धाव पाव गुरुमाय माझे...

    दिनांक :28-Sep-2019
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
 
 
नवरात्र हे शक्ती आराधनेचे महापर्व आहे. या काळात शक्तीच्या नऊ स्वरूपाची पूजा केली जाते. वर्षातून चार वेळा नवरात्र साजरे केले जाते. पौष, चैत्र, आषाढ आणि अश्विन महिन्यातील प्रतिपदा ते नवमी या काळात नवरात्र पाळण्याचा प्रघात आहे. नवरात्रातील नऊ रात्रीत महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली तसेच नवदुर्गेच्या स्वरूपाची आराधना होते. भारतातील सगळ्या राज्यात नवरात्रपर्व उत्साहात साजरे होते. नवरात्र उत्सव, वसंत आणि शरद ऋतूच्या संगमावर येतो. जल, वायू आणि सूर्याचा प्रभाव या काळात सर्वात जास्त असतो. हे पर्व नवदुर्गेच्या भक्ती आणि परमात्मतत्त्वाच्या शक्तीचे शुभ आणि मंगलकारी स्वरूप आहे. नवरात्री महापर्व वैदिक युगाच्या आधीपासूनच साजरे होते. गायत्री साधना केंद्रिंबदू असलेलं हे पर्व म्हणजे उदात्त, परममंगल आणि रचनात्मक ऊर्जेचा प्रसव करणारा महोत्सव आहे. प्रत्येक जीवात्म्याला शक्तीची आवश्यकता असते. त्यामुळेच आदिकाळापासून केवळ मनुष्यच नव्हे, तर ईश्वरदेखील आद्याशक्तीचे उपासक राहिले आहेत. ऋग्वेदात देवीस्वरूप उषेचे अनेकदा स्तुतिवर्णन आले आहे. शक्ती उपासनेची परंपरा ही सृष्टी आरंभापासूनची आहे. जेव्हा दैत्यांच्या भयाने कंपित होऊन ब्रह्मदेवाने भगवान श्रीहरी विष्णूला जागृत केले, त्या वेळी ब्रह्मदेवाने माता दुर्गेचा धावा केला होता. मधु कैटभाशी युद्ध करताना श्रीहरी विष्णूने भगवतीचीच प्रार्थना केली होती. शक्ती-आराधना वैदिक, पौराणिक आणि तांत्रिक या तीन प्रकारे केली जाते. जगताच्या उत्पत्तीचे कारण जसे शक्ती आहे तसेच स्थिती आणि संहार यांचे कारणदेखील हीच प्रकृती (शक्ती) आहे.
 

 
 
ॐ अदितिद्योरदितिरन्तरिक्षमदितिर्माता:
स पिता स पुत्र: विश्वेदेवा अदिति:
पंचजना अदितिजातिमादितिर्रजनित्वम
 
ऋग्वेदात शक्तिपूजेच्या संदर्भात अदिती स्तुती केली आहे. यानुसार अदिती सर्वत्र आहे. अदिती हीच स्रष्टा आणि सृष्टी आहे. अंतरिक्ष, मातापिता आणि पुत्र तसेच विश्वदेवदेखील अदिती आहे. उपनिषद ग्रंथात याच शक्तीला अजा म्हटले आहे. रात्रीसूक्तात अदितीला अंधकार नाश करणार्‍या प्रकाशमान अमर्त्य आणि सर्वत्र असणार्‍या शक्तीचे स्वरूप म्हटले आहे.
 
ओर्बप्रा अमर्त्त्या निवतो देव्युद्वतः
ज्योतिषा वाधते तमः
देवीसूक्तात शक्ती स्वतः म्हणते की, मी रुद्र, वसु आणि आदित्य तसेच विश्वदेव स्वरूपात विचरण करते.
 
अहं रुद्रेभिर्वसुभिश्चराम्यहमादित्यैरुत विश्वदेवैः
अहं मित्रावरुणोभा बिभर्म्यहमिन्द्राग्नी अहमश्विनोभा
 
 
योगशास्त्रात वर्णन केलेली कुंडलिनी शक्ती म्हणजेच ही आद्याशक्ती आहे. याच कुंडलिनीच्या आधारे साधकयोगी षडचक्राचे भेदन करून शिवस्वरूपात विलीन होतात. सृष्टी संचालनासाठी प्रकृती म्हणजेच शक्ती अर्थात मातृरूपिणी जगदंबेचे स्थान प्रधान मानले आहे. सृष्टिधारेतील स्त्री आणि पुरुष यामध्ये मूळप्रकृती स्त्रीस मानले गेले आहे. देवी भागवतानुसार, सगळ्या देवी आणि समस्त मातृशक्ती या प्रकृतीच्या अंशरूपिणी आहेत. शक्ती जेव्हा ब्रह्मोन्मुख असते तेव्हा त्या ब्रह्मशक्तीला प्रकृती असे म्हणतात, तर जेव्हा ती ब्रह्मविमुख होते तेव्हा ती विकृती होते. भारतीय परंपरेत प्रकृती पूजेचे विधान असून विकृतीला सदैव त्याज्य मानले आहे. संकटाच्या वेळी आपण मातेचं स्मरण करतो. हे स्मरण आद्यशक्तीचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे. ‘आपदि मातैव शरणम’ अर्थात संकटकाळात माता हीच पोटाशी घेते. म्हणूनच भारतात सदैव मातृशक्तीची उपासना, आराधना आणि जागरण केले जाते. नामस्मरण, जपादी वेळी सर्वशक्तिमान प्रधानदेवतेच्या पूर्वी शक्तीचे नामोच्चारण केले जाते. उदा.- सीताराम, राधेकृष्ण, लक्ष्मीनारायण, गौरीशंकर, मंजिरीमाधव. प्रधानदेवता ही तिच्या शक्तीशिवाय अपूर्ण आहे. परब्रह्मस्वरूपिणी जगतजननी दुर्गा विश्वाम्बा आहे. ही जगदंबा समस्त जीवसृष्टीत मातृरूपात अवस्थित आहे.
 
 
या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता। 
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
 
शक्तिस्वरूपिणी जगदंबा एक असली, तरी भक्तांवर कृपा करण्याच्या हेतूने ती अनेक रूप धारण करते. नारायणी रूपात ही श्री आणि लक्ष्मी आहे. भक्तांना शारीरिक व मानसिक स्वास्थ, विद्या, बुद्धी तसेच आर्थिक संपत्ती, धनधान्य प्रदान करण्यासाठी ही जगद्धात्री महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली या तीन रूपात अवतीर्ण होते. वैदिक मातृपूजन परंपरेत सप्तमातृका, षोडशमातृका, चौसष्ठ योगिनी पूजेचे विधान आहे. बाळ जन्मास आल्यावर पाचव्या दिवशी पाचवीची केली जाणारी पूजा हे शक्तिपूजनाचे प्रतीक आहे. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या नऊ रूपांत दुर्गा वास करते. वैदिक परंपरेत अदिती, उषा, इंद्राणी, इला, भारती, होला, श्रद्धा, पृश्नी यांची उपासना मंगलकार्यात केली जात असे. महामृत्युंजय मंत्रातदेखील त्र्यंबक म्हणजेच तीन अंबायुक्त शक्तिस्वरूप असे म्हटले आहे. मार्कंडेयपुराणानुसार ‘स्त्रीय: समस्ता सकला जगत्सु’ म्हणजेच समस्त स्त्रिया जगदंबेच्या अंश आहेत. परमात्म्याची पूर्णपरात्पर शक्ती ही जगदंबा आहे. ‘यत्र नार्यस्तु पूज्यंते। रमंते तत्र देवता:।।’ हा भारतीय परंपरेचा पाया आहे. श्रीरामाची शक्तिपूजा, श्रीकृष्णाची अंबिका वनातली दुर्गापूजा, परशुरामाची त्रिपुरा देवी आराधना आणि उत्तरकाळात बौद्धांनी तारादेवीची केलेली आराधना ही भारतीय संस्कृतीतील शक्ती उपासनेची परंपरा आहे. अध्यात्मपथावरील मुमुक्षू साधकांना नवरात्र उत्सव म्हणजे पर्वकाळ असतो. नवरात्र हे शक्ती उपासनेसोबतच अंतर्मनातील मलिनता दूर करून गतिशीलता देणारे महापर्व आहे. ही गतिशीलता व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय आणि वैश्विक असू शकते.
 
 
वैदिक विज्ञानानुसार सृष्टी एकचक्रीय धारेत चालत आहे. प्रकृती प्रत्येक काळात नवनवीन वस्तू निर्माण करते. प्रत्येक दिवसानंतर रात्र आणि रात्रीनंतर दिवस, पानझडीनंतर वसंत आणि वसंतानंतर पानझड हे निश्चित आहे. सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख हेदेखील ठरले आहे. जन्म आणि मृत्यू हा फेरादेखील चक्राकार आहे. प्रकृतीमधील स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत सगळ्या रचना आणि व्यवस्था या चिरपुरातन नित्यनूतन या चक्रीय मार्गाचेच अनुसरण करतात. नवरात्रपर्व हेदेखील मनुष्याचे मन आणि बुद्धी यांना संसारातील धावपळीतून आत्ममग्न होण्यासाठी सुवर्णसंधी आहे. नवरात्र उत्सव मनुष्याच्या आतील आंतरिक यात्रा असून जड-चेतन पदार्थांच्या उत्पत्ती, स्थिती आणि महाविलयापर्यंतचा प्रवास उलगडून देणारे साधन आहे. मनुष्याचे मन सत्त्व-रज-तम या त्रिगुणात्मक प्रकृतीत रममाण असते, परंतु यातून बाहेर येऊन ब्रह्माण्डाच्या कणाकणात आणि क्षणाक्षणात सदैव सक्रिय असलेल्या महारहस्यापासून आद्यशक्तीला ओळखणे हे नवरात्राचे उद्दिष्ट आहे. मूळमाया आदिभवानीचे वर्णन करताना जगद्गुरू देवनाथ महाराज म्हणतात-
 
जयजय आदिभवानी अंबे मातापुरवासिनी वो
चित्कळा मालिनी निजजनपालय सुखदायिनी वो
 
पूर्णब्रह्मयोगिनी, जनमानसाला मोहून टाकणारी, भवभयसंहारिणी, विश्वाधारा अशी आदिमायेची स्तुती करून जगद्गुरू देवनाथ महाराज म्हणतात, वेदश्रुतींनादेखील तुझा महिमा आकळत नाही. शरणागतांना तारक असणार्‍या भगवतीची शक्ती साधकांना गती प्रदान करते.
 
श्रीविष्णे बाराही भद्रकाली श्रीभगवती वो
भक्तवत्सले सदये महिमा न कळे वेदश्रुती वो
शरणागत तारके अंबे अंतःकरणी गती वो
 
नवरात्र म्हणजे सत्त्व-रज आणि तमाची म्हणजेच गुणावगुणांची समीक्षा करून शुद्धी करण्याचा काळ आहे. त्रिगुणात्मक तत्त्वांनी गुंतलेली मनुष्याची प्रकृती अज्ञान आणि मोहाच्या परिभ्रमणात असते. नवरात्रात या तीन प्रकृतींचे क्रमश: शुद्धीकरण करून मनुष्याच्या अंतर्मनात नवनिर्माणाचे अंकुर तयार करणे ही प्रक्रिया होत असते. भारतीय धर्मसंस्कृतीतील नवसृजनाचा महोत्सव असलेल्या नवरात्रातील पहिल्या तीन दिवसांत दुर्गा शक्तीचे आराधन करतात. दुर्ग म्हणजे पर्वत, टेकडी अथवा शैल. मनुष्याच्या आत अहंकार, अज्ञान आणि आसक्तीचा पर्वत आहे. मौन, प्रार्थना, सत्संग आणि ध्यान या चतुर्विध आयुधांनी हा अज्ञान-अहंकाराचा दुर्ग नष्ट करण्यासाठी नवरात्रातील पहिले तीन दिवस आहेत. पुढील तीन दिवस हे राजस प्रकृतीचे असतात. नवरात्रातील चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या दिवशी श्रीलक्ष्मीचे पूजन करतात.
 
 
अध्यात्म संस्कृतीत श्रीलक्ष्मी हे रज तत्त्वाचे प्रतीक आहे. ज्ञान, वेळ (काळ), शक्ती आणि संपत्ती या चार रूपात धन प्राप्त होते. मिळालेल्या लक्ष्मीचा विवेकपूर्ण उपयोग हे या तीन दिवसांच्या पूजनाचे फलित आहे. शेवटच्या तीन दिवसांत देवी सरस्वतीचे पूजन होते, जे सत्त्वाचे प्रतीक आहे. सत्त्व म्हणजे शुभ-शिव-मंगल! शुद्ध सत्त्वाच्या गुणांचा प्रवाह सातत्याने प्रवाहित होत राहो, ही सरस्वती पूजनाची संकल्पना आहे. अश्विन नवरात्राचे अंतिम महापर्व म्हणजे विजयादशमी-दसरा! नवरात्रातील नऊ दिवसात केलेले तमसाचे विसर्जन, रज तत्त्वाची विवेकपूर्ण प्रवृत्ती आणि सत्त्वाचे संवर्धन केल्यानेच काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, आलस्य, िंहसा आणि स्तेय (चोरी) या दश अवगुणांपासून हरणारा दसरा दृष्टिपथात येतो. ‘दसरा’ हा प्रारंभी एक कृषिविषयक लोकोत्सव होता. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्या वेळी शेतकरी हा उत्सव साजरा करत. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात व दसर्‍याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात. कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. ही प्रथादेखील या सणाचे कृषिविषयक स्वरूपच व्यक्त करते.
 
 
श्रीरामाचे पूर्वज रघु या अयोध्याधीशाने विश्वजीत यज्ञ केला. सर्व संपत्तीचे दान केले. नंतर तो एका पर्णकुटीत राहिला. कौत्स तिथे आला. त्याला 14 कोटी सुवर्णमुद्रा हव्या होत्या. रघु कुबेरावर आक्रमणाला सिद्ध होतो. कुबेर आपटा व शमी वृक्षांवर सुवर्णाचा वर्षाव करतो. कौत्स त्यातील फक्त 14 कोटी सुवर्णमुद्रा घेतो. बाकीचे सुवर्ण प्रजाजन नेतात. म्हणून दसर्‍याला शमी िंकवा आपट्याची पाने सोने म्हणून वाटतात. प्रतीकात्मक रूपात विस्तारलेल्या आपल्या संस्कृतीमधील प्रत्येक उत्सव म्हणजे जीवात्म्याला अनंतशक्तीच्या शाश्वत आणि सार्वभौम सत्तेशी अनुसंधान साधण्याचा मार्ग आहे. घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर जगतजननी आदिभवानीला समर्थ सद्गुरू दयाळनाथ महाराजांच्या शब्दांत आळवू या...
धाव पाव गुरुमाय माझे
त्वरे निवारिसी भवभय सहजे
देवनाथ प्रभू दीनदयाळा
तारी तारी बा परम कृपाळा
अन्यायी अन्यायी अबला
मम मती तुझिया द्वारी गर्जे
धाव पाव गुरुमाय माझे...
प्रा. भालचंद्र माधव हरदास
 
9657720242 
••