तुमच्या वेडिंग फॉटोग्राफरला हे जरूर विचारा

    दिनांक :26-Sep-2019
गौरी घटाटे 
 
लग्न संस्मरणीय करण्यात लग्नातले फोटो एक अत्यंत महत्त्वाचा हिस्सा असतो. लग्नातले फोटो हा प्रत्येकाच्या आयुष्यात जपून ठेवावा असा ठेवा असतो. त्यामुळेच तुमच्या आयुष्यातला हा महत्त्वाचा दिवस अविस्मरणीय करण्यासाठी तुम्ही कुठल्या फोटोग्राफरची निवड करता ही अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे. सर्वप्रथम तुम्हाला नेमके काय हवे आहे आणि काय रुचते, ते तुम्ही तुमच्या फोटोग्राफर सोबत बोलणे आवश्यक आहे. योग्य फॉटोग्राफरची निवड करताना, खालील प्रश्न निर्णय घेण्यात तुमची नक्की मदत करतील. 

 
 
1. तुमच्या फोटोग्राफीची खासियत काय आणि तुम्हाला कसे काम करायला आवडते?
सर्वसाधारतः फोटोग्राफर दोन पद्धतीने काम करतात. एक निवांतपणे बघत, तुमचे स्वाभाविक क्षण तुमच्या नकळत आपल्या कॅमेरात कैद करतात किंवा दुसरा, नवनवीन ट्रेण्डनुसार नेमके फोटो, स्टेज करून, हवे तसे, ते क्षण निर्माण करून फोटो काढतात. हे दोन्ही पर्याय उत्कृष्ट आहेत, तुम्हाला यातले नेमके काय आवडेल, हे तुम्ही ठरवून त्यानुसार फोटोग्राफरची निवड करा.
 
 
2. तुम्ही कमी प्रकाश/लाईट असताना फोटो चांगले यावेत म्हणून काय करता?
कुठलाही निष्णात, अनुभवी फोटोग्राफर या तांत्रिक अडचणीसाठी नेहमीच तयार असतो. लग्न मंडप किंवा हॉलमध्ये साधारणत: नैसर्गिक प्रकाश कमीच असतो. उत्कृष्ट कॅमेरा, सर्वोत्तम लेंस आणि भरपूर प्रकाश देणारे बल्ब हे या त्रुटीवर मात करण्यासाठी पुरेसे असतात. एक चांगला फोटोग्राफर नेहमी ‘रॉ’ फोटो काढतो जेणे करून नंतर त्या फोटोमध्ये प्रकाशाच्या अनुषंगाने हवे तसे बदल त्याला फोटो एडिट करताना करता येतात.
 


 
 
3. विविध कठीण प्रसंगांसाठी तुमची काय तयारी असते?
समारंभात कॅमेरा खराब होणे, लाईट खराब होणे, बॅटरी संपणे, अशा अनेक गोष्टी घडू शकतात. प्रत्येक अनुभवी फोटोग्राफर नेहमीच विविध आणिबाणीच्या प्रसंगाला तोंड द्यायला सज्ज असतो. त्यासाठी त्याच्या जवळ एक्सट्रा उपकरणे आणि जास्तीचा माणूस असणे अपेक्षित आहे.
 
 
4. माझे फोटो सुरक्षितररीत्या कसे आणि कुठे जपून ठेवल्या जातील.
सध्याच्या डिजिटल युगात पेन ड्राईव, मेमरी कार्ड किंवा इतर अन्य स्टोरेज उपकरणे कधीही खराब होऊ शकतात. त्यामुळे तुमचे फोटो काढून झाल्यानंतर ते तुम्हाला देण्या आधी फोटोग्राफर ते कुठे आणि कसे सेव्ह करून ठेवणार आहे, हा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे. तसेच तुम्हाला फोटो मिळाल्यानंतर ते तुम्ही जास्तीत जास्त जागी सेव्ह करून ठेवणे आवश्यक आहे.
 
 
5. फोटोग्राफर तुम्हाला किती वेळ देणार आहे. 
फोटोग्राफरला तुमच्या समारंभाच्या वेळा अचूकपणे माहीत आहेत ना, याची खात्री करून घ्या. समारंभाच्या अर्धा तास अगोदर फोटोग्राफरने पोहोचणे अपेक्षित आहे, याची जाणीव त्याला करून द्या.
 
 
6. या आधी (जिथे विवाह सोहळा होणार आहेत त्या जागी) फोटो काढले आहेत का? किंवा आधी त्या जागेला भेट देणार का?
समारंभाच्या जागी फोटोग्राफरने याआधी शूट केले असल्यास फारच उत्तम, पण तसे नसेल तर सगळेच व्यावसायिक फोटोग्राफर लग्नाआधी त्या स्थळाला भेट देतातच. फोटोग्राफर ज्या दिवशी भेट देणार आहे, त्या दिवशी तुम्ही त्याच्या सोबत असावे. नंतर फोटो शूट करताना हे उपयोगी पडते. फोटोग्राफरला काही सूचना द्यायच्या असतील, तर त्या आधीच बोलून घेतल्याने उत्तम फोटो येण्यात मदत होते.
 
 
7. माझ्याकडून कुठल्या माहितीची अपेक्षा आहे?
नेहमी आपल्या फोटोग्राफर सोबत स्पष्ट आणि निसंग्दिध बोला. कार्यक्रमाची वेळ, प्रकाश व्यवस्था, लग्नातील विविध विधि यांची संपूर्ण माहिती आधीच फोटोग्राफरला द्या. यामुळे संपूर्ण कार्यक्रम सुलभतेने पार पडेल.
 
 
8. आम्हाला फोटोची सॉफ्ट कॉपी कधी मिळेल? आम्ही त्याच्या प्रिंट हवे तेव्हा घेऊ शकू का?
देण्याघेण्याचे सगळे व्यवहार स्पष्ट ठेवा, फोटो देण्याचे शेड्यूल आधी ठरवा. पैसे देण्याआधी आपले फोटो हाय रिझाल्युशनचे आहेत याची खात्री पटवून घ्या.
 
 
9. आमचे फोटो तुम्ही एडिट करणार का?
एडिटिंग बद्दल विचारा. साधारणपणे ते पॅकेजमध्ये अंतर्भूत असते, तरीही त्या संपूर्ण प्रोसेसबद्दल माहिती घ्या. फोटोग्राफर एक तर फोटो एडिट करून देतात किंवा आधी तुम्हाला सिलेक्ट करायला लावतात आणि तेवढेच एडिट करून देतात.
तुम्हाला काय हवे आणि तुम्ही निश्चित केलेल्या फोटोग्राफर नेमके काय उत्कृष्ट देऊ शकतो, याबद्दल एकदा मनात निश्चित भूमिका तयार झाली की तुमचे अर्धे काम फत्ते झालेच असे समजा!