दिग्विजय सिंह यांचे डोके तर फिरले नाही!

    दिनांक :03-Sep-2019
‘‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का,’’ असा प्रश्न, भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी इंग्रज सरकारला उद्देशून विचारला होता. मुळात इंग्रजांना डोके होते, पण ते काही कारणाने ठिकाणावर नव्हते. त्यामुळे हा प्रश्न उचित होता. पण, आता मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचे डोके तर फिरले नाही, असा प्रश्न त्यांच्या वागणुकीतून सतत सगळ्यांना पडत असतो.
मात्र याचे उत्तर, ज्याला थोडेफार डोके असेल त्याचेच डोके फिरू शकेल. ज्याला मुळातच डोके नाही, त्याचे डोकेतरी कसे फिरणार, असे आहे. दिग्विजय सिंह यांना डोके असते तर ते असंबद्ध आणि खोडसाळ बोललेच नसते. ‘उचलली जीभ लावली टाळूला,’ अशी एक म्हण आहे. याचा अर्थ, काहीच विचार न करता वाट्‌टेेल तसे बोलायचे वा बरळायचे. बर्‍याच दिवसांपासून आपण काहीच वादग्रस्त बोललो नाही, माध्यमातून झळकलो नाही, असे दिग्विजय सिंह ऊर्फ दिग्गीराजा यांना वाटत असावे. त्यामुळे ते अधूनमधून काही वेडे चाळे करत असतात. आताही दिग्गीराजा यांना असेच वेडे चाळे करण्याचा झटका आला, असे दिसते.
 
 
 
पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसाठी मुस्लिमांपेक्षा हिंदू च जास्त हेरगिरी करतात. बजरंग दल आणि भाजपाचे लोक पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्यासाठी आयएसआयकडून पैसे घेतात, असा नवा शोध त्यांनी लावला. हिंदू आणि मुस्लिम यांच्यात तणाव निर्माण करण्याचा तसेच हिंदूंनाही देशद्रोही ठरवण्याचा हा दिग्गीराजा यांचा प्रयत्न म्हणावा लागेल. मुस्लिमच फक्त देशद्रोही नाहीत तर हिंदू ही आहे, हे दिग्गीराजा यांना यातून सिद्ध करायचे आहे. फक्त मुस्लिमच पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे हस्तक नाही, तर काही हिंदूही आयएसआयच्या इशार्‍यावर काम करतात, असे त्यांना म्हणायचे असावे. कोणते हिंदू आयएसआयकडून पैसे घेऊन त्यांच्यासाठी देशाच्या विरोधात काम करतात, त्यांची नावे दिग्गीराजा यांनी सांगितली पाहिजे. सिंह असा गंभीर आरोप करतात, तेव्हा त्यांच्याजवळ या आरोपाची पुराव्यानिशी माहिती असली पाहिजे. त्यामुळे आपल्याजवळच्या पुराव्यानिशी त्यांनी या लोकांची नावे जाहीर केली पाहिजे. देशाशी गद्दारी करणारे मग ते हिंदू असो की मुस्लिम, त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरला पाहिजे, त्यांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यामुळे आयएसआयकडून पैसे घेणार्‍या लोकांची नावे दिग्गीराजा यांनी जाहीर केली पाहिजे. ही नावे ते जाहीर करणार नसतील, तर त्याच्या दोन शक्यता आहेत. पहिली म्हणजे आपल्या आरोपाचे त्यांच्याजवळ कोणतेच पुरावे नाही, हिंदूंना बदनाम करण्यासाठी ते असे खोडसाळ आरोप करत आहेत.
 
दुसरी शक्यता म्हणजे अशा देशद्रोही लोकांना त्यांना पाठीशी घालायचे आहे. देशद्रोही लोकांची माहिती असूनही त्यांची नावे पोलिसात न देणे, त्यांना पाठीशी घालणे, हासुद्धा देशद्रोह आहे. त्यामुळे आधी या देशद्रोहासाठी दिग्गीराजा यांच्यावर पोलिसांनी खटला भरला पाहिजे, त्यांना तुरुंगात डांबले पाहिजे. काही देशद्रोही लोक आयएसआयकडून पैसा घेतात, हे एकवेळ समजण्यासारखे आहे, पण रा. स्व. संघ, भाजपा आणि बजरंग दल यांसारख्या संघटनाही पैसे घेतात, त्याचा खुलासा दिग्गीराजा यांनी केला नाही. त्यांनी असा खुलासा तातडीने करायला हवा होता. संघ, भाजपासारख्या संघटनांना अडचणीत आणण्याची त्यांच्यासाठी तर ही सुवर्णसंधी आहे. याचा राजकीय फायदा त्यांनी घेतला पाहिजे. भाजपा आयएसआयकडून पैसे घेत त्यांच्यासाठी हेरगिरी करत आहे, असे मी म्हटले नाही, असे ट्विटही नंतर त्यांनी, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते शिवराजिंसह चौहान यांच्या प्रत्युत्तरावर केले. आपण काय बोलतो आहे, याचे भानही दिग्गीराजा यांना राहात नाही. एखादा दारूडा बरळत असतो, तसे दिग्गीराजा बरळत असतात.
रा. स्व. संघाचा स्वातंत्र्यआंदोलनात सहभाग नव्हता, असा घासूनपुसून जुना झालेला खोडसाळ आरोप दिग्गीराजा यांनी केला, त्यामुळे या लोकांनी आम्हाला राष्ट्रवादाचे पाठ शिकवू नये, रा. स्व. संघ आणि भाजपाशी आमची लढाई विचारधारेची आहे, असे ते म्हणाले. कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या नेत्यांना राष्ट्रवादाचे काय, कोणतेच धडे शिकवता येत नाहीत. दिग्विजय सिंह यांनी आपल्या वागणुकीने कॉंग्रेसचे अपरिमित नुकसान केले आहे. तरीसुद्धा त्यांची कॉंग्रेसमधून हकालपट्‌टी का होत नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
 
याच्याआधी दिग्गीराजा यांनी हिंदू दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला होता. दहशतवादी कारवायांत गुंतलेले सर्व हिंदू दहशतवादी रा. स्व. संघाशी संबंधित आहेत, असे तारेही त्यांनी तोडले होते.
दिग्विजय सिंह जे बोलतात, त्याच्याशी कॉंग्रेस पक्ष सहमत आहे का, हे कॉंग्रेसने जाहीर केले पाहिजे. मुळात आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी तर ते असे बोलत नाहीत, अशी शंका येते. त्यामुळेच दिग्गीराजांचे सर्व खोडसाळ आरोप ‘हिज मास्टर्स व्हाईस’सारखे वाटतात. लोकशाहीत अभिव्यक्तिस्वातंत्र्य असले पाहिजे. पण, दिग्गीराजासारखे लोक या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करतात, असे म्हणावेसे वाटते. रा. स्व. संघ आणि भाजपाशी आमची विचारधारेची लढाई आहे, असे दिग्गीराजा एकीकडे म्हणतात, दुसरीकडे त्याच रा. स्व. संघ आणि भाजपावर बिनबुडाचे आरोप करतात. विचारधारेची लढाई ही विचारधारेतूनच लढायची असते. खालच्या पातळीवर येऊन नाही. पातळी सोडून केलेल्या आरोपांमुळे दिग्गीराजा यांना काही काळासाठी प्रसिद्धी मिळत असली, तरी आपल्या वागणुकीतून ते समाजात विद्वेष निर्माण करत आहेत. दिग्गीराजा हे हिंदू आहेत, पण त्यांची वागणूक ही पूर्णपणे हिंदूविरोधी आणि मुस्लिमधार्जिणी अशी आहे. लहानपणी त्यांची सुंता तर झाली नव्हती ना, अशी शंका त्यांच्या वागणुकीतून वारंवार येते. राजकीय फायद्यासाठी मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचे तुणतुणे दिग्गीराजासारखे कॉंग्रेसचे नेते सतत वाजवत असतात. पण, मुस्लिम तुष्टीकरणाचा राग आळवताना या देशातील हिंदूंनी त्यांचे काय नुकसान केले, घोडे मारले, ज्यामुळे देशातील हिंदूंना ते सतत आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करत असतात, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. मुस्लिमांवर अन्याय होत असेल तर तो दूर करण्यासाठी आवाज उठवण्यात काही गैर नाही, मुस्लिमांना न्याय मिळाला पाहिजे, कारण तेसुद्धा याच देशाचे नागरिक आहेत, यात शंका नाही. मात्र, त्यांना न्याय देताना हिंदूंवर अन्याय होणार नाही, याची काळजी दिग्गीराजासारख्या नेत्यांनी घेतली पाहिजे. एकाला न्याय देताना दुसर्‍यावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेणे ही देशातील सर्वच राजकीय पक्षांची आणि त्यांच्या नेत्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणांनी दिग्गीराजा यांच्या आयएसआयविषयक आरोपांची गंभीरपणे दखल घेत त्यांच्याकडून याबाबतचा तपशील मागितला पाहिजे. असा तपशील त्यांनी दिला तर दोषी लोकांवर कठोर कारवाई केली पाहिजे.
दिग्गीराजा असा तपशील देत नसतील, तर खोडसाळ आणि निराधार आरोप केल्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरला पाहिजे. रा. स्व. संघ आणि भाजपानेही त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला पाहिजे. मुद्दा, म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतो, त्याचा आहे. दिग्विजय सिंहांसारख्यांचे बरळणे हे काळ सोकावल्याचेच लक्षण आहे!