...अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांचा राजीनामा

    दिनांक :26-Sep-2019
बुलढाणा, 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आपल्या पदाचा व संघटनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तुपकर यांच्या सोबतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विद्यार्थी संघटनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख राणा चंदन यांनीही राजीनामा दिला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे त्यांनी राजीनामा सादर केला आहे.
मागील काही दिवसांपासून तुपकर हे भाजपाच्या वाटेवर असल्याची सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात चर्चा होती. अखेर गुरुवार, 26 सप्टेंबरला त्यांनी संघटनेच्या पदाचा राजीनामा दिला.
 
 
 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता ते युवा नेते म्हणून रविकांत तुपकर यांचे नेतृत्व उदयास आले. आक्रमक आंदोलनामुळे तुपकारांना राज्यभरात प्रसिद्धी मिळाली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी चिखली मतदारसंघातून निवडणुक लढण्याची तयारी केली होती. मात्र, जागा वाटपात त्यांना न्याय मिळाला नाही. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष केले. त्यानंतर राजू शेट्टी हे एनडीएममधून बाहेर पडले तेव्हा रविकांत तुपकर यांनी वस्त्रेाद्योग महामंळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत माजी खासदार राजू शेट्टी यांच्या सोबत बाहेर पडले. त्याचदरम्यान स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत यांनी भाजपामध्येच राहण्याचा निर्णय घेऊन रयत क्रांती संघटनेची स्थापना केली.
स्वाभिमानी व रयत क्रांती या दोन संघटनेमध्ये मध्यतरीच्या काळात बराज कलगीतुरा झाला. शेवटी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्‌टी हे आघाडीमध्ये सहभागी झाले. या निवडणुकीत रविकांत तुपकर यांनी आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे स्टार प्रचारक म्हणून त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला. गुरुवारी त्यांनी स्वाभिमानीचा राजीनामा दिल्याने त्यांचा पक्षप्रवेश भाजपा िंकवा रयत क्रांतीमध्ये होणार असल्याची चर्चा सर्वदूर आहे.