रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहतुकीचा खोळंबा

    दिनांक :26-Sep-2019
 राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मुख्य अभियंत्यांचे दुर्लक्ष 
 
सिरोंचा(गडचिरोली),
सिरोंचा - सिरोंचा-आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गाचे मागील वर्षी  कोट्यवधी रूपये खर्च करून बांधकाम करण्यात आले. मात्र वर्षभरातच या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था खूपच दयनीय झाली आहे.
सिरोंचापासून ते आल्लापल्लीपर्यंत १०० किमीचा मार्ग नुसता खड्डेमय झाला आहे. सिरोंचा नजीक सूर्यापल्ली, नंदीगाव फाटा पासून मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. खड्ड्यांचा आकार इतका मोठा झाला आहे की, त्यात कारसारखे वाहन पडल्यास खालती चंबर फुटून नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दररोज शेकडो नागरिकांना या मार्गावरून तालुका मुख्यालयात येणे जाणे करावे लागते. त्यामुळे प्रवाशांना आपले वाहन किंवा बस कधी खड्ड्यातून बाहेर पडणार याची प्रतीक्षा करावी लागते. खड्ड्यातून वाहन बाहेर पडेपर्यंत जीव मुठीत घ्यावा लागत आहे.
 

 
 
तालुका मुख्यालय ते जिल्हा मुख्यालयाकडे जाण्यासाठी तब्बल ५ तास लागत होते. मात्र सध्याच्या परिस्थितीत आणि सिरोंचा- आल्लापल्ली राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दोन दिवस मोजावे लागत आहेत. सध्यातरी जिल्हा मुख्यालयला जाऊन काम करून परत येणे शक्य नाही. नांदगाव फाटाजवळ खड्ड्यांमुळे ट्रक फसून वाहतूक ठप्प होण्याची बाब नित्याचीच झाली आहे. मागील दोन महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्गाची अवस्था गंभीर असल्याची माहिती वरिष्ठ अभियंत्यांना असूनही खड्डे बुजविण्याकडे राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.