शिल्पांची मेजवानी- श्री मुरलीधर मंदिर...

    दिनांक :26-Sep-2019
सर्वेश फडणवीस
 
नागपूर शहराचा इतिहास ऐतिहासिक असाच आहे. बरेच दिवसांत अशा वास्तू बघायला जाणे जमले नाही. पुन्हा एकदा गेलो तर हे मुरलीधर मंदिर बघितलं. या मंदिरात कृष्णाबरोबर रुक्मिणी व सत्यभामा आहेत आणि हे खूप कमी ठिकाणी बघायला मिळते. 

 
 
मुरलीधर मंदिर बरेच दिवस एकान्तात असेच होते. सोनेगाव विमानतळ भागात असल्याने कुणी सहसा तेथे जात नसे. पण आता एक रस्ता येथून सुरू झाल्यामुळे ही वास्तू बघण्याची इच्छा कायम होती. नागपुरातील ही मंदिरे म्हणजे स्थापत्यकृती, शिल्पप्रतिमा व सुशोभन यांचा परमोच्च बिंदू आहे! येथील मंदिरांवर ओरिसा, छत्तीसगड स्थापत्याचा प्रभाव जाणवतो. महाराष्ट्राच्या शिल्पपरंपरेपेक्षा आगळेवेगळे स्थान असलेले असे हे मंदिर आहे.
 
 
 
हे मंदिर श्रीमंत भोसल्यांच्या काळात बांधले गेले आहे. या वास्तुकलेचे वेगळेपण म्हणजे दगडी बांधणी. अनेक प्रकारच्या जाळीने नक्षीदार व कुठल्यातरी कल्पना साकारल्यासारख्या दिसतात. प्रत्येक शिल्प पाहात त्याचा सौंदर्यशास्त्रदृष्ट्या अभ्यास व मन तृप्त होईपर्यंत आनंद लुटतच राहावे, असेच हे वास्तुवैभव आहे.
 
 
हे मंदिर फार मोठ्या वैभवाने उभे आहे. ऊन, वारा, पाऊस व वादळ यांचे अनेक तडाखे बसूनसुद्धा ही ऐतिहासिक वास्तू दिमाखात उभी आहे. हे पूर्ण शिल्प विकसित प्रस्तरकाव्य आहे, असेच म्हणता येईल. म्हणून नक्कीच एकदा तरी बघायलाच हवे, असे हे श्री मुरलीधर मंदिर...