चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या

    दिनांक :29-Sep-2019
मंगरुळनाथ, 
चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यावर कुर्‍हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील चोरद येथे 29 च्या रात्री एक वाजता दरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमर उर्फ सोनू विठ्ठल झाटे  यांनी तक्रार दिली की, फिर्यादीचे वडील विठ्ठल किसन झाटे याने रात्री सव्वा वाजता दरम्यान आई शोभा विठ्ठल झाटे हिची चारित्र्याच्या संशयावरून डोक्यावर व मानेवर लोखंडी कुर्‍हाडीने वार करून हत्या केली. तसेच फिर्यादीच्या दोन्ही खांद्यावर जीवे मारण्याचे उद्देशाने वार केले. अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विठ्ठल किसन झाटे याचे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे, ठाणेदार विनोद दिघोरे, एपीआय अतुल तांबे, पीएसआय मंजुषा मोरे, अंबादास राठोड, संदीप खडसे, सुनील गंडाईत, उमेश ठाकरे, रवी वानखडे, किशोर काकडे, गजानन मुखाडे, गोपाल कवर, मिलिंद भगत, सचिन शिंदे यांनी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली. तसेच आरोपीस अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय मंजुषा मोरे करत  आहे.
 

 
 
आरोपीस पोलिसांनी शिताफीने केली अटक
पत्नीची हत्या केल्यानंतर या प्रकरणातील आरोपी विठ्ठल झाटे याने त्याच्या मुलांवरसुद्धा कुर्‍हाडीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या मुलामुलींनी आरडाओरड केल्याने कुर्‍हाड घटनास्थळावर टाकून तो पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी चार पथके तयार केली. तसेच गावाला वेढा दिला. या कामी तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील यांनीही मदत घेण्यात आली. शेवटी येडशी धरण येथील जंगलातून आरोपीस चार ते पाच तासानंतर पकडण्यात आले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीस तात्काळ अटक केल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.