आमदार विद्या चव्हाण यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार

    दिनांक :25-Sep-2019
अमरावती,
आजच्या टिव्ही 9 वृत्त वाहिनीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आमदार विद्या चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविषयी अश्लाघ्य, निराधार व देशभर भावना भडकतील असे गंभीर स्वरूपाचे आरोप केले असून त्यांच्यावर या विरोधात तात्काळ कारवाई करण्या संदर्भात भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी बडनेरा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. 
 
 
आज सकाळच्या सत्रात टिव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आमदार विद्या चव्हाण यांनी हे आरोप केले आहेत. देशभरातील स्त्रियांमध्ये पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न विद्या चव्हाण यांनी केला. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे गुजरातच्या दंगलीत आरोपी होते. गुन्हेगार होते. अल्पसंख्यांक तरुणींची कत्तल आणि तलवारीच्या टोकावर गर्भवती महिलांचे गर्भ नाचवणारे गुन्हेगार, असा गंभीर व जनभावना भडकावणारा, नेत्यांची मानहानी करणारा आरोप विद्या चव्हाण यांनी जाहीरपणे केला. या गुन्हेगारांना आमच्या तेव्हाच्या सरकारने मोकळे सोडण्याची आणि अटक न करण्याची चूक केल्याचे सांगून विद्या चव्हाण यांनी अतिशय अभद्र, अश्लाघ्य, शब्दप्रयोगांचा वापर केला. 
 
 
निवडणुकीच्या तोंडावर हिंदू आणि मुसलमान यांच्यात दंगे घडवण्याचा घाट विद्या चव्हाण यांनी घातला आहे. हे वक्तव्य ऐकून मुस्लिम समाजात चीड निर्माण करण्याचा व सामाजिक वातावरण खराब करण्याचा त्यांचा स्पष्ट हेतू आहे. स्वतःच्या नेत्यांची भलामण करताना पंतप्रधान व गृहमंत्र्यांवर असे गलिच्छ व निराधार आरोप करणार्‍या विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. या संदर्भात जनभावना संतप्त असून त्याचे गंभीर परिणाम उमटल्यास आपण जबाबदार राहाल, असे शिवराय कुळकर्णी यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. विद्या चव्हाण यांच्या या भडकाऊ वक्तव्याचा आपण निषेध करतो. त्यांनी त्यांच्या नेत्यांवर स्तुती सुमने उधळावी मात्र, आमच्या नेत्यांविषयी असे बोललेले खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा कुळकर्णी यांनी दिला आहे.