विद्यार्थी पाच, तर कर्मचारी सात जिल्हा परिषदेच्या शाळेची अवस्था

    दिनांक :03-Sep-2019
मुख्याध्यापकांची सतत बुट्टी
 
दर्यापूर, 
येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून शाळेत केवळ पाच विद्यार्थी असून हजारो रुपयांचा नियमित पगार घेणारे पाच शिक्षक व दोन शिक्षकेतर कर्मचारी असल्याची बाब पुढे आली आहे.
शाळेच्या पटावर असणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मात्र 34 दाखविण्यात आली असून वर्ग 7 ते 10 वी पर्यंत कक्षा आहेत. यातील अनेक विद्यार्थी मेळघाटातील आहेत. नियमित उपस्थित विद्यार्थी केवळ पाच असल्याचे निदर्शनास आले आहे . विशेष म्हणजे या शाळेतील मुख्याध्यापक सतत गैरहजर असल्याचेही पुढे आले असून यावर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून कुणीही लक्ष देत नाही. त्यामुळे सर्व प्रकार राम भरोसे सुरू आहे.
 

 
 
मागील वर्षी सन 2018 च्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालात या शाळेने तालुक्यातील सर्व रेकॉर्ड मोडत शून्य निकाल दिला, हे विशेष ! असे असतानाही जिल्हा परिषदेकडून कुठलीच दखल घेतल्या गेली नाही. दर्यापूर शहरातील सरकारी शाळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या शाळेत आजवर अनेक विद्यार्थी घडले आहेत. पूर्वीच्या काळातील एकमेव ही शाळा आहे. उत्कृष्ट शिक्षक व नियोजन यामुळे या शाळेत शेकडो विद्यार्थी संख्या राहात असे. मात्र ढिसाळ नियोजन व खाजगी शाळांच्या भरमारीमुळे दिवसेंदिवस संख्या रोडावत गेली. आज केवळ पाच विद्यार्थी संख्या असलेली ही एकमेव शाळा गणल्या गेली आहे. असे असतानाही जिल्हा परिषदेने बक्कड निधी टाकून येथील लाखो रुपयांचे नवे बांधकाम केले आहे. शाळेच्या वर्गखोल्या नव्याने बांधून तयार आहेत; मात्र त्यात बसण्यास विद्यार्थीच नसल्याने पुरता पोरखेळ झाला आहे. विशेष म्हणजे येथे गणित विषयासाठी शिक्षकच नसल्याचे विद्यार्थी सांगत असून उपस्थितीअभावी तासिका सुद्धा नियमित होत नाहीत. मुख्याध्यापक भाड्याच्या खोलीत राहात असून बव्हंशी अमरावती येथेच मुक्कामी राहातात. महिन्यातून केवळ चार ते पाच दिवस ड्युटी बजावली की पगारासाठी तयार अशी अवस्था आहे. यावर शिक्षण विभाग जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करू लागले आहेत. ही शाळा बंद करून जिल्हा परिषदेने या शिक्षकांचे समायोजन करावे, अशी मागणी सुरु झाली आहे.