चिमुकल्या धवलसाठी धावून येताहेत हॅपी फेसेसचे विद्यार्थी

    दिनांक :25-Sep-2019
वाशीम,
घटना-दुर्घटना किंवा घात-अपघात कधीही सांगून येत नसतात. क्षणार्धात होत्याच नव्हते करणारा अपघात तितकाच भयंकर आणि भयावह असतो. दरम्यान सनासुदी निमित्त मसला पेन या मामांच्या गावी गेलेल्या धवल मोहन कड या चिमुकल्याला खेळता खेळता विजेजा धक्का लागून गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत चिमुकल्या धवलच्या शरीराचा ६२ टक्के भाग भाजला असून त्याच्यावर नागपूर येथील नेल्सन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
 
 
त्याच्या उपचारासाठी २० लाख रुपये खर्च येणार असून गरीब कुटूंबातील धवनच्या उपचारार्थ त्याच्या हॅपी फेसेस द कॉंसेप्ट स्कूल या शाळेने 'एक पाऊल धवलसाठी' या शिर्षकाखाली मदत मोहिम सुरू केली आहे. दरम्यान या मोहीमे अंतर्गत हॅपी फेसेस द कॉंसेप्ट स्कूल वाशीमच्या संचालक मंडळाच्या वतीने एक लाख रुपये धवलच्या उपचारासाठी देण्याचा निर्णय घेतला असून संस्थेच्या तीनही शाळेच्या शाखेमधुन विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी निधी गोळा करीत आहेत. 
 
 
विद्यार्थ्यांमधून कुणी आपली पिगी बॅंक फोडून तर वाढदिवसाच्या चॉकलेटचे पैसे धवलच्या उपचारासाठी देउन माणुसकीचे यथोचीत दर्शन घडवीत आहेत. दरम्यान, हॅपी फेसेस वाशीमच्या किड्स प्लॅनेटमध्ये ईयत्ता दुसरीत शिकणाऱ्या धवल कडचे मुळ गाव सावरगाव बर्डे असून त्याचे वडील मोहन कड हे फोटोग्राफीचा व्यवसाय करतात म्हणून शाळेमार्फत धवलच्या उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन शाळेचे संचालक दिलीप हेडा यांनी पालक आणि विद्यार्थी वर्गाना करताच पालक आणि विद्यार्थी यांच्यासोबतच ईतर सेवाभावी व्यक्तिंदेखिल चिमुकल्या धवलच्या उपचारासाठी धावून येत आहेत. संकलित झालेला निधी धवलच्या उपचारासाठी पाठवण्यात येणार असून ईच्छुकांनी हॅपी फेसेस द कॉंसेप्ट स्कूल वाशीम येथे मदत निधी देण्याचे आवाहन हॅपी फेसेसचे संचालक दिलीप हेडा यांनी केले आहे.