राहुल गांधींची गांधी जयंतीला वर्धेत पदयात्रा?

    दिनांक :25-Sep-2019
वर्धा,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि सेवादलाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षाच्या समारोपानिमित्त सेवाग्राम येथे कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. वर्धा येथे २ ऑक्टोबरला पद यात्रेचेही आयोजन करण्यात आले असून या पदयात्रेत राहुल गांधी उपस्थिती राहणार असल्याचे खात्रीलायक वृत्त असून ते १ रोजी सेवाग्राम येथे मुक्कामाला येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 
 
 
सेवादलाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, अखिल भारतीय काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष लालजी देसाई, महाराष्ट्र सेवादलाचे प्रभारी मंगलसिंग सोळंकी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह प्रमुख नेते व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. ही पदयात्रा सकाळी १० वा. बापू कुटी, सेवाग्राम आश्रम परिसर येथून सुरु होईल आणि हुतात्मा स्मारक, आदर्शनगर, वर्धा येथे या यात्रेचा समारोप होईल. पदयात्रा संपल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या कार्यकारिणीची बैठक रत्नाकर सभागृह, म्हाडा कॉलनीसमोर, सेवग्राम रोड येथे आयोजित करण्यात आली आहे.
 
 
एक वर्षात तिसऱ्यांदा वर्धेत : सेवाग्राम येथे काँग्रेसच्या अखिल भारतीय बैठकीसाठी राहुल गांधी सेवाग्राम येथे येऊन गेले होते. यावेळी त्यांनी वर्धेत पदयात्रा काढली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत ही काँग्रेस उमेदवार चारूलता टोकस यांच्या प्रचारासाठी ते वर्धेत आले होते. आता तिसऱ्यांदा गांधी जयंतीनिमित्त राहुल गांधी सेवाग्राम येथे येणार आहेत.