मानसिक सौंदर्याला महत्त्व - डॉ. वर्तिका पाटील यांची 'थेट भेट'

    दिनांक :25-Sep-2019
- मिस युनिव्हर्सचा मुकूट जिंकण्यास सिद्ध
नागपूर,
जगभरात सौंदर्य स्पर्धा होतात आणि या स्पर्धांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन फारच दोषपूर्ण आहे. सौंदर्य स्पर्धा ही केवळ शारीरिक नसते. मानसिक, भावनिक, आत्मिक सौंदर्यासह विविध पातळीवरचे सौंदर्य विविध प्रश्नातून जोखले जाते. तुमची वागणूक, संवाद, आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व, इतरांविषयीची काळजी, वैचारिकता, बुद्धीमत्ता या सार्‍याच बाबी त्यात असतात पण भारतीय समाजात केवळ शरीरिक सौंदर्याचाच विचार होतो. शरीर निरोगी आणि सशक्त असणे हे सौंदर्य आहेच पण जगभरात मानसिक, आत्मिक सौंदर्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान असल्याचे मत मिसेस वेस्ट एशिया पुरस्काराने सन्मानित सौंदर्यवती डॉ. वर्तिका पाटील यांनी व्यक्त केले.
 
 
 
हा किताब मिळविल्यानंतर डॉ. वर्तिका पाटील यांनी तरुण भारतला सदिच्छा भेट देत ‘थेट भेट’ उपक्रमात संपादकीय सहकार्‍यांशी संवाद साधला. शहर संपादक चारुदत्त कहू यांनी त्यांचे स्वागत केले. मु‘य वार्ताहर पराग जोशी यांनी परिचय करून दिला. डॉ. वर्तिका यांची निवड चीन येथे होणार्‍या मिसेस युनिव्हर्स स्पर्धेसाठी झाली आहे. त्या एमबीबीएस, एमडी, न्युरो पॅथॉलॉजिस्ट आहेत. एमबीबीएस करताना राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत त्या ‘मिस मेडिको’ झाल्या. शैक्षणिक क्षेत्रासह स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रातही स्वतःला सिद्ध करण्याचा हा पहिला यशस्वी प्रयत्न होता. त्यानंतर मिस संजीवनी किताबही त्यांना मिळाला. त्यानंतर मिस महाराष्ट्र हा किताबही त्यांनी जिंकला. ग्लॅडरॅग्स स्पर्धेतही त्या पहिल्या दहामध्ये होत्या. ग्रीस येथे झालेल्या स्पर्धेतही त्यांना मोस्ट ब्युटिफुल हेअर आणि मोस्ट स्टायलिश हा सन्मान मिळाला. पुण्यात मिसेस बेस्ट इंडिया हा किताब त्यांनी जिंकला. मिसेस वेस्ट एशिया जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील मिस युनिव्हर्सचा मुकूट जिंकण्याची त्यांची इच्छा आहे.
 
 
वर्तिका म्हणाल्या, आतापर्यंत माझी स्पर्धा भारतीय महिलांशी होती. पण आता आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महिलांशी माझी स्पर्धा असेल. या स्पर्धेतील सौंदर्यवती अधिक सशक्त, उंच आणि देखण्या असतात. त्यासाठी मी व्यायाम आणि आहारावर लक्ष केंद्रीत केले आहे. शिवाय शैक्षणिक पात्रताही आपल्याजवळ असायलाच हवी. सौंदर्य स्पर्धेसाठीच नाही तर प्रत्येकाने योगा, मेडिटेशन, धावणे, फिरणे असे व्यायाम करणे आवश्यक आहे. एक डॉक्टर म्हणून मी सर्वांनाच हा सल्ला देईल. निव्वळ वजन वाढून उपयोग नाही. स्नायू मजबूत होण्यासाठी प्रथिने जास्त घ्यायला हवीत. ही स्पर्धा जिंकल्यावरही माझे वैद्यकीय क्षेत्र मी सोडणार नाही. महिलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी मी अकादमी चालवते आहे. मुळात सगळेच सुंदर असतात. या जगात कुणीही कुरूप नाही फक्त आपली पाहण्याची दृष्टी दोषपूर्ण असते, असे त्या म्हणाल्या.
 
 
मी डॉक्टर आहे आणि हा माझा छंद आहे. यामुळे व्यक्तिमत्त्व विकास आणि आत्मविश्वास वाढतो. कामात सकारात्मकता येते. महिला सक्षमीकरण म्हणजे पुरुषांना कमी लेखणे नाही तर महिलांचा सन्मान आणि आत्मविश्वास वाढविणे आहे. तिला मोकळेपणाने जगण्याचे स्वातंत्र्य देणे होय. यासाठी घरच्यांनीही मदत करायला हवी, याकडेही डॉ. वर्तिका यांनी लक्ष वेधले.
मुलींनो जसे जगायचे आहे तसेच जगा!
महिलांवर कुठलाही दबाव असू नये. आपल्याला मिळालेला जन्म हवे तसे आनंदाने जगण्यासाठी आहे. ते जगणे अनुभविताच आले पाहिजे. लग्नानंतर सारे संपते, हे चूक आहे. मी लग्नानंतरच यशस्वी होते आहे. त्यामुळे लग्न झाल्यावरही आपल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी झटा, प्रयत्न करा, असा संदेश तिने मुली-महिलांना दिला.