आठ महिन्यांनी पुन्हा रस्ते तपासणी

    दिनांक :03-Sep-2019
अकोला,
येथे महानगरपालिकेद्वारा बनिवण्यात आलेल्या रस्त्यांची सोमवार 2 सप्टेंबर रोजी व्ही.एन.आय.टी. (विश्वेश्वरैय्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर) यांच्या चमूव्दारे दुर्गा चौक ते अग्रसेन चौक पर्यंतचा रस्ता, सिव्हील लाईन ते मुख्य पोस्ट ऑफीस पर्यंतच्या रस्त्याची तांत्रिक दृष्ट्या प्रथम तपासणीच्या कामास सुरूवात झाली आहे. यामध्ये सुरूवातीला नॉन डिस्ट्रक्टीव्ह टेस्ट (बिना तोडफोड) घेण्यात आल्या.
यावेळी मनपा कार्यकारी अभियंता अजय गुजर, उपअभियंता अनिल गावंडे, कृष्णा वाडेकर, युसुफ खान, कनिष्ठ अभियंता रवींद्र जाधव, मनोज गोकटे, चेतन शंकरपुरे आदींची उपस्थिती होती.
 

 
 
शहरातील सिमेंट रस्ते निकृष्ट असल्या प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी सादर केलेला सोशल ऑडिटचा अहवाल बाजूला सारत महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी नागपूर येथील ’व्हीएनआयटी’(विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय औद्योगिकी संस्थान)मार्फत सिमेंट रस्त्यांची नव्याने तपासणी करण्याची भूमिका 22 जानेवारी 19 च्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत स्पष्ट केली होती.
महापालिका प्रशासनाच्या अखत्यारित तयार करण्यात आलेल्या सहापैकी पाच सिमेंट रस्त्यांची कामे स्थानिक ’आरआरसी’ नामक कंपनीला देण्यात आली होती. रस्त्यांचे निर्माण करताना मजबुतीकरणाचे निकष पायदळी तुडविण्यात आल्याने अवघ्या सहा महिन्यांतच सिमेंट रस्त्यांवर ठिकठिकाणी ठिगळ लावण्याची वेळ कंत्राटदारावर आली होती.
याविषयी अकोलेकरांनी ओरड केल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, गुणनियंत्रण जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयोगशाळा इत्यादी तीन यंत्रणांमार्फत रस्ते कामांचे 22 ते 27 जुलै 2018 दरम्यान सोशल ऑडिट केले. सोशल ऑडिटच्या अहवालात पाच सिमेंट रस्त्यांचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याचे आढळून आले होते. हा अहवाल जिल्हाधिकार्‍यांनी मनपाकडे सादर केला होता.
शहरातील रस्ते कामांच्या करण्यात आलेल्या सामाजिक व तांत्रिक अंकेक्षणात (सोशल ऑडिट) 79 नमुने तपासणीत घेतले गेले होते. रस्ते कामांच्या या नमुन्यांची तपासणी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, गुणनियंत्रण जलसंपदा विभाग, अकोला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जिल्हा प्रयोगशाळेमार्फत करण्यात आली होती.