राकाँ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या सुरक्षा रक्षकांच्या कारला अपघात

    दिनांक :30-Sep-2019
उपनिरीक्षकासह चौघे किरकोळ जखमी
 
नागपूर,
राकाँ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना घेऊन नागपूरला येण्यास निघालेल्या पटेल यांच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकांच्या कारला एका अज्ञात ट्रेलरचालकाने धडक दिल्याने एका उपनिरीक्षकासह चौघे जखमी झाले.
सोमवारच्या पहाटे दोन ते सव्वादोनच्या सुमारास नागपूर-भंडारा मार्गावरील महालगाव (पो. स्टे. मौदा) येथे ही घटना घडली. प्रफुल्ल पटेल यांना वाय श्रेणीची सुरक्षा आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत विशेष सुरक्षा पथकाचे एक पथक नेहमीच असते. नेहमीप्रमाणेच विशेष सुरक्षा पथकाचे पोलिस उपनिरीक्षक गजानन गिरी, शिपाई मनोज कांबळे, जग्गू मुंगळे आणि कारचालक प्रवीण दुर्गे हे सोबत होते. रविवारी रात्री १२ च्या सुमारास प्रफुल्ल पटेल हे गोंदिया येथून नागपूरला येण्यास निघाले. त्यावेळी विशेष सुरक्षा पथकाचे जवान देखील त्यांच्यासोबत होते. पटेल यांची कार पुढे तर त्यांना इस्कॉर्ट करीत विशेष सुरक्षा पथकाचे वाहन येत होते. महालगाव येथून कारसमोर लोखंड भरलेला एक ट्रेलर उजव्या बाजूने जात होता. त्यामुळे कारचालक प्रवीण दुर्गे यांनी डाव्या बाजूने कार काढली. तोच ऐके ठिकाणी अचानक ट्रेलरचालकाने आपला ट्रेलर डाव्या बाजूने वळविला. अचानक ट्रेवर आडवे झाल्याने दुर्गे यांनी करकचून ब्रेक दाबून आपली कार थांबविली. तरीही ट्रेलरचा मागील पल्ला जीपला घासत गेला. या अपघातात कारमधील चौघेही जखमी झाले. उपनिरीक्षक गिरी यांच्या डोक्याला मार लागला असून कांबळे आणि मुंगळे यांच्या पायाला मार लागला.
 
 
 
जखमी शिपायांनी या घटनेची माहिती विशेष सुरक्षा पथकाला दिली. माहिती मिळताच सुरक्षा पथकाच्या पो. नि. सुनीता मेश्राम आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाल्या. मौदा पोलिसांनाही ही माहिती समजताच सहायक निरीक्षक काळे घटनास्थळी दाखल झाले. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रूग्णवाहिकेतून जखमींना पारडी येथील भवानी हॉस्पिटल येथे आणले. डॉक्टरांनी तातडीने त्यांच्यावर उपचार केला. याप्रकरणी मौदा पोलिसांनी अज्ञात ट्रेलरचालकाविरुद्ध  गुन्हा दाखल केला आहे. मौदा पोलिस पुढील तपास करीत आहेत.