नव्याने केलेला शेततलाव फुटल्याने शेकडो एकर शेती गेली खरडून

    दिनांक :27-Sep-2019
मंगरुळनाथ, 
वाशीम जिल्ह्यात सिंचनाची सोय व्हावी यासाठी लाखो रुपये खर्च करून कृषी विभागाने यंदा जिल्ह्यात शेततलाव निर्माण केले आहेत. मात्र मंगरुळनाथ तालुक्यातील मसोला येथील शेत तलावाच काम नित्कृष्ट दर्जाचे झाल्याने पहिल्याच वर्षी फुटून शेकडो एकरवरील उभ्या पिकासह जमीन खरडून गेली आहे. खरडून बाधित झालेल्या शेतकर्‍यांनी निवेदन दिले असून, पंचनामे करून मदत करण्याची मागणी केली आहे.
 

 
 
मागील तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात परतीचा पाऊस कमी-अधिक प्रमाणात बरसत असून, 24 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला. मंगरुळनाथ तालुक्यातील मसोला बुद्रुक येथील संजय मुळे यांच्या शेतालगत सर्वे नंबर 30 ईक्लास जमिनीवर 100 बाय 100 चा शेत तलाव मे , जुन 2019 मध्ये घेण्यात आला होता. मात्र, सदर शेततलावाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने दमदार पावसामुळे तलाव तुडुंब भरला. या तलावाला आतुन दगडाची पिचींग नसल्यामुळे तलाव फुटला. गत तीन ते चार दिवसांपासून होत असलेल्या परतीच्या पाऊस लाभदायक ठरत आहे. प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे.
कृषी विभागाने पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मुळे व परिसरातील शेतकर्‍यांनी संबंधित विभागाला निवेदन देऊन केली आहे.