सुसंवादी अंतर्बंध...

    दिनांक :28-Sep-2019
मानवी नैतिक मूल्यांचा सार्वजनिक जीवनात होत असलेला र्‍हास आज आपण पावलोपावली अनुभवत आहोत. सचोटी, विश्वास या बाबी दुर्मिळ होत आहेत.
 
 
 
 
 
संपूर्ण जगाने प्रगतिशील मार्गक्रमणाचा ध्यास जरी घेतला आहे, तरी वैयक्तिक रीत्या प्रत्येक जण इतका आत्मकेंद्रित होत चालला आहे का, की घरच्या वरिष्ठांना एकाप्रकारची उपेक्षित वागणूक देताना त्या स्वाभाविकतेत त्यांना जरादेखील चुकीचे वाटत नाहीये? काही आईवडिलांनीदेखील स्वकेंद्रित होऊन, स्वतःसाठी वेळ देता यावा म्हणून आपल्याच अपत्याला व्हर्च्युअल वर्ल्डच्या खाईत लोटण्याचे प्रमाण वाढत आहे का? एका अर्थाने शाश्वत विकासाची वाटचाल करणारी आपली पावलं स्वार्थी होऊन नीतिमूल्यांना पायदळी तर तुडवत नाही ना? आपल्याला मूल्यशिक्षण खरंच प्राप्त झालं आहे का? झाले असल्यास मूल्यांना बळकटी कशी देता येईल आणि आपण पुढच्या पिढीत ते प्रवाहित करत आहोत का, याचा विचार करायला हवा.
 
 
 
 
नैतिक मूल्य, वस्तुनिष्ठता या वास्तविक पाहता तत्त्वज्ञानातील मध्यवर्ती, मात्र शब्दांमधून मांडण्यासाठी काहीशा कठीण अशा संकल्पना आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रातील प्राध्यापिका असल्याने तत्त्वज्ञानाशी निगडित असं अधिकाराचं भाष्य राहणार नाही, याची पूर्णतः जाणीव ठेवून भावनाप्रधान मनाच्या निरपेक्ष आणि निष्पक्ष जाणिवेच्या पातळीवर या लेखाद्वारे काही आवाहनं करण्याचा मानस आहे.
 
‘स्मार्ट पॅरेंिंटग’ या लेखास वाचकांच्या मिळालेल्या प्रचंड चार्चिक प्रतिसादानंतर मनाला या गोष्टीचं समाधान वाटलं, की या दर्जेदार वाचकवर्गाला लेखकाशी थेट संपर्क साधून अभिव्यक्त होता येत आहे. मात्र, सोबतच अंतर्मनात काही अस्वस्थ वादळं उठली.
 
आजवर हजारो विद्यार्थ्यांना ‘शिक्षक’ या नात्याने केवळ शिकवलंच नव्हे, तर घडवलं आहे. जगभरात अत्यंत उच्चपदावर कार्यरत असणार्‍या अनेकांनी आजवर संपर्क साधून कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांच्या वैयक्तिक समृद्धीविषयी सांगितलं आहे.
मात्र, नाण्याची दुसरी बाजू, ‘मी चाललो येथे सुटाबुटात अन्‌ तेथे आई माझी फाटक्या पातळात चालली’ अशा प्रकारचा एक वस्तुस्थितीशी जोडला जाणारा विषाद काहींच्या मनात जाणिवेच्या पातळीवर साकारावा, असं वाटून गेलं.
 
आजचं स्मार्ट, इंटेलिजंट आणि अॅप बेस्ड लाईफ ‘आजी-आजोबा’, ‘आई-वडील’ आणि ‘तिसरी पिढी’ यांच्यात कितपत एकी ठेवू शकत आहे?
 
आमच्या मुलांनी एक समृद्ध आयुष्य जगावं, ही तर आमची प्राथमिक पातळीवरची स्वप्नं! मात्र, आम्हाला केवळ त्यांची आर्थिक समृद्धी अपेक्षित आहे का? त्याने जीवनात सुखसुविधा प्राप्त होतील आणि यात मानसिक स्थैर्याचं काय? वैचारिक समृद्धीचं काय? आमच्या पिढीने आमच्या मुलांमध्ये सद्विचार बाणवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांनी त्या काळी निदान ऐकून घेतलं आहे, प्रत्युत्तरं न देता. मात्र, आज ते स्वतः आणि त्यांची मुलं उत्तम ‘पॅकेज’ मिळवण्यासाठी जिवाचं रान करत आहेत, ऑफिसचे ‘टार्गेटस्‌’ पूर्ण करत आहेत, कुटुंबीयांना किती वेळ द्यायला हवा, याचं ‘टार्गेट’ त्यांच्या टाईमटेबलमध्ये नसतं, याचं वाईट वाटतं.
 
आमची आता अशी अपेक्षा राहिली नाही, की आमच्या नातवांनी सकाळची सुरुवात करताना वा रात्री झोपताना आमच्या पाया पडावे, देवघरात बसून शुभंकरोती, रामरक्षा, अथर्वशीर्ष, आरत्या म्हणाव्या. आजच्या धावपळीच्या जीवनात ते शक्यदेखील नाही. म्हणून धार्मिक विधी संपन्न करण्याचा वा घरी आध्यात्मिक वातावरण असावे, यासाठी आमचा कुठलाही आग्रह नसतो. मात्र, त्यांच्या पुढील आयुष्यात त्यांच्या कामी येणारी ऑनेस्टी, इंटिग्रिटी, प्रॉमिस कीिंपग, ट्रस्टवर्दीनेस, लॉयल्टी, फेअरनेस, कन्सर्न अँड फॉर अदर्स, यासारखी बेसिक एथिकल प्रिन्सिपल्स त्यांच्यापर्यंत प्रवाहित व्हावीत, असं आम्हाला वाटतं. त्यांच्या अंतर्मनावर नैतिक मूल्यतत्त्वांचं संस्करण झालं, की आयुष्यभरासाठी ते नितळ, निर्मल, निष्पक्ष, न्यायप्रचुर बाबींना प्राधान्य देत राहतील आणि यातून कुणाचं वाईट न केलं जात असल्यामुळे मन शांत राहून त्यांना शांत झोप लागेल आणि आरोग्यही चांगले राहील, असा आम्ही विचार करतो.
 
मोबाईल गेिंमगमध्ये अतिव्यग्र झालेले आमचे नातू आमचं ऐकत नाही. चांगले विचार त्यांना ‘रबिश’ म्हणजे आपल्या भाषेत ‘अर्थहीन’ वाटतात. आजची मधली पिढी पुढच्या पिढीपर्यंत सद्विचार प्रवाहित करण्यास अक्षम बनत चालली आहे. त्यांच्या मुलांना आम्ही काही सांगायला गेलो, तर आम्ही तर विचारांनी बाळबोध राहिलो, आमच्या मुलांना तरी स्मार्ट आणि इंटेलिजंट होऊ द्या! त्यांना पावलोपावली या धावत्या युगात आवाहनांना तोंड द्यायचं आहे. असं सांगून आम्हालाच गप्प बसवतात. सोशल नेटवर्किंग साईटस्‌ आणि मोबाईल गेिंमगमध्ये अतिव्यग्र झालेल्या या पिढ्यांना दुष्टचक्रातून बाहेर आणायचं कुणी? कारण आम्ही त्यांच्या दृष्टीने ‘अनवॉन्टेड’, उपेक्षित आहोत, िंकबहुना घरात राहायचं असेल तर एखाद्या ‘निर्जीव’ वस्तूप्रमाणे आपल्या रूममध्ये पडून राहावं, ही त्यांची अपेक्षा असते. प्रातिनिधिक स्वरूपात एका ज्येष्ठ वाचकाने आपलं दुःख व्यक्त केलं.
ज्या पालकांनी आपल्या मुलांना, त्यांच्या पंखांना बळकटी देऊन बाहेरच्या देशात उच्च शिक्षणासाठी पाठवलं, ते आज भारतात एकाकी अवस्थेत भकास जीवन जगत आहेत. मुलांना भारतात वापस यायचे नाहीये. ही मुलं इतकं अतोनात कमवत आहेत, की पैसा फेकून सर्व सुख-सुविधा त्यांना उपलब्ध करून घेता येतात, ही त्यांची धारणा त्यांना नातीगोती विसरायला भाग पाडत आहे. बाकी नातेवाईक तर सोडूनच द्या, अनेक सॅक्रिफायसेस करून, प्रसंगी पोटाला चिमटा लावून याच मुलांना कधीच कुठल्या गोष्टीत कमी ना पडू देणारे त्यांचे आईवडील आज त्यांना नकोसे, निरुपयोगी आणि आऊटडेटेड वाटत आहेत. आम्हाला आजच्या टेक्नॉलॉजी, अद्ययावत उपकरणाचा उपयोग, वापरण्याच्या पद्धती समजत नाही, म्हणून आम्ही फॉरेनमध्ये त्यांच्या घरी गेल्यावर आम्हाला पदोपदी अपमानित व्हावं लागतं. अशा परिस्थितीत आम्ही जायचं कुठे? या वयात साध्या माणुसकीच्या वागणुकीची अपेक्षा आम्ही आमच्याच अपत्याकडून करू शकत नाही का? असं व्यक्त होताना एका ज्येष्ठ वाचकाचा कंठ भरून आला.
 
परिवारसंस्थेतील घटकांचा परस्परांशी संवाद, सोबतच वैश्विक वातावरणात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान आत्मसात करून आपला मूळ भारतीय विचार अधिक वर्धिष्णू करणे, यावर एखादा अभ्यासपूर्ण लेख येऊ द्या, अशीदेखील एका विद्वान आणि जाणकार वाचकाने सूचना केली.
 
आजच्या पिढीकडून त्यांच्या व्यग्र जीवनशैलीने त्यांचे छंद जणू हिरावून घेतले आहेत. कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या ऑब्जेक्टिव्ह स्टाईलच्या रिव्हायरमेंटमुळे सब्जेक्टिव्ह स्टडीज ते विसरत चालले आहेत. वैविध्यपूर्ण साहित्यवाचन आणि लेखन, कला, नाट्य त्यांच्या आयुष्यातून बाद होत चाललेले आहे. मराठी भाषेपासून दूर होत आहेत, याबद्दल वाईट वाटतं, त्याहीपेक्षा त्यांचं पुढील आयुष्य अभिरुचिहीन, निरस होतंय, याविषयी नैराश्य मनात थैमान घालतं. वाटतं, कुठल्याही गोष्टीची आवड नाही, की कुठले छंद नाही असं आयुष्य कसं जगणार हे लोक? कौटुंबिक पातळीवर अभिरुचिसंपन्नता भिनवण्यासाठी नेमके काय करायला हवे? असा प्रश्नदेखील विचारण्यात आला.
 
बहुतांशी परिवारात सुसंवाद आणि त्यामार्फत वैचारिक देवाणघेवाण या गोष्टी दुर्मिळ झाल्या आहेत. फार पूर्वी रात्रीचं जेवण सोबत घेतलं जायचं आणि त्यादरम्यान महत्त्वपूर्ण विषय चर्चिले जायचे, दिवसभरातील घटनांचा आढावा घेतला जायचा. वैद्वत्तिक पातळीवर काही निर्णय घेतले जायचे. समस्यांवर विचारविनिमय होऊन निरसन आणि निराकरण व्हायचं. त्यानंतर घरोघरी टीव्हीची स्थापना झाली, ज्यावर केवळ ‘नॅशनल’ चॅनेल लागायचं. जेव्हा चॅनेलची संख्या वाढू लागली, तेव्हा स्वतःच्या चॉईसनुसार टीव्हीवर कार्यक्रम बघण्यासाठी घरातील वाद वाढू लागले. विसंवाद विकोपाला जाऊ नये, यासाठी घरोघरी वैयक्तिक पातळीवर टीव्ही खरेदी केले जाऊन प्रत्येकाच्या रूममध्ये तो बघण्याची सोय करून देण्यात आली. घरातील सामूहिकतेवर आणि सुसंवादावर घाव घालण्याची प्रक्रिया तेव्हा सुरू झाली असली, तरी त्याचा थेट परिणाम ज्येष्ठांवर झाला. आपल्या ‘उच्च शिक्षित’ मुलांच्या ‘हायफाय’ कल्चरशी ऍकवेन्ट न होता आल्याने आणि तसेही तिथे ‘अनफिट’ असल्याचा न्यूनगंड मनात बाळगून, दिवाणखान्यापासून दूर, आतल्या खोलीत, एकाप्रकारे ‘अडगळीत’ पडण्याची प्रक्रिया कुठेतरी सुरू होतीच आणि टेक्नॉलॉजिकल अॅडव्हान्समेंटने त्यांच्या दुर्लक्षित एकाकीपणावरदेखील घणाघात करायला सुरुवात केली. 2006- 07 मध्ये रंगमंचावर अत्यंत यशस्वी रीत्या हाऊसफुल प्रयोगमालिका झालेल्या ‘घरोघरी एकतेचे बळी’ या नाटकाचा उल्लेख एका वाचक पालकाने केला. या दोन अंकी विनोदी नाटकात एकता कपूरचा निसटता उल्लेख झाला असला, तरीदेखील घरातील ‘टीव्ही’ हाच खलनायक घरातील एकतेचा बळी घेत असतो, हे संहितेतून मांडण्याचा माझा प्रयत्न होता. आज कौटुंबिक संवाद हरवण्यास मोबाईल, कॉम्पुटर हेदेखील कारणीभूत ठरत असल्याने घराघरातील व्यक्तींमधील एकोपा दिवसेंदिवस हरवत चालला आहे.
 
टीव्ही, कॉम्प्युटर आणि त्यानंतर आलेला ‘मोबाईल फोन’ या सर्व अत्याधुनिक निर्जीव साधनांनी घरातील ‘सजीव’ वातावरणावर अनेक आघात केले आहेत. दृष्टिपथातील ‘जिवंत’ व्यक्तीच्या डोळ्यातील संवादाचे औत्सुक्य दुर्लक्षित करून कानाशी मोबाईल लावून दूरच्या व्यक्तीशी बोलणार्‍यांची संख्या आजही नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त असेल. आता आजच्या काळात मल्टिमीडिया सर्व्हिसेस आणि हाय स्पीड इंटरनेट अॅक्सेस यासोबतच आपणा सर्वांचं लाईफ ’अॅप बेस्ड इझ’ झालं आहे. लेटेस्ट कॉन्फिगरेशनचा मोबाईल जागेपणापासून झोपेपर्यंत हातात िंकबहुना झोपेतही ‘हाताशी’ ठेवून राहणार्‍या आजच्या तरुण पिढ्या ‘जनरेशन’ हा शब्द उच्चारताक्षणी मोबाईलच्या वा वायरलेस कम्युनिकेशन्सच्या डिव्हायसेसच्या जनरेशनचा विचार करतात. मात्र, आपले ‘आई-वडील’, ‘आजी-आजोबा’ या जनरेशन्सचा विचार कोण करणार?
 
आजच्या फास्ट लाईफशी स्वतःला ‘कॉम्पॅटिबल’ बनवणार्‍या सर्वांना आणि विशेषतः तरुण पिढीला एक आवाहनकरावंसं वाटतं, की ही ‘प्रिशियस’ नाती जपण्यासाठी वेळ द्या. काही वेळासाठी मोबाईल दूर ठेवून घरातील सर्वांशी संवाद साधा. हा संवाद मनापासून आणि निखळ जिव्हाळ्याने व्हायला हवा. त्यात कुठलाही यांत्रिकतेचा, औपचारिकतेचा अंश नको. आई-वडिलांपासून लपवून ठेवावी, अशी एकही बाब नसावी. प्रत्येक मुलगा यशाच्या पाऊलवाटेवरच चालावा, असं आईवडिलांनीदेखील गृहीत धरू नये. मात्र, मुलांच्या अपयशाने समाजाच्या भीतीने त्याला दूर लोटण्याऐवजी त्याचा मानसिक हक्काचा आधार बनून त्याला नैराश्यगर्तेतून बाहेर आणावे.
 
‘मानवी अंतर्बंध’ या विषयावर थोडा सखोल विचार केला असता, विघटन कुठेतरी कौटुंबिक स्तरावरच होत असल्याचं जाणवलं. या अंतर्बंधांसाठी आधारभूत घटक, विविध परिमाणे, नैतिकतेचा मानवी वर्तनावर होणारा परिणाम हे सर्व मनःपटलावर ठळकपणे साकारलं आणि या लेखमालेतील पुढील पाऊल सर्वांनी केवळ क्षणभर अंतर्मुख व्हावं, यासाठी उचललं.
लेखमालेच्या पुढील ओघात आणखी संदर्भ गुंफण्याचा प्रयत्न राहील.
 
• डॉ. शुभांगी रथकंठीवार
9764996797 
(स्तंभलेखिका ‘इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग’च्या प्राध्यापिका आणि प्रथितयश साहित्यिक आहेत.)
••