म. गांधीजींच्या विचारांची प्रासंगिकता...

    दिनांक :28-Sep-2019
वर्तमान जगाचे यथार्थ वर्णन, विख्यात अर्थतज्ज्ञ, पर्यावरण विशेषज्ञ बारबरा वॉर्ड हिने ‘प्रोग्रेेस फॉर ए स्मॉल प्लॅनेट’ या ग्रंथात संक्षेपाने पुढीलप्रमाणे केलेले आहे. ती म्हणते, ‘‘आज विकासाच्या प्रचलित वाटांनी पुढे चालताना आपला भ्रमनिरास होऊ लागतो. आपली भ्रमित, भांबावलेली स्थिती निर्माण होते. कारण आधुनिक पद्धतीचा औद्योगिक विकास जर असाच पुढेही सुरू राहिला, तर आपल्याला एका हाताने नव्या मोटारगाड्या आणि न्याहरीचे नवे जिन्नस मिळत असतानाच, दुसर्‍या हाताने घशाच्या वा यकृताच्या कॅन्सरचीही देणगी मिळेल! औद्योगिक विकास होईल तो पर्यावरणातील ओझोन विरळ करूनच. तंत्रज्ञान पसरेल त्याच वेळी उंच पर्वतमाथ्यांवरील बर्फाचे आवरण वितळेल. आज अख्ख्या इतिहासात पूर्वी कधीही निर्माण झाले नव्हते असे विक्राळ पर्यावरणीय संकट मानवजातीसमोर उभे झाले आहे!’’
 
 
 
आज जगाला ढोबळमानाने तीन समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ‘पर्यावरणीय समस्या’, शोषण व्यवस्थेतून आलेली भयावह ‘विषमता’ आणि मुस्लिम मूलतत्त्ववादी ‘आतंकवादाचे’ िंहसेचे तांडव! ही तीन ढोबळमानाने प्रमुख आव्हाने जगाला भेडसावत आहेत. ही आव्हाने- मानवजातीसमोरील संकटे मुख्यत: एका सदोष अशा जीवनदृष्टीतून निर्माण झालेली आहेत. कोणत्याही तात्कालिक मलमपट्टीच्या पद्धतींनी वा उपायांनी या संकटाचे निवारण होणे अशक्य आहे. त्या संकटाच्या निवारणासाठी जग, जीवन याकडे बघण्याची नवी जीवनदृष्टी व मूल्यव्यवस्थेचा अगदी मुळातून पुनर्विचार होणे, ही काळाची गरज आहे. यांत अर्थरचना, तंत्ररचना आणि विशेषकरून पृथ्वीकडे, अथवा सृष्टीकडे बघण्याची आपली दृष्टी व मनोकृती यांत आमूलाग्र असे परिवर्तन घडवावे लागेल. अन्यथा, जग, विशेषत: पाश्चात्त्य देश, ज्या वाटेने पुढे जात आहेत ते अंतिमत: मानवीजगताला विनाशाकडे नेणारे मार्ग आहेत. हे द्रष्टेपणाचे मूलगामी िंचतनाचे विचार आहेत महात्मा गांधींचे!
 
 
जगाच्या समस्यांचे पूर्वानुमान गांधींनी 1908 मध्येच केले. ‘िंहद स्वराज’ या पुस्तकात त्यांनी पाश्चात्त्य सभ्यतेवर खूप घणाघाती टीका केली आहे. हा काळ म्हणजे साधारणत: अत्याधुनिक कालखंडाचा, ‘आधुनिक सभ्यतेचा’ प्रारंभकाळ म्हणता येईल. विवेकवाद, विज्ञानवाद, देकार्तप्रणीत ज्ञानमीमांसा, या वैचारिक आंदोलनाने त्या वेळी जग झपाटले होते. अशा वेळी त्या काळात गांधींनी आधुनिक आणि आधुनिकेतर काळात निर्माण होणार्‍या विक्राळ समस्यांचे पूर्वानुमान केले, नव्हे, त्या समस्यांच्या निराकरणासाठी, िंहदुस्थानचा इतिहास, तत्त्वज्ञानपरंपरा यांनी दिलेल्या जीवनसमग्रतेचा ‘एकसंध विचार’ गांधींनी जगाला दिला. हा विचार जग, जीवन आणि सृष्टी यांचे ऐक्य, एकसंधता साधणारा विचार आहे. तो अन्य जगापेक्षा फार भिन्न आहे. पण शाश्वताचा, चिरंतनाचा मागोवा घेणारा आहे, हे विशेष!
 
महत्त्वाचे असे- गांधीजींच्या या विचारांत एका संास्कृतिक क्रांतीची नांदी निनादत होती. नव्या मन्वंतराची उभारी दिसून येत होती. इथेच गांधींच्या विचारांचे क्रांतिदर्शित्व मान्य करावे लागेल.
 
कारण, ज्या वेळी पाश्चात्त्य जगात तिथले तरुण, तिथल्या वैज्ञानिक-तांत्रिक प्रगतीने, तिथल्या जीवनशैलीने भारावून जात, विकासाचं, प्रगतीचं नवं गारुड त्यांच्या मनावर उभं होत होतं, यंत्रबळाची मायावी मोहिनी त्यांच्यावर पडत होती, त्या वेळी इंग्लंडमध्ये असलेले ‘गांधी’, तंत्रवैज्ञानिक प्रगतीच्या भविष्याचा आलेख मानवजातीला विनाशाच्या दिशेने घेऊन जाणारा आहे, हे सगळं जगाला उघड करून दाखवीत होते. गांधीजींनी हे सगळं वेळीच ओळखलं आणि या पाश्चात्त्य सभ्यतेला म्हणजेच आधुनिक सभ्यतेला त्यांनी अवांछनीय ठरवलं! कारण ही ‘आधुनिक सभ्यता’ कुधारणांवर आधारित आहे, ती शोषणकारी आहे आणि अनैतिकता, अनिती दृढ करणारी आहे, हे आधोरेखित करून गांधीजी एक वैचारिक लढाई लढत होते.
 
इथेच गांधींचे दूरदर्शित्व दिसून येते. गांधींनी, इंग्रजांचे आक्रमण एक बौद्धिक आक्रमण आहे, हे ओळखले होते. या बौद्धिक, वैचारिक आक्रमणाचा शिकार ‘भारत’ होऊ नये, ही त्यांची प्रामाणिक कळकळ होती. गांधींनी भारताचा स्वातंत्र्य लढा संघटित करतानाच एक वैचारिक चेतना जागृत केली. ‘स्वराज्य’ या संकल्पनेत बहुआयामी धारणा ‘स्वराज्य-प्लस’ या भावनेची- संकल्पनेची होती. ‘स्वराज्य-प्लस’ म्हणजे केवळ ‘स्व’चे राज्य. ‘स्व’ म्हणजे आमची संस्कृती, आमची अस्मिता! केवळ इंग्रज निघून गेले आणि भारतीय लोक त्यांच्याच पद्धतीने राज्य करू लागले. म्हणजे ‘स्वराज्य’ आलं िंकवा आपण ‘स्व-तंत्र’ झालो, असं गांधींनी कधीच मानलं नाही. त्यांना अभिप्रेत असलेल्या ‘स्वराज्य’ संकल्पनेचे स्वरूप अधिक व्यापक होते, ते त्यांनी ‘िंहद स्वराज्यातून’ दिले आहे. ते म्हणत- ‘तसे स्वराज्य’ मिळविण्याकरिता माझे जीवन समर्पित आहे!
 
‘तसे स्वराज्य’ याचा अर्थ स्वराज्याहून अधिक काहीतरी गांधींना अभिप्रेत आहे. हे ‘अधिक काहीतरी’ म्हणजेच जीवनसमग्रतेचा विचार करणारा गांधींचा विचार आहे. स्वराज्याचे स्वरूप गांधी खालीलप्रमाणे व्यक्त करतात :
 
1) स्वराज्य म्हणजे स्वत:वरचे राज्य 2) त्याची किल्ली सत्याग्रह, आत्मबळ िंकवा दयाबल 3) ते वापरण्यासाठी समग्र अर्थाने स्वदेशीचे ‘व्रत’ म्हणून पालन 4) आपण जे करू इच्छितो, ते इंग्रजांच्या द्वेषाने नव्हे, तर ते करणे आपले ‘कर्तव्य’ आहे म्हणून!
 
छोटेखानी दिसणारे वरील विधान कमालीचे अर्थगर्भ आणि संकेतगर्भ आहे. गुलामीचा विचार आपण केवळ कुणाचेतरी नियंत्रण, असा बहिर्मुखी करत आलो. पण, या बहिर्मुखी नियंत्रणाच्या उच्चाटनासोबत आम्ही अंतर्मुख होऊन, स्वराज्य, स्व-तंत्रता यांचा विचार करणार की नाही? पारतंत्र्याचे मूळ स्वरूप गांधी मानसिक आध्यात्मिकतेत मानत. गुलामी म्हणजे जाणिवांची परभृतता. आत्मविस्मृतता. हे मूलगामी आकलन गांधीविचारातून स्पष्ट होते. मानवाची मुक्ती, जीवनश्रेयासाठी धारणा, जीवनदृष्टी, जीवनशैली या सर्व जीवनांगांचा विचार गांधींच्या विचारधारणेत होता!
 
एक महत्त्वाची बाब या ठिकाणी अधोरेखित होते ती अशी की, गांधींना राजकीय, सामाजिक, आर्थिक युद्धातल्या जय-पराजयापेक्षा मानवाचे अंतिम हित त्यांना महत्त्वाचे वाटत होते. म्हणूनच पाश्चात्त्य सभ्यतेतील मानवाचे अंतिम अध:पतन त्यांनी अनुमानलं, अनिती अनुभवली आणि या आधुनिक सभ्यतेला अवांछनीय ठरवले.
 
इथे ‘सभ्यता’ म्हणजे केवळ ‘सिव्हिलायझेशन’ या अर्थाने नव्हे, तर ‘संस्कृती’ (कल्चर) या अर्थाने अभिप्रेत आहे. आपण आतून जर सत्यप्रिय, सदाचरणी, न्यायी, धर्मनिष्ठ, परहितदक्ष, पापभिरू असू, तरच सुसंस्कृत आहोत. याचा अर्थ, एखादा माणूस वा समाज ‘सभ्य’ असेल, पण तो सुसंस्कृत असेलच असे नाही. भौतिक समृद्धी आहे असा माणूस वा समाज दुराचरणी, अधर्मी, परशोषक, अन्यायी इत्यादी असू शकतो.
 
पाश्चात्त्य सभ्यतेत गांधींना नेमका हाच भेद दाखवून द्यायचा आहे. पाश्चात्त्य सभ्यतेची वाढ ही सुसंस्कृततेची वाढ आहेच असे नाही; िंकंबहुना त्यातून अनेकदा सांस्कृतिक अध:पतनच झालेलं आहे, हे विशेष!
 
इथे गांधी, माणसाच्या जगण्याचा हेतू कोणता असावा, हा कळीचा मुद्दा उचलून धरतात. कारण ‘जीवनहेतूचा’ ‘विकासाच्या’ ‘प्रतिमानाशी’ अतूट संबंध आहे. पाश्चात्त्य जगत ‘उपभोग’, ‘सुख’ शारीरिक पातळीवर, मानसिक पातळीवर मुख्य जीवन हेतू मानत आलेय्‌. गांधींचा विरोध या मुख्य हेतूलाच आहे. ‘उपभोग’ हा पशूंचा जीवनहेतू राहू शकतो, मानवाचा नाही. माणसाचा जीवन उद्देश नैतिक, आध्यात्मिक परिपूर्णता गाठणे आहे!
 
पाश्चात्त्यांनी ‘उपभोगाच्या उच्चतमीकरणाच्या’ प्रारूपाला स्वीकारणे, गांधीजी ही संकल्पनाच धिक्कारतात. अर्थशास्त्रीय, सामाजिक, तांत्रिक अशा सर्व रचना ते धिक्कारतात. तेही तार्किक आधारावर!
 
उपभोगवादाच्या आणि त्यातून निर्माण होणार्‍या चंगळवादाच्या मुळाशी आजचे आंत्यतिक औद्योगिकीकरण आहे. अमर्याद उत्पादन, अनिर्बंध उपभोग आणि म्हणून बेलगाम औद्योगिकीकरण हे आजच्या प्रचलित अर्थशास्त्राचे व विकासाचे तर्कशास्त्र आहे. आज अमर्याद उत्पादनामुळे व अनिर्बंध उपभोगामुळे नैसर्गिक संपत्तीचे साठे संपुष्टात येत आहेत. हा इशारा फ्रान्समधील विचारवंतांनी ‘लिमिटस्‌ टू ग्रोथ’ या जगप्रसिद्ध अहवालाच्या माध्यमातून 1980च्या दशकात दिला होता. अत्याधिक उत्पादनातून, आक्रोशकारी दुकानदारी करून अवाढव्य नफेखोरी करणे, ही एक सभ्य व्यवस्थाच यातून निर्माण झाली. धनदांडगेशाही, संचय, संपत्तिसंग्रह, संपत्तीतून सत्ता, ताबा, प्रभुत्व आणि यासाठी ‘िंहसा’, ‘भ्रष्टाचार’ हे अपरिहार्यपणे जीवनशैलीचे अविभाज्य अंग बनले. दुसरे असे की, या उत्पादन तंत्राचे, पद्धतीचे घटक, बेकारी, विषमता, शोषण त्यातून गरिबी हे सगळे अविभाज्य अंग या विकासप्रक्रियेतून निर्माण झालेत. या बेकारी, विषमता समस्यांकडे बघताना आम्ही आधुनिकतेचा, विकासाचा, सभ्यतेचा बुरखा घालून, तसेच थातुरमातुर उत्तरे देत, या समस्यांकडे दुर्लक्ष करीत राहिलो! परिणामी, आज एका बाजूला ‘समृद्धीची बेटे’ तर दुसर्‍या बाजूला ‘विषमतेची वाळवंटे’ तयार झालीत. या विकास, निर्मितिप्रक्रियेचे हे दोष एक स्वाभाविक अंग बनलेले आहेत, हे विसरता येत नाही.
 
गांधींचा विरोध या प्रचलित अर्थरचनेच्या बुडाशी असलेल्या दोषपूर्ण प्रक्रियेसाठी, त्यातील मूल्यव्यवस्थेसाठी आणि संपत्तिप्रधान, संग्रहप्रधान जीवनदृष्टीशी आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे.
 
औद्योगिक क्रांतीच्या नावे, नैसर्गिक साधनांचा झपाट्याने झालेला र्‍हास, हवा, पाणी याचे वाढते प्रदूषण, जंगलकटाई, घातक वायूचे वाढते प्रमाण (कार्बन मोनोऑक्साईड) ग्रीन हाऊस इफेक्ट, अॅसिडचा पाऊस, मानवी आरोग्य, जीविताला हानिकारक असलेल्या गोष्टींचा अनुभव आज जगभर येऊ लागला आहे.
 
‘पर्यावरण’ जागतिक समस्या का झाली? त्यामागे कोणती अर्थरचना, जीवनदृष्टी कारणीभूत आहे, हे ‘िंहद स्वराज्य’मधे गांधीजी शंभर वर्षांपूर्वीच अधोरेखित करतात. गांधी विचारांची ही प्रासंगिकता आज कुणीही नाकारू शकत नाही. ही वैचारिक प्रासंगिकता आज अनन्यसाधारण महत्त्वाची आहे.
 
गांधींनी या अर्थरचनेच्या गाभ्याशी असलेली जीवनदृष्टी, जीवनशैली अधोरेखित केली. या अर्थरचनेतून संपत्तिसंग्रह, सत्ता, प्रभुत्व नि िंहसा, हा जो विचारव्यूह तयार होतो त्यावरून माणूस, समाज, देश यांची श्रेष्ठता मापदंड म्हणून मोजली जाते, तिने आज जीवनाची सर्व क्षेत्रं व्यापून टाकली आहेत. स्वार्थाची साधना हीच सामाजिक प्रतिष्ठेची आणि लौकिक यशाची गुरुकिल्ली मानण्यात येऊ लागली. यामुळे एक वेगळीच सार्वजनिक नीतिशास्त्राची उभारणी झाली ती म्हणजे ‘खोटी सभ्यता!’ गांधीजींचा प्रखर विरोध या अर्थरचनेला होता, खोट्या सभ्यतेला होता. म्हणूनच त्यांनी ‘िंहद स्वराज्य’मध्ये याला ‘सैतानी सभ्यता’ म्हटले.
 
आज ही ‘सैतानी सभ्यता’च आंतरराष्ट्रीय राजकारणात, वसाहतवाद, साम्राज्यवाद नि आतंकवाद यांना जन्म देती झाली आहे. गांधींनी भांडवलशाहीची ही समीक्षा तर्काधिष्ठित करत इंग्रज, युरोपीय राष्ट्रे यांच्या वसाहतवादाला, साम्राज्यवादाला जळजळीत विरोध केला. त्यासाठी स्वदेशीचा मूलमंत्र दिला नि सत्याग्रहाचे एक उपकरण जनतेला दिले.
 
गांधींचे एक महत्त्वाचे एकादशव्रतातील ‘व्रत’ म्हणजे ‘सर्वधर्मसमभाव.’ गांधींच्या मते, धर्म एकप्रकारे ईश्वराचे नि:श्वसित रूप आहे. पण, ईश्वरदत्त धर्माचा जो आविष्कार झाला तो प्रेषितांमुळे! हे प्रेषित महान व श्रेष्ठ असले तरी ‘मानव’ होते. त्यामुळे त्यात त्यांना मर्यादा, अपूर्णत्व हे येणारच. यामुळे धर्मसुधारणाही येणारच. केवळ ती अस्सल आणि प्रामाणिक धर्मनिष्ठेशी अभिन्न असावी. यामुळे धार्मिक कट्‌टरतेला आक्रमक, आक्रोशी, िंहसक प्रचाराला त्यांचा प्रखर विरोध होता. धर्माबाबत गांधींची भूमिका ही सकारात्मक आणि सर्जनशील दिसून येते. धर्मांतर, पृथकतावादी, हटवादी प्रकृतींना त्यांचा विरोध होता.
 
धर्माच्या संदर्भात िंहदू धर्माची त्यागावर, कर्तव्यावर आधारित जीवनशैली या देशात कशी उत्क्रांत झाली, त्यातून िंहदुस्तानच्या सभ्यतेचा जीवनादेश कसा आदर्श आहे, हे गांधीजी अभिमानपूर्वक सांगत. उपनिषदांचा सार्थ अभिमान त्यांना होता. ‘ईशावास्य’ उपनिषदातील पहिला श्लोक त्यांचा आवडता होता. त्यातील ‘तेन व्यक्तेन भुज्जीथा:’ हे चरण अत्यंत महत्त्वाचे वाटे!
 
त्यागावर, विश्वस्त वृत्तीवर आधारित समाजरचना असावी, अशी त्यांची उदात्त ‘विश्वस्ता’ची संकल्पना होती. गांधीजींच्या या ‘ईशावास्य’ वृत्तीचे दर्शन त्यांच्या एकूण जीवनदर्शनात प्रतििंबबित झालेले आहे. म्हणूनच रा. स्व. संघाच्या प्रात:स्मरणात ‘महात्मा गांधी रेवच्‌’ असे स्मरण करून त्यांचे प्रात:स्मरण केले जाते. महात्मा गांधी आणि संघ हे दोन शब्द उच्चारल्याबरोबर अनेक विचारवंतांना ते परस्परविरोधी का वाटावे? याचे एकच कारण व्यक्तिश: मला वाटते ते असे की, त्यांना ‘संघही’ मुळातून कळत नसतो आणि ‘गांधीही!’
 
असो. आज वर्तमानातील समस्या, त्यांचा उद्भव कसा होत गेला, याचे उत्तम मार्गदर्शन गांधींच्या मूलगामी विचारातून होते. म्हणूनच आज दीडशे वर्षांनंतरही त्यातील प्रासंगिकता अधोरेखित करावीशी वाटते. 150 व्या गांधी जयंतिनिमित्ताने गांधीजींना शतशत अभिवादन!
 
डॉ. कुमार शास्त्री 
9423613710