जीविचे जाणते माता। तू मज माता रोकडी।

    दिनांक :28-Sep-2019
उद्या, रविवारी घटस्थापना. घट म्हणजे आपले शरीर. त्या नाशिवंत घटात प्रतिष्ठापना करायची ती, त्या ब्रह्मचीत्कला मातेची. उद्या अश्विन शुद्ध प्रतिपदा. शारदीय नवरात्राचा प्रारंभ. जगज्जननी अंबामातेचा नऊ दिवस आणि नऊ रात्री जागर. पहिल्या माळेपासून नवव्या माळेपर्यंत शांतपणे तळपणारा नंदादीप. उदाधुपाच्या गंधाने आणि मातृभक्तीच्या भावनेने भारलेले वातावरण. सनातन भारतीय संस्कृतीचा गजर करणारे हे दिवस. स्त्रीशक्तीला मातृरूपात पूजण्याचे पर्व. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता... या वचनाची आठवण करून देणारा हा काळ. ही जगज्जननी जशी आपल्या सर्व पुत्रांवर माया-ममतेची पाखर घालणारी आहे, तशीच त्यांच्यावर आलेल्या संकटांचा नाश करणारी उग्ररूपिणी चंडिकाही आहे. आज तिच्या याच रूपाची अग्रक्रमाने आराधना करण्याचा काळ आहे. दिवस अत्यंत धामधुमीचे आहेत. येणारा काळ आपली परीक्षा घेणारा आहे. आपली करणी, आपली वाणी आणि आपली लेखणी या तीनही शाश्वत शस्त्रांंमध्ये आज या उग्ररूपिणीचा संचार व्हायला हवा. ज्याप्रमाणे या आदिशक्तीने आपल्या आठही हातांतील शस्त्रांंनी आपल्या संस्कृतीवर, आपल्या धर्मावर, आपल्या विचार-आचारांवर घाला घालणार्‍या दुष्टदुर्जनांचे समूळ पारिपत्य केले, तेच आज करायचे आहे. त्यासाठीच हे नवरात्र म्हणजे जसे तिच्या आराधनेचे पर्व आहे तसेच ते तिच्या आशीर्वचनांचेही पवित्र पर्व आहे.
 
 
 
आजपासून साडेतीनशे वर्षांपूर्वी ज्या आर्ततेने आणि कळकळीने तिच्या भक्तांंनी ‘बयाऽ दार उघड...’ म्हणून साद घातली, तीच आर्तता आजही आवश्यक आहे. असे झाले तरच कोटी कोटी सूर्यांनी तेजाळलेल्या आदिशक्तीचे दर्शन होईल. पुराणकाळातही ज्या वेळी अशी अवस्था आली त्या वेळी, हीच आदिमाया प्रत्यक्ष देवांची संकटे निवारण करायला आली होती. भगवती सीतामातेचे हरण करणार्‍या रावणाच्या लंकेचा मार्ग, प्रभुरामचंद्रांना तिनेच दाखवला. म्हणूनच तिला रामवरदायिनी म्हणतात. इतिहासकाळातही शिवप्रभूंच्या खड्गात ती अवतीर्ण झाली. आई तुळजाभवानीच्या राउळाचा विध्वंस करणार्‍या अफझल खान नामक महिषासुराचा अंत तिनेच घडविला. म्हणूनच या सृष्टीतील अनंत कमलपुष्पांना जीवनदान देणारे तिचे भव्य, उदात्त आणि विराट रूप आज प्रकटायला हवे. समर्थ म्हणाले होते-
देवांची राहिली सत्त्वे। तू सत्त्व पाहसी किती?।
भक्तांसी वाढवी वेगे। इच्छा पूर्ण घरोघरी।।
सूर्य आणि चंद्र या महामायेचे डोळे आहेत. पंचपंच उषःकाली हरित वसने लेऊन नवजीवनाचे आश्वासन देणारी, माध्यान्हकाळी कर्तव्यकठोरतेची जाणीव करून देणारी आणि संध्याकाळी श्रांत झालेल्या आपल्या लेकराला मायेने कुशीत घेणारी ही आदिमाया उद्या रविवारी घरोघरी येणार. उत्पत्ती-स्थिती-लय यांची अधिष्ठात्री असलेली जगदंबिका गृहप्रवेश करणार. प्रत्यक्ष शिवशंकराच्या ‘तांडवा’पेक्षाही तिचे ‘लास्य’ रुद्रभीषण होईल, असेच तिचे आराधन झाले पाहिजे. पृथ्वीवरील जी संपत्ती, जे तेज, जे बळ, जे यश आणि जे जे काही लोकोत्तर म्हणून आहे, ते ते म्हणून या भरतभूमीच्या ठायी एकवटलेले आहे, अशी या भूमीची ख्याती होती. सुजलाम्‌ सुफलाम्‌ या भूमीत चौदा विद्या आणि चौसष्ट कला रुजलेल्या होत्या. ही माती साधनेची आणि सिद्धीची होती. परंतु, याच भूमीत जन्म घेतलेल्या आणि तिच्याच मातीमधील अन्नावर पोसलेल्या काही अवसानघातक्यांनी तिच्या यशाच्या पताका पायदळी तुडवल्या. अशा असुर वृत्ती आज परत डोके वर काढताहेत. त्या असुरांचा विनाश करण्यासाठी मातेचे आशीर्वाद हवेतच.
 
 
आज सर्वत्र लाचारीचे आणि स्वार्थाचे तण माजलेले दिसतात. प्रत्येक जण स्वतःच्याच कोषात गुरफटलेला आहे. जीवनाची सर्व अंगे सत्ताकारण आणि स्वार्थी राजकारण यांनी बरबटून गेलेली आहेत. ‘मतमतांचा गलबला, कुणी पुसेना कुणाला...!’ अशा अवस्थेत सामान्य जनता संभ्रमावस्थेत जगते आहे. अशी, मेलेली मने घेऊन जगणार तरी कसे? आणि हीच जनता आईला हाक घालते आहे. तिचे सामर्थ्य अंशरूपाने तरी आपल्यात प्रकट व्हावे, हीच जनतेची इच्छा आहे. उद्या देवीच्या एकाच पदक्षेपाने हेच चैतन्य समाजमनात पुनर्स्थापित झाले पाहिजे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी अधिष्ठात्री, कुलस्वामिनी आम्हाला प्रसन्न हो आणि नवचैतन्याचे वरदान दे. समर्थ म्हणतात-
दुष्ट संहारिले मागे। ऐसे उदंड ऐकितो।।
परंतु रोकडे काही। मूळ सामर्थ्य दाखवी।।
बहुत ऐकिले होते। रामासी वरू दिधला।।
मीही दास रामाचा। मजही वरदायिनी।।
मुक्त केल्या देवकोडी। सर्वही शक्तीच्या बळे।।
समर्थ भवानी माता। समर्था वरू दिधला।।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात, समर्थांनी मागितलेले दान आईने त्यांच्या पदरात ‘याचि देही याचि डोळा’ टाकले. त्या काळच्या आणि आजच्या परिस्थितीत तसा फारसा फरक नाही. छत्रपतींनी सामान्य जनतेच्या मनातील वेदना जाणून त्यांचे दैन्य आणि दुःख नष्ट करण्यास पावले उचलली. शिवकल्याण राजा म्हणून ख्याती प्राप्त केली. परंतु, त्या काळीही त्यांना विरोध करून नामोहरम करण्याचा प्रयत्न करणारे महाभाग होतेच. प्रत्यक्ष शत्रूंचे एक वेळ जाऊ द्या, कारण ते उघड उघड शत्रुत्व पत्करलेले होते. परंतु स्वकीयांचे काय? स्वकीयही जेव्हा विरोध करतात त्या वेळी केवळ मनःशक्ती नव्हे, तर शरीरशक्तीचाही वापर करावा लागतो. ज्याचेवर शक्तिरूपा जगदंबेची कृपा असते, तोच सर्वत्र विजयी ठरतो. म्हणूनच मातृरूपेणनंतर महत्त्वाचे म्हणजे शक्तिरूपेण संस्थितः. शक्तिहीन व्यक्तीला आणि पुढे समाजाला, पर्यायाने राष्ट्राला कुणीही अंकित करून घेते. आपल्या देशाने याचा अनुभव घेतलेला आहे. शक्तिहीनाला परमेश्वरसुद्धा मदत करीत नाही. बळी हा नेहमी बकर्‍याचा दिला जातो.
अश्वम्‌ नैव गजं नैव व्याघ्रम्‌ नैवच नैवच।
अजापुत्रम्‌ बलिम्‌ दद्यात देवो दुर्बलघातकः।।
आज आपली संस्कृती, आपली परंपरा, आपले संचित यांचे सर्वार्थाने रक्षण करण्याची कधी नव्हती एवढी आवश्यकता निर्माण झाली आहे. असे रक्षण मृत मानसिकतेने होत नसते. त्यासाठी मनोबल उंचावले पाहिजे. समाजाच्या योग्य धारणेसाठी नितांत आवश्यक असलेली सज्जनशक्ती आणि सृजनशक्ती एकत्रित यायला हवी. आजच्या घटस्थापनेपासून हे शक्तिजागरण करू या. समाजातील या शुभशक्तींना कळवळून हेच आवाहन करावेसे वाटते की, येणार्‍या काळाचे आव्हान पेलण्यासाठी सर्व शक्तिनिशी कार्यप्रवण व्हा. हा माझा, तो तुझा, ही वृत्ती त्यागून एका हाकेसरशी एकत्र या. जगदंबेचे असे सर्व पुत्र एकत्र आले, तर विनाशकारी शक्तींना नष्ट व्हायला कितीसा अवधी लागणार? आईची हीच अपेक्षा आहे तिच्या मुलांकडून!
सार संसार शक्तीने। शक्तीने शक्ती भोगिजे।
शक्ती तो सर्वही भोगी। शक्तिवीण दरिद्रता।
शक्तीने मिळती राज्ये। युक्तीने यत्न होतसे।
शक्ती युक्ती जये ठायी। तेथे श्रीमंत धावती।
जीविचे जाणते माता। तू मज माता रोकडी।
लोकांच्या चुकती माता। अचूक जननी मला।।
या संबंधात अलीकडले उदाहरण द्यायचे झाले, तर उरी आणि 370 चे देता येईल. शक्तीने मिळती राज्ये म्हणजे उरी, तर युक्तीने यत्न होतसे म्हणजे 370! आणखी पुढे जाऊन सांगायचे झाले, तर परवाच, नुकताच अमेरिकेत झालेला पंतप्रधानांचा भव्य कार्यक्रम म्हणजे ‘शक्ती युक्ती जये ठायी तेथे श्रीमंत धावती।’ यासाठीच तर त्या आदिशक्तीची प्रार्थना करायची. स्वभाषा-स्वदेश-स्वधर्म यांच्या रक्षणासाठी दुष्ट प्रवृत्तींचा नाश कर. सरसावलेल्या तुझ्या पावलांची शक्ती आमच्या पायांत येऊ दे. आमच्या हातांना तुझ्या शस्त्रांचे रूप लाभू दे. दुष्ट निर्दालनाचा धगधगता अंगार आमच्या मनात पेटू दे... तुझ्या उदोकाराने आसमंत निनादू दे... आणि धर्मसंस्थापनेच्या या संग्रामात तू उद्या घटस्थापनेपासून आमच्या पाठीशी सदैव उभी राहा.
या देवी मधुकैटभप्रमथिनी या माहिषोन्मूलिनी।
या धूम्रेक्षणचंडमुंडमथिनी या रक्तबीजाशिनी।।
देवी शुंभनिशुंभदैत्यदलिनी या सिद्धलक्ष्मीपरा।
सा दुर्गा नवकोटीमूर्तीसहितां मां पातु विश्वेश्वरी।।
 
प्रकाश एदलाबादकर
9822222115