वणी येथे लाखोंचा दारूसाठा जप्त; आरोपी फरार

    दिनांक :26-Sep-2019
वणी,
येथील देशमुखवाडी परिसरात असलेल्या ठाकुरवार यांचे घरी अवैध रित्या दारू साठवून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यावरून वणी पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एक लाख  ७४ हजार रुपये किमतीच्या ७० देशी दारूच्या पेट्या वणी पोलिसांनी जप्त केली आहे. ही कार्यवाही दि. २५ सप्टेंबरला रात्री ११ चे सुमारास करण्यात आली आहे.
 

 
 
वणी तालुक्याला लागून असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारू पुरवठा वणी परिसरातून केल्या जात असल्याचे वास्तव आहे. रात्रीच्या वेळी अनेक युवक दुचाकी किंवा चारचाकी वाहनातून घुगूस किंवा वरोरा मार्गाने चंद्रपूर येथे प्रतिबंधित दारू नेतात. पोलिसांनी अनेकदा कार्यवाही करून लाखो रुपयांची दारू जप्त केली आहे. मात्र या अवैध दारू पुरवठा व्यवसायाला पूर्णपणे आळा घालण्यात पोलिसांना व दारू बंदी विभागाला सध्या तरी यश आल्याचे दिसत नाही. त्यातच आता पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दारूचा होणारा वापर लक्षात घेता या दारू तस्करांची चांगले दिवस येत आहेत. त्यासाठी या तस्करांनी दारूचा साठा जमा करणे सुरू केले आहे. शहरातील देशमुखवाडी परिसरातील ठाकुरवार यांच्या घरी दारूसाठा असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व ठाणेदार वैभव जाधव यांना मिळाली होती. पोलिसांनी रात्री ११ वाजताच्या सुमारास धाड टाकली असता घरात देशी दारूचे सत्तर बॉक्स आढळून आले. या बॉक्स मध्ये ३३६० दारूच्या शिष्या आढळून आल्या यातील एक लाख ७४ हजार ७२० रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे. यातील संशयित आरोपी राहुल ठाकुरवार हा फरार झाला आहे. दोन वर्षांपूर्वी याच घरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकली होती. त्यावेळी सुध्दा मोठा देशी विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला होता.