आमदार चरण वाघमारे यांना अटक, ऐन निवडणुकीच्या तोंडावर वातावरण चिघळले

    दिनांक :29-Sep-2019
भंडारा, 
तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांना काल २८ रोजी तुमसर पोलिसांनी विनयभंगाच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. आमदार चरण वाघमारे यांच्या अटकेनंतर जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले असून वाघमारे समर्थकांनी भंडारा पोलीस ठाण्यासमोर चांगलीच निदर्शने केली. आपण गुन्हा केला नसल्याने जामीन घेणार नाही अशी भूमिका आमदारांनी घेतल्याने परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान आमदारांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर तुमसर मोहाडी येथील काही आमदार समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.
१७ सप्टेंबर रोजी तुमसर पोलिस ठाण्यात आमदार चरण वाघमारे व भाजपाचे तुमसर शहर अध्यक्ष अनिल जिभकाटे यांच्या विरोधात एका महिला पोलीस उपनिरीक्षकाने दाखल केलेल्या तक्रारीवरून विनयभंग व शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर स्वतः आमदार वाघमारे यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रारकर्त्या महिलेला न्याय देण्यासाठी ताबडतोब चौकशी करून अटक करा अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासासाठी पाच दिवसाचा अवधी मागून घेतला होता.
 

 
 
दरम्यान २८ रोजी आमदार चरण वाघमारे यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बयान नोंदविण्याचे कारण सांगून बोलविण्यात आले व याच ठिकाणी त्यांना अटक करण्यात आली. अटक करून भंडारा पोलीस ठाण्यात आणण्यात आल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले होते. आमदार वाघमारे यांच्या अटकेची वार्ता तुमसर विधानसभा मतदारसंघात मतदारसंघासह जिल्ह्यातील अन्य ठिकाणाहून असंख्य भाजपा कार्यकर्ते व आमदार समर्थक भंडारा पोलीस ठाण्याकडे एकत्रित झाले. या ठिकाणी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली पोलिसांकडून कलम १४४ लागू करीत जमावबंदीचा आदेश काढण्यात आला होता. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास आमदार वाघमारे यांना भंडारा पोलिस ठाण्यातून तुमसर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. यावेळी आमदार समर्थकांनी पोलिसांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न केला. गुन्हा केला नसल्याने जामीन न घेण्याच्या भूमिकेवर आमदार वाघमारे ठाम असून जामीन न घेतल्यास आमदारांना तुरुंगात जावे लागेल हे स्पष्ट आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. आमदारांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर तुमसर येथील भाजप कार्यकर्ते आणि काही समर्थकांना पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
 
आमदाराच्या समर्थनार्थ भंडाऱ्याकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांची वाहने सुद्धा पोलिसांकडून देण्यात आल्याचे समजते. आमदारांना अटक झाल्याचे कळताच खासदार सुनील मेंढे, भाजपाचे जिल्हा महामंत्री मुकेश थानथराटे, म्हाडाचे सभापती तारीक कुरेशी, प्रकाश मालगावे यांच्यासह अनेक भाजपाचे नेते पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या विरोधात षडयंत्र असून अशा पद्धतीने अटक करण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप असून काहीही झाले तरी चरण वाघमारे यांनी ही निवडणूक लढवावी अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता तुमसर विधानसभेचा विषय चांगलाच चर्चेत येणार असे दिसत आहे. आमदार तुरुंगातून निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याचे समजते. 
 
उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याची पत्रकारांशी अरेरावी
आमदार वाघमारे यांच्या अटकेनंतर वृत्त संकलनासाठी भंडारा पोलीस ठाण्याच्या आवारात गेलेल्या वृत्तपत्रांच्या आणि लेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधीशी भंडाऱ्याच्या उपविभागीय पोलिस अधिकारी जनबंधू यांनी अरेरावी केली. माहिती घेण्यासाठी कुणालाही आत जाऊ न देता सामान्य लोकांप्रमाणे हाकलून देण्यात आले.