर्‍यांच्या शेतीमधील उभ्या पिकांची नासाडी दरवर्षी होत आहे. 

 
 
मानोरा तालुक्यातील उमरी, पोहरादेवी, रतनवाडी, खांबाळा, वाईगौळ या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वन्य पशूंचा वावर असून अन्नाच्या शोधार्थ हे जंगली जीव शेतकर्‍यांच्या शेतीमध्ये दररोज प्रवेश करून उभ्या पिकाची नासाडी करीत असतात. तालुका महसूल प्रशासन आणि वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय मानोरा यांना वेगवेगळ्या संघटनांच्या मार्फत अनेक वेळा वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून शेतकर्‍यांच्या पिकांना जीवदान देण्यात यावे अशा प्रकारचे लेखी निवेदने कित्येक वेळा दिली जातात. परंतु, जबाबदार तालुका महसूल आणि वन प्रशासनाकडून शेतकर्‍यांच्या या उदरनिर्वाहाच्या प्रश्‍नाकडे कायम दुर्लक्ष केल्या जात आहे. सध्या मानोरा तालुक्यामध्ये कपाशी, सोयाबीन, तुर ही पिके मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांनी सरकारी बँक, वेगवेगळ्या सोसायट्या आणि वेळेवर शासनाकडून कर्ज न मिळाल्यामुळे खाजगी सावकारांकडून महागड्या बियाण्यांसाठी पैशाची उचल करून आपल्या शेतामध्ये कपाशी आणि अन्य पिकाची पेरणी केलेली आहे. आज रोजी पिकेही जोमदार अवस्थेत आहे. या पिकांना वाढविण्यासाठी शेतकर्‍यांनी आपल्या जीवाचे रान करून आणि अतिशय महागडी औषधाची फवारणी करून पिके वाढविलेली आहे. हातातोंडाशी आलेले पिके नीलगाई आणि मोठ्या प्रमाणातील जंगली डुकरांच्या कळपा मुळे धोक्यात आली आहे.
 
 
शेतकर्‍यांच्या उभ्या पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी या जंगले जनावरांच्या कळपांमुळे होत आहे. महागडी बियाणे, खते, औषधांचा वापर करून वाढवलेली आणि हातातोंडाशी आलेली पिके जंगली जनावरांच्या भक्षस्थानी पडू नये म्हणून शेतकरी रात्री आपल्या घरी झोपत नसून भर पावसात शेतीच्या रखवाली साठी रात्रभर शेतातच जागल करीत असल्याचे दृश्य संपूर्ण तालुक्यांमध्ये आहे. परंतु एकट्या शेतकर्‍यांच्या या जागरणामुळे डुकरांच्या कळपावर काहीच परिणाम पडत नाही. कधीकधी जंगली जनावरांच्या हल्ल्याला ही मानोरा तालुक्यातील अनेक शेतकरी बळी पडलेले आहेत.