अंबा व एकविरा देवी नवरात्रोत्सवाला प्रारंभ

    दिनांक :29-Sep-2019
श्री दुर्गेचे भक्तीमय वातावरणात आगमन
 
अमरावती, 
विदर्भाची कुलस्वामिनी श्री अंबा व एकवीरा देवी आणि श्री दुर्गेच्या नवरात्रोत्सवाला जिल्ह्यात रविवार, 29 सप्टेंबरपासून भक्तीमय व उत्साहाच्या वातावरणात प्रारंभ झाला. सार्वजनिक मंडळांनी लक्षवेधी शोभयात्रा काढून श्री दुर्गेची विधिवत स्थापना केली. पहिल्याच दिवशी सर्वत्र उत्साह व चैतन्यमय वातावरण पाहायला मिळाले. पुढील 9 दिवस श्री अंबेचा जागर जिल्ह्यात होणार आहे.
 

 
 
संपूर्ण विदर्भवासीयांचे आराध्य दैवत असलेल्या अमरावतीच्या श्री अंबादेवी व श्री एकवीरादेवी मंदिरात नवरात्र उत्सवाला थाटात प्रारंभ झाला. श्री अंबादेवी मंदिर संस्थानात सकाळी 5 वाजता संस्थेचे कोषाध्यक्ष रवींद्र कर्वे यांनी सहपत्नीक घटस्थापना केली. त्यानंतर ध्वजपूजन करण्यात आले. श्री एकवीरा देवी मंदिर संस्थान येथे सकाळी 8.30 वाजता अ‍ॅड. रवींद्र मराठे यांनी सहपत्नीक घटस्थापना केली. नवरात्र उत्सवादरम्यान भाविकांना श्री अंबादेवीचे व श्री एकवीरा देवीचे व्यवस्थित व शांततेत दर्शन घेता यावे, याकरिता दोन्ही मंदिर संस्थानच्यावतीने दर्शनाचे मार्ग निश्चित केलेले आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रवेशव्दारावर धातुशोधक यंत्र बसविण्यात आले असून ठिकठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे.
 

 
 
एकवीरा देवी संस्थानात अन्नछत्राचे उद्घाटन
सुप्रसिद्ध श्री एकवीरा संस्थानच्या वतीने श्री एकवीरा देवी अन्नक्षेत्र व जनकल्याण संस्थेची स्थापन करण्यात आली असून एकवीरा देवीच्या मंदिराच्या परिसरात भव्य मोठ्या अन्नछत्राची उभारणी करण्यात आली आहे. श्री एकवीरा देवी अन्नछत्र व जनकल्याण संस्थेच्या अन्नछत्रामधील प्रसादालयाचे उद्घाटन रविवार, 29 सप्टेंबर रोजी अमरावतीचे पोलिस आयुक्त संजय बाविस्कर व सौ. बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच त्यांच्याच हस्ते श्री एकवीरा देवी मंदिरामध्ये ध्वजारोहण करण्यात आले. संस्थानचे अध्यक्ष डॉ. रमेश गोडबोले यांनी याप्रसंगी अन्नछत्रामध्ये उभारण्यात आलेल्या प्रसादालयामध्ये एकावेळी तब्बल 450 ते 500 भक्तांना महाप्रसादाचे वाटप करणे शक्य होणार असल्याची माहिती उपस्थितांना दिली. याप्रसंगी श्री एकवीरा देवी संस्थानचे उपाध्यक्ष एस. एन. कारंजकर, सचिव शैलैश वानखडे, सहसचिव सी. आर. बपोरीकर, कोषाध्यक्ष राजेंद्र टेम्बे, विश्वस्त डॉ. अनिल खरैय्या, चंद्रशेखर भोंदू, अविनाश श्रॉफ, चंद्रशेखर कुळकर्णी, दीपक सब्जीवाले, राजू हेडा, अ‍ॅड. डॉ. रवींद्र मराठे यांच्यासह संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.