फुलत राहो तव स्वरांचा ‘मोगरा’

    दिनांक :27-Sep-2019
सुचित्रा कातरकर
नभी जोवर हे सूर्य चंद्र तारे
तुझ्या गाण्याचे वाहतील वारे
फुलत राहो तव स्वरांचा मोगरा
स्वरलते तुज मानाचा मुजरा
 
लता मंगेशकर हा आमच्या युगात आम्ही मनापासून अनुभवलेला एक चमत्कार आहे. या चमत्काराने सार्‍या जगाला वेड लावले. ‘लता दिनानाथ मंगेशकर’ नाव ऐकल्याबरोबरच आमचे अस्तित्व अलवार होते.
 
लता मंगेशकर आम्हाला लाभलेले ईश्वरी वरदान आहे. वर्षांपासून कित्येक वर्षे उलटून गेली तरी या स्वरांचे माधुर्य कमी झाले नाही. मार्दव लोपले नाही. टवटवीतपणा मलूल झाला नाही. आजोबांनी आपल्या बालपणात, किशोरवस्थेत आपल्या स्मृतीत जपून ठेवलेला कोमल, मंजूळ स्वर, नातवाच्या हाती सोपविला, तेव्हा तो तेवढाच अद्ययावत राहिलेला होता. त्यावर वयाची एकही सुरकुती पडली नव्हती. लतादीदी ही अलौकिक प्रतिभेची स्वर्गीय सुरांची समृद्ध गायिका. तिचे दैवी सूर, तिची अत्यंत मधूर गाणी आम्हाला अमृतानुभव देणारी ठरली म्हणूनच तर ती आहे स्वरसम्राज्ञी!

 
वयाच्या 13व्या वर्षापासून तर आता आतापर्यंत चंदेरी दुनियेत; सिनेसृष्टीत आपल्या दैवी स्वरांनी सर्वोच्च स्थान निर्माण करणारी लतादीदी हा विसाव्या शतकातील चमत्कारच आहे.
 
सुरवातीला गायिका नायिका नूरजहॉं यांचा लताच्या गायन शैलीवर थोडा प्रभाव होता; पण लगेच तिने स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण केली. अनेक पिढ्यांवर जिच्या जादूई आवाजाने गारुड केले त्या गानकोकिळेच्या स्वर यात्रेचा हा परामर्श माझ्या अल्पमतीप्रमाणे-
 
लता आकाशात उंच जाणार्‍या झगमगीत तेजस्वी बाणासारखी होती. म्हणूनच प्रत्येक संगीतकाराने आपल्याकडील ठेवणीतल्या चीजा, सर्वोत्कृष्ट संगीत रचना लताच्या स्वाधीन केल्या. िंहदी चित्रपटांचा सुवर्णकाळ लताच्या लखलखीत गाण्यांनी झळाळून उठला आहे.
 
संगीतकार गुलाम हैदर, नौशाद, खेमचंद प्रकाश, मदनमोहन सी. रामचंद्र, वसंत देसाई, सुधीर फडके, स्नेहल भाटकर, शंकर जयकिशन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, हेमंतकुमार, सचिन देव बर्मन, सलील चौधरी, अनिल विश्वास, आर.डी. बर्मन, हृदयनाथ यासर्वच संगीतकारांची प्रथम पसंती होती ती फत आणि फक्त लता! फक्त लताच कां? कारण लताच्या आवाजातले दिव्यत्व; अलौकिकत्व त्यांनीच ओळखले होते. लता ही निःसंशय अद्वितीय गायिका आहे. याची त्यांना खात्रीच पटलेली होती. गायिकेच्या ठायी आवश्यक असलेली शिस्त लतापाशी होती. अतोनात मेहनत कष्ट आणि उत्तमोत्तमाचा ध्यास ही तिच्या गाण्यातील वैशिष्ट्ये.
 
1948 साली लताचा आवाज नवखा, कोवळा होता. एकदा संगीतकार गुलाम हैदर स्टुडिओत फेरफटका मारत असताना लताचे ‘बुल बुम मत रो यहा, आँसू बढाना है मना’ हे गाणे ऐकून प्रभावित झाले. तिच्या धारदार आवाजावर लुब्ध झाले. अनेक निर्मात्यांकडे तिच्या आवाजाची शिफारस केली पण त्यावेळी सर्वांना तिचा आवाज पातळ, बालीश वाटला. अनेकांनी नाके मुरडली; पण गुलाम हैदरचा लताच्या आवाजावर पूर्ण विश्वास होता. ते बोलून गेले ‘‘आज तुम्ही लताच्या आवाजाला नाकारता आहात पण एक दिवस असा येईल की ती उंच शिखरावर असेल सार्‍या संगीत जगतावर राज्य करेल आणि तुम्ही तिच्या आवाजासाठी रांगेत उभे असाल.’’, ही भविष्यवाणी 1949 मध्ये लताच्या ‘आयेगा आनेवाला’ या गाण्याने तंतोतंत खरी ठरली. महलच्या या गाण्याने इतिहास घडविला. या अद्भूत गूढरम्य गाण्याने लताचा आवाज भारताच्या कानाकोपर्‍यात पोहोचला. पहाडी-मांड रागात बांधलेल्या या गीताचे संगीतकार होते खेमचंद प्रकाश हे गीत ऐकताना आपण झपाटून गेलेले असतो. अलौकिके प्रतिभेची देणगी लाभलली आणि गळ्यात गंधार असलेली लतासारखी गायिका शतकात एखादीच निर्माण होते हेच खरे. या गाण्याची लोकप्रियता येवढी की इतक्या वर्षानंतर ही हे गीत रसिकांच्या मनात घर करुन आहे.
 
‘जिंदगी उसीकी है जो किसी का हो गया प्यार ही मे खो गया...’, या गीताचे सूर जेव्हा कानावर पडतात तेव्हा श्वास रोखला जातो. लताचे हे सर्वोत्कृष्ट गीत. सुंदर आणि अगम्य रचना. अजूनही या गाण्याची गोडी जराही कमी झालेली नाही. सी. रामचंद्र यांनी स्वरबद्ध केलेले व राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलेले हे ‘अनारकली’ चित्रपटातले ‘भीमपलासी’ या रागातले हे अजरामर गीत. यातील सर्वच लताची गाणी लोकप्रिय झाली; पण ‘ये जिंदगी उसाकी है’, या गीताची बात कुछ और थी! उत्कृष्ट गीत, सर्वोत्तम संगीत, सर्वोत्तम गायिका या तिघांची या गाण्याची निर्मिती म्हणजे हिंदी चित्रपट संगीतातील ‘कोहिनूर हिरा’ अशी ही अजोड कामगिरी! ...आज 65 वर्षे झाली तरी या गाण्याची अवीट गोडी तिळभरही कमी झाली नाही. लता हे गीत गातांना अलौकिक स्वरांची पेरणी करते. यातील तिचे आलाप म्हणजे सुरेख नक्षीकाम. लता आपल्या दैवी स्वरांचे दर्शन घडविते. ‘प्यार ही मे खो गया’, हे ऐकताच आपण खरोखरच लता स्वरांच्या दुनियेत हरवून जातो ही केवळ लताच्या अलौकिक स्वरांची जादू.
 
'आज सोचा तो आँसू भर आये, मुद्दते हो गयी मुस्कुराये’, ही गझल गातांना लताला गहिवरून आले. समर्पक शब्द, काळीज हेलावणारी सुरावट ‘हँसते जख्म’ साठी संगीतकार मदनमोहन यांनी सजविली. एक बेहतरीन गझल. गायिका अर्थात त्यांची आवडती लता. मदनमोहनच संगीताची ही कमाल आहे. लताने आपल्या अलौकिक आणि आर्त स्वरांनी ही गझल अजरामर केली आहे. असे भारून टाकणारे सूर फक्त लताचेच असणणार यात तिळमात्र शंका नाही. आजही ही गझल ऐकली की गहिवरून येते, काळीज हेलावते.
 
वह कौन थी? चित्रपटातले हे गीत मदनमोहनने पहाडी रागात संगीतबद्ध केले. पिया तोरे आवन की आऽस... म्हणत स्वरांच्या मोहोळाने दीदी भारून टाकते.
 
कॉंटो से खींच के ये आँचल, हे गाणं आहे ‘गाईड’ या सिनेमातलं. मिश्र भैरवीची ही सुरेख आणि सळसळ ती संगीत रचना सचिन देव बर्मन यांची. या गाण्याचं पहिलं वैशिष्ट्य हे की, गाण्याची सुरवात लताने अंतर्‍याने केली आहे. लताने आवेश आणि आवेग यांची सांगड घालून स्वरांचा मस्त जोश निर्माण केलेला आहे. यातले आलाप ऐकताना आपण स्तिमित होतो. लताची स्वरांवर किती हुकुमत आहे, याचा प्रत्यय येतो. अशा रचना चित्रपट संगीतात अभावानेच आढळतात. सलाम सचिनदा को आणि अर्थातच लता को!
 
तेरा जाना दिल के अरमानो का लूट जाना, ऋषिकेश मुखर्जींच्या ‘अनाडी’ या चित्रपटातील हे सुंदर गीत लिहिले आहे शैलेंद्रने. संगीतकार शंकर-जयकिशन, गायिका अर्थातच लता. भैरवीच्या जीवघेण्या स्वरांच्या सुरावटीने प्रियतमेच्या दुःखाचे परिमाण अतिशय कौशल्याने खूप उंचावर नेऊन ठेवले आहे. लताचे स्वर, तिचे आलाप काळजाला स्पर्शून जातात तसेच रसिकांच्या डोळ्यांत अश्रू उभे करण्याचं सामर्थ्य आपल्या अप्रतिम अभिनयाने लताच्या दर्दभर्‍या स्वराला सार्थ रूप दिले आहे ते नूतनने. लता जेव्हा ‘तेरा जाना’ नंतर ‘कोई देखे’च्या वेळी आलाप घेऊन तार सप्तकात जाते तेव्हा अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो. भैरवीचे अप्रतिम स्वर, लताची अपूर्व गायकी, शैलेंद्रची समर्पक रचना यांचा दुग्धशर्करा योग म्हणजेच हे उत्कृष्ट गीत!
 
लताने गायलेले चोरी चोरी चित्रपटातलील ‘रसिकबलमा दिल क्यों लगाया तोसे दिल क्यों लगाया’ या शुद्ध कल्याण रागातील गाण्याची एक आठवण सांगतात- प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक मेहबूब खान यांना इंग्लंडमधील हॉस्पिटलमध्ये औषधोपचारासाठी दाखल केले होते. एका रात्री ते पार अस्वस्थ झाले तेव्हा त्यांनी त्याच अवस्थेत लताला फोन लावला आणि म्हटले ‘‘मुली! मी आजारपणामुळे जरा बेचैन आहे. ही अवस्था दूर करण्यासाठी तू ‘रसिक बलमा’ हे गाणं फोनवर ऐकव, मला आराम पडेल.’’ ही विनंती ऐकून लताने हे गाणं फोनवर त्यांना ऐकवले. गाणं ऐकल्यावर मेहबूब खान यांना खरोखरच आराम वाटला. हा संगीताचा प्रभाव होता की लताच्या जादूई दैवी स्वरांचा महिमा!
 
लिहायला गेलं तर अशी असंख्य गाणी लताची लिहिता येतील. किती गाण्यांबद्दल लिहू नि किती गाण्यांबद्दल सांगू, असं होऊन जातं. काहीच मोजक्या गाण्यांबद्दल थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला. तसं तर तिचं संपूर्ण गाणंच लौकिकाच्या पार गेलेलं आहे. दीदींचे गाणे अजरामर आहे. अत्यंत मधुर आहेच, पण त्या बोलतातही तेवढ्याच गोड. त्यांचे शब्द, पुन:पुन्हा ऐकत राहावेसे वाटतात. एखादे वाक्य जरी त्या बोलल्या, तरी क्षणार्धात ऐकणार्‍यांची हृदये जिंकतात. याचा प्रत्यय मलाच काय, हजारो लोकांना आळंदी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आला. तिथे त्यांनी प्रचंड जनसमुदायासमोर जे अमृतमधुर भाषण दिले ते वर्णनापलीकडेचे आहे. खरोखरच-
 
अजी सोनियाचा दिनू
वर्षे अमृताचा धनू।
 
असाच तो सोहळा होता. पैजा जिंकणारी। अजरामर वाणी। ऐसी तुझी वाणी अमृताची। असं महत्भाग्य त्या दिवशी आळंदीला जमलेल्या असंख्य रसिकजनांच्या वाट्याला आलं होतं. त्यांच्या साधेपणाला संयमाचे तेज आहे. खर्‍या कलावंताला सन्मानाने जगवा, त्याचा मान राखा, त्याच्या आयुष्याची धूळधाण करू नका, असं गहिवरून सांगणार्‍या लतादीदी किती हृदयस्पर्शी आहेत. कोणत्याही भावनेशी तद्रूप होताना त्या आपले डोळे मिटून घेतात. जणू त्यांचे मन त्या भावनेशी, त्या शब्दांशी, काव्यातील अर्थाशी तादात्म्य पावते. मग ते गाणं, तो भाव, तो आशय घेऊनच त्यांच्या गळ्यातून बाहेर पडतं व अजरामर होतं.
'बागेस शिंपिले तू रक्तातल्या स्वरांनी
गातात त्या कळ्याही आता तुझीच गाणी'.