कलारंग- रसिकाविना...

    दिनांक :27-Sep-2019
अर्चना देव
 
 
भारतभूमी ही कलांची-तत्त्वज्ञानाची माता आहे. चौदा विद्या आणि चौसष्ट कला- त्याही इतक्या विविध प्रकारच्या- सर्वांगीण- मला वाटते जगात इतक्या कुठेच नसतील.
 
 
वर्षानुवर्षं या कलांची जोपासना, संवर्धन भारतीयांनी केले आहे. पिढ्यान्‌पिढ्या ही कलाज्योत सतत तेवत ठेवली आहे. पूर्वी या कलांना राजाश्रय असायचा. जितके कलाकार राजाच्या पदरी असायचे त्यावरून राजाची विद्वत्ता-कलाप्रेम मोजले जायचे.
राजाश्रय सोडा, या कलांना-कलाकारांना लोकाश्रय मिळत नाही का? कलाकार खूप आहेत, पण श्रोत्यांची, प्रेक्षकांची मात्र वानवा दिसते.
 
 
अगदी सिनेमांचे उदाहरण घेतले तर अनेक दर्जेदार, अभिरुचिसंपन्न सिनेमांकडे प्रेक्षक वळत नाही. तिकीट काढून सिनेमाला जात नाहीत. प्रमोशन करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळेल याची खात्री नसते. सुमार दर्जाचे अभिरुचिहीन म्हणावे असे चित्रपट मात्र कोट्यवधीचा गल्ला जमवतात. जाहिरातीला पासष्टावी कला म्हणतात. जाहिरातीचा मारा करून थिल्लर सिनेमे मात्र तरून जातात. 

 
 
प्रमोशन करून, चित्रपटगृहात जाऊन सिनेमे बघा, असे सतत मोठ्या कलाकारांनाही म्हणावे लागते. एका अतिशय दर्जेदार मराठी सिनेमाच्या वेळी मल्टिप्लेक्स मालकांनी, पंधरा-वीस प्रेक्षक आणले तर सिनेमा सुरू करतो, हे सांगणे म्हणजे प्रेक्षकांची अभिरुची घसरत चालली का? कारण काही चांगले सिनेमे येतात आणि जातात, त्यावर साधी चर्चाही होत नाही, तर ‘संजूबाबा’सारखे सिनेमे उगीचच प्रसिद्धी आणि पैसा मिळवून जातात. हीच कथा नाटकांची. स्थानिक कलाकारांना घेऊन (त्याहीपेक्षा कलाकारांची मनधरणी करून) नाटकं बसवली जातात. स्पर्धांमध्ये बक्षीसंही मिळतात. विनामूल्य असूनही प्रेक्षकांची हवी तशी गर्दी दिसत नाही. ‘गर्दी नको-दर्दी हवे’ असे म्हणून कलाकार मनाचे समाधान करून घेतात.
 
 
लोकप्रियतेच्या शिखरावर असणारे दर्दी आणि गर्दी दोन्ही खेचतात. 80 वर्षांच्या एका डॉक्टरेट नाट्यकर्मीने आपले जीवन अभिनय, दिग्दर्शनाला वाहून घेतले. त्यांच्या संगीत नाटकांचे प्रयोग काही वर्षांपूर्वी दिल्ली विदेशात झाले. अवघ्या 80 व्या वर्षी त्यांचा उत्साह, असोशी पाहून मी भारावून गेले. नाटक बसवणे, स्पर्धांना घेऊन जाणे, मानधन नसले तरी जाण्या-येण्याच्च्या भाड्यावर वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग करणे... त्यांच्या या धडपडीला सलाम!
 
 
कलाकारांना भरभरून दाद द्यायला लोकांजवळ वेळ नाही का? की सतत कार्यक्रमांचा भडिमार प्रेक्षकांवर होतो आहे? तीच कथा व्याख्यानांची. नावाजलेला वक्ता, दांडगा व्यासंग, वक्तृत्वाची अमोघ देणगी, नावीन्यपूर्ण विषय, आगळेवेगळे सादरीकरण असेल तरच त्यांची पावलं कार्यक्रमाच्या दिशेने वळतात.
 
 
आजकाल आयोजक कार्यक्रमासाठी प्रचंड मेहनत घेतात. खर्च करताना हात सढळ असतो. स्पॉन्सर करणार्‍यांचे उंबरठेही झिजवतात. कार्यक्रमाच्या पत्रिका वाटल्या जातात. व्हॉटस्‌अॅपवरून मेसेज फिरतात. शहरात ठिकठिकाणी जाहिरात-फ्लेक्स लटकतात. पण... पण, प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळेल, यात साशंकताच असते. मोठी शहरं, नावाजलेले कार्यक्रम सोडले, तर या कथा आणि व्यथा सर्वत्र दिसतात.
 
 
कितीही प्रथितयश कलाकार असो, एक-दीड तासाच्या वर श्रोत्यांना खिळवून ठेवू शकत नाही. सभागृह खाली व्हायला वेळ लागत नाही. बरेच कार्यक्रम झालेल्या एका गायिकेचा कार्यक्रम दुसर्‍या शहरात आयोजित केला. आयोजकांनी गमतीने म्हटले मानधन, जाण्या-येण्याचे भाडे, सर्व व्यवस्था करतो, फक्त येताना तुम्ही श्रोते आणा. गमतीतून वास्तविकता दिसली.
 
 
वाचनसंस्कृती बंद झाली, लोक वाचत नाही, अशी आरडाओरड नेहमीच सुरू असते. कुणी वाचत नसले, तरी पुस्तके मात्र खूप प्रकाशित होत आहेत. लेखकलोक भरपूर पैसा खर्च करून पुस्तके छापतात. प्रकाशकांचा व्यवसाय तेजीत आहे, बरं का! पुण्याच्या दोन-तीन प्रकाशकांनी, सध्या पुस्तक पाईपलाईनमध्ये आहे, एक-दीड वर्षाने छापू, असे बर्‍यापैकी नाव असलेल्या लेखकाला उत्तर दिले. आजपर्यंत पाईपलाईनमध्ये पाणी, पेट्रोल असते हे माहीत होतं. माझ्या ज्ञानात भर पडली. असा किस्सा रंगवून लेखक महाशयांनी सांगितला. मोठ्या शहरांमध्ये त्यातल्यात्यात मुंबई-पुणे-नागपूरसारख्या ठिकाणी मोठे कलाकार प्रेक्षकांना कार्यक्रमांकडे खेचू शकतात. नाटक-सिनेमा-दिवाळी पहाट-पाडवापहाट हौशी रसिक प्रेक्षक हाउसफुल करतात. चोखंदळ रसिकांच्या पोचपावतीने कार्यक्रम रंगतदार होतो.
 
 
पूर्वी संध्याकाळी घरी आल्यावर मनोरंजनातून मने ताजीतवानी व्हायची, आजही होतात. चांगल्या कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याची रसिकता लोकांमध्ये होती, आजही आहे. फक्त आज सगळं खुली चर्चा, व्याख्यान, गाण्याचे कार्यक्रम, नाटक-सिनेमा, अगदी सत्संगसुद्धा तुम्हाला घरबसल्या मिळतो. मनाजोगत्या कार्यक्रमाचा आनंद घरातल्या टीव्हीसमोर मिळत असेल तर का बाहेर जा?
 
 
आजकाल कार्यक्रमांची खूप रेलचेल असते. एक तर लग्न, साखरपुडा, मुंज, वाढदिवस असे विविध कौटुंबिक कार्यक्रम सुचू देत नाही. धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद त्यांचीही लज्जत चाखावी लागते. त्यामुळे ‘कुठे कुठे जायाचे कार्यक्रमाला’ अशी बिचार्‍या सामान्य प्रेक्षकांची स्थिती होते.
 
 
ज्या तरुण पिढीने ही परंपरा, आपले सांस्कृतिक वैभव अनुभवायचे, ते मात्र इकडे क्वचितच वळतात. ज्येष्ठ मात्र उत्साहाची झूल पांघरून आवर्जून कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतात.
 
 
आजच्या सुजाण पालकांना आपल्या पाल्यात भावी झाकीर हुसेन, सुधा चंद्रन, डॉक्टर श्रीराम लागू, लता मंगेशकर दिसतात. उगवती पिढी शास्त्रीय संगीत, नृत्याच्या कलांचा वारसा पुढे नेत आहे- जतन करत आहे, हेही नसे थोडके!
 
 
पण, सगळेच काही शिखरावर जाऊ शकत नाही. रियाज, साधना, परिश्रमातून कलाकार हळूहळू घडतात. सध्याच्या काळात त्यांना वाव आणि दाद मिळेल का, हाच प्रश्न आहे. त्यांना व्यासपीठसंधी हव्या असतात. कलेला श्रोत्यांची भरभरून पोचपावती हवी असते. आजचे मोठे कलाकारपण कधीतरी छोटे होतेच ना! तेव्हा छोट्या- स्थानिक कलाकारांना टीव्ही बाजूला ठेवून वाव आणि दाद दोन्ही देऊ या, हो ना?
9975725347