मतदानाचा हक्क अवश्य बजावा ! गुलाब पुष्प देवून रुग्णांना आवाहन

    दिनांक :27-Sep-2019
‘स्वीप’ अंतर्गत आरोग्य विभागाचा उपक्रम
 
वाशीम, 
लोकशाही सदृढ बनवायची असेल तर प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजाविणे आवश्यक आहे. याबाबत मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी ऋषीकेश मोडक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’चे नोडल अधिकारी दीपक कुमार मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांतर्गत आज आरोग्य विभागाच्यावतीने जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांना गुलाबपुष्प देवून अनोख्या पद्धतीने मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
 
 
 
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विविध वॉर्डमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना उपचारानंतर बरे होवून येत्या 21 ऑक्टोंबर रोजी मतदानासाठी हक्क बजाविण्यासाठी अवश्य जा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हरण, बालरोग तज्ज्ञ डॉ. पवार यांच्यासह अधिपरिचारिकांच्या चमूने प्रसृती पश्‍चात माता व इतर रुग्णांना मतदानाचे महत्व समजावून सांगितले.
लोकशाही बळकट करण्यासाठी व आपल्या भावी पिढीच्या भविष्यासाठी सर्वांनी मतदानाचा हक्क बजाविला पाहिजे. कोणतेही कारण न शोधता मतदान हे आपले कर्त्यव्य समजून सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन डॉ. आहेर यांनी यावेळी केले.