विकेंड पिकनिकसाठी बेस्ट ठिकाण

    दिनांक :03-Sep-2019
दोस्तांनो, मान्सून पिकनिकची मजा काही वेगळीच असते. या दिवसात जिकडेतिकडे धबधबे कोसळत असतात. म्हणूनच मित्रमंडळींसोबत एखाद्या धबधब्याच्या ठिकाणीच भटकंती करायला हवी. डोंगरातून अंगावर कोसळणारी पाण्याची धार अलगद झेलायला हवी. असंच एक ठिकाण म्हणजे ठोसेघर धबधबा. सातार्‍यातला हा धबधबा मान्सून वीकेंड पिकनिकसाठी बेस्ट ठिकाण आहे. 
  
 
पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेला हा धबधबा आपलं मन मोहवून टाकतो. निसर्गरम्य असं हे ठिकाण आपल्याला आकर्षित करतं. इथे निवांत क्षण घालवता येतात. सातार्‍याच्या जवळपास अनेक धबधबे आहेत. त्यापैकी एक म्हणजे ठोसेघर धबधबा. सज्जनगड आणि पवनचक्क्यांचं मनोहारी दृश्य बघत आपण ठोसेघरला पोहोचतो. पावसाळ्यात या भागावर धुक्याची चादर पसरलेली असते. मस्त ढगाळ वातावरणात धबधब्याखाली भिजताना एकदम भारी वाटतं. मोठा ग्रुप असेल तर तुम्ही खूप धमाल करू शकता. इथली भातशेतं आपल्याला खुणावतात. धुक्याची चादर पसरल्यानंतर समोरचं काहीच दिसत नाही. सातार्‍यापासून 20 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. सातारा रेल्वेस्थानकावर उतरून तुम्ही पुढे जाऊ शकता. स्वत:च्या वाहनानेही प्रवास करता येईल. कोल्हापूरपासून 150 किलोमीटरवर हा धबधबा आहे. त्यामुळे यंदाच्या मान्सूनमध्ये ठोसेघरला नक्की जा.