शिवसैनिकांची महिंद्रा होम फायनांन्स कार्यालयावर धडक

    दिनांक :25-Sep-2019
शेतकर्‍यांच्या कर्जाचा 25 हजाराचा हप्ता शिवसेना भरणार 

 
 
वाशीम,
सततची नापिकी आणि दुष्काळी परिस्थिती यामुळे घरावरील कर्जाची नियमित परतफेड न करु शकलेल्या किनखेडा ता. रिसोड येथील अल्पभूधारक शेतकरी सतीश अवचार या शेतकर्‍यांच्या घराची जप्ती कारवाई महिंद्रा फायनान्सकडून केली होती. शेतकर्‍यावर झालेल्या अन्यायाची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली. या अन्यायकारक कारवाईच्या विरोधात खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी महिंद्रा होम लोन फायनान्सच्या जिल्हा कार्यालयात धडक देवून शेतकर्‍याला न्याय मिळवून दिला.
 
 
शेतकरी सतिश अवचार यांनी महिंद्रा होम फायनान्स कंपनीकडून घरबांधणीसाठी कर्ज उचलले होते. मात्र, सततच्या नापिकीमुळे अवचार हे कर्जाची नियमित फेड करु शकले नाही. त्यामुळे कंपनीने त्यांच्या घरावर जप्तीची कारवाई कारवाई केली. शेतकर्‍यावर झालेल्या अन्यायाची बातमी शिवसेना पक्षप्रमुख यांनी वाचली आणि खासदार भावना गवळी यांच्याशी संपर्क साधून शेतकर्‍याला न्याय मिळवून देण्याच्या सूचना केल्या. त्यावरुन खासदार गवळीसह शिवसैनिकांनी कंपनीच्या कार्यालयावर धडक देवून अधिकार्‍यांना धारेवर धरुन जाब विचारला. तसेच वन टाईम निपटारा करावयास भाग पाडले. 2 लाख 50 हजार रुपये कर्जाचे 75 हजार रुपयामध्ये निपटारा करुन 25 हजार रुपयाचा हप्ता शिवसेनेने भरला व उर्वरित कर्जाची रक्कम सोयाबीनवर भरण्याचे निश्‍चित करुन दिले. तसेच शेतकर्‍याकडुन 2 महिन्यापर्यंत सक्तीची वसूली करु नये, अशा सूचना दिल्या.