उदंड झाले सासा-सुनांचे नाते!

    दिनांक :27-Sep-2019
आनंद विनायक मोहरील
 
सासू खाष्ट असते, हे सर्वश्रुत आहे. सून सासूच्या भूमिकेत येते तेव्हा तीदेखील खाष्टच होते. याचा सरळ अर्थ असा की, व्यक्ती म्हणून कुणीच खाष्ट नसते. भूमिका खाष्ट आहे, असे म्हणता येऊ शकेल. जन्मत: कुणीच अपराधी नसतो. परिस्थिती माणसाला ती ती भूमिका वठवायला भाग पाडत असते. अर्थात तुमची सदसद्विवेकबुद्धी जागृत राहणे गरजेचे आहे, हा भाग वेगळा. प्रतिकूल परिस्थिती ओढवली म्हणून वाममार्गाचा अथवा चालत्या गाडीची खीळ काढण्याचा अवलंब करणे याचे कुणीच समर्थन करणार नाही. परिस्थितीला धैर्याने सामोरे जाण्यातच खरी हुशारी आहे. प्रतिकूल परिस्थितीमुळे तमका गुन्हेगार झाला, हे मान्य करणे शक्य नाही. सांगायचे तात्पर्य असे की, कुणीही कोणती विशिष्ट भूमिका घेऊन जन्माला येत नाही. त्याला पृथ्वीतलावर आल्यानंतर परिस्थितिनुरूप त्या त्या भूमिकेचा स्वीकार करावा लागतो. म्हणून सासूच्या भूमिकेत आल्यानंतर खाष्ट झालेच पाहिजे, हे गरजेचे नाही आणि सुनेच्या भूमिकेत असताना सासूचा काट खाल्लाच पाहिजे, हेदेखील योग्य नाही. सोज्ज्वळ असलेली सून, सासू झाल्यानंतर खाष्ट कशी होते, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. 

 
 
एखाद्या सासू-जावयाचे पटत नसले तरी त्याची चर्चा मात्र होत नाही. कारण सासू-सुनेचे नाते जेवढे कलंकित नजरेने पाहिजे जाते, तेवढे सासू-जावयाचे नाही. वर्षानुवर्षे एकाच नजरेतून पाहिल्यामुळे कदाचित सासू-सुनेचे नाते बदनाम झाले असावे. अमक्याकडे सासू-सुना अगदी आई-मुलीसारख्या वागतात, हे मान्य करायला, पचायला थोडे जडच जाते. अर्थात प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच. घरातील सून म्हणजे लक्ष्मी. तिचा मानसन्मान करणे, तिला माणूस म्हणून वागविणे इथपर्यंत ठीक आहे. परंतु, एखाद्या सासूने सुनांना थेट ज्येष्ठा-कनिष्ठांचा दर्जा देऊन टाकला तर ही गोष्ट किती जणांना पचेल, हे सांगणे कठीण आहे. एका सासूबाईने महालक्ष्मी सणाचे औचित्य साधून थेट सुनांना ज्येष्ठा-कनिष्ठा म्हणून दर्जा देऊन टाकला. ही बातमी वर्तमानपत्रांसह सोशल मीडियावर व्हायरल झाली. पहिली गोष्ट ही की, देवाचा दर्जा मानवाला देणे कितपत योग्य आहे, ही ज्याची त्याने ठरवायची गोष्ट आहे. आम्ही आमच्या सुनांना इतका उच्च दर्जा देतो, हे सांगण्याची वेळच मुळी येऊ देण्याची गरज आहे का? सासू-सुनेच्या नात्याला एक वेगळा आयाम देण्याची गरज ती काय? या गोष्टीने सासू-सुनेच्या नात्यातील कटुता कमी होणे तसे फार कठीण आहे. सासूने सुनांसोबत चांगले वागावे, याबद्दल कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही.
 
 
 
मनुष्याला देवाचा दर्जा देण्यावर कुणाचाही आक्षेप असू शकतो. घरातील सून लक्ष्मी असतेच असते. ही भारतीय संस्कृती आहे. घरातील लक्ष्मीला चांगली वागणूक देणे अतिशय आवश्यक आहे. स्त्रियांचा मानसन्मान वाढविण्याचे अनेक मार्ग आहेत. परंतु देवाचा दर्जा देण्यामागे उद्देश तो काय? त्यातल्या त्यात लहान मुलांना देवाचा दर्जा आपण देतोच. देवाला ज्याप्रमाणे स्वार्थ नसतो, त्याचप्रमाणे बालकेही नि:स्वार्थी असतात. त्यामुळे एक वेळ बालकांची गणेश म्हणून पूजा करणे समजू शकते. परंतु, सुनांना थेट ज्येष्ठा-कनिष्ठा म्हणून बसवून पुजणे ‘ये बात कुछ हजम नही हुई!’ आता सासा-सुनेचे विळ्या-भोपळ्याचे सख्य असताना एखाद्या सासूने सुनांना असा दर्जा देणे चर्चेचा विषय नक्कीच होऊ शकेल. विषय चर्चेचाच होऊ शकतो. मंथनाचा नव्हे. ‘त्या’ सासूसाठी सुना ज्येष्ठा-कनिष्ठा होवोत, यावर कुणाचा आक्षेप नाही. परंतु, लक्ष्मीचा दर्जा दिलेल्या त्या सुना इतरांसाठी मात्र हाडा-मांसाचा देहच असतील, हे नक्की.
 
 
त्या सासूने स्वत:च्या सुनांना कुणाचा दर्जा द्यावा, हा वैयक्तिक प्रश्न आहे. त्या घरापुरती ती गोष्ट मर्यादित राहणे आवश्यक आहे. त्याला व्यापक प्रसिद्धी देण्याची गरज ती काय? आम्ही आमच्या सुनांना ज्येष्ठा-कनिष्ठा म्हणून दर्जा दिला, हे जाहीर करण्याची गरज का वाटावी सासूला? चार िंभतींच्या आत काय करावे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु, समाज म्हणून वावरताना काही गोष्टींचे तारतम्य बाळगले गेले पाहिजे, हे मात्र नक्की.
 
 
दुसरी अशीच घटना बीड येथे उघडकीस आली. या गावातील सुनांनी सासूच्या पार्थिवाला खांदा दिला. सासा-सुनांच्या विळ्या-भोपळ्याच्या नात्याला काही म्हणा या दोन घटनांनी चार चॉंद लावले आहेत. उदंड झाले सासा-सुनांचे नाते, असेच म्हणावे लागेल.
7218202502